Tuesday, December 4, 2018

विक्रमाचे प्रश्न आणि त्याचे भय ..



झाडावर लोंबकाळत असलेले प्रेत राजा विक्रमाने उचलले, पाठीवर घेतले आणि तो पुन्हां स्मशानाकडे जाऊ लागला. प्रेतात बसलेला वेताळ आज शांत होता ... खरे तर विक्रमाला गोष्टी सांगून वेताळ  कंटाळला होता..   एकूणच वेताळाचे शांत बसणे विक्रमाला नवीन होते.. ती स्मशान शांतता विक्रमाच्या अंगावर येत होती..विक्रमाने विचार केला आज वेताळाला आपण बोलते करूयात ... तेव्हढीच या भयाण शांतेतुन सुटका होईल...

विक्रमाने वेताळाला विचारले " वेताळा तुझ्या  गोष्टी मी खूप ऐकल्या आणि तुझ्या प्रश्नाची उत्तरे दिली , आज तू 
मला माझ्या प्रश्नांची उत्तरे देशील का ?

वेताळ चमकला आणि म्हणाला " हो नक्की , पण तुझे शंका निरसन झाले तर मी झाडावर लटकायला मोकळा " विचार तुझे प्रश्न ?

विक्रमाने प्रश्न विचारला ' वेताळा हे स्मशान , ही भयाण शांतता , हे असे वातावरण या वरून एक प्रश्न मनात  येतो  ... " वातवरण भीती निर्माण करते की  भीती मुळे वातावरण निर्मिती होते ? मुख्य भीती म्हणजे काय ?" 

वेताळाने जोरात हसत बोलायला सुरुवात केली ...कंदाचीत हा प्रश्न त्याला अपेक्षित असावा

विक्रमा भीती ही तुम्हा मनुष्य प्राण्यांची आवडती गोष्ट .. हो आवडती गोष्टचकारण तुम्ही तिचे लाड करून वाढवता. नीट एक कसे ते ...तुमच्या जगात मुख्यतः दोन प्रकारच्या भीती आहेत , एक मानसिक अथवा काल्पनिक आणि दुसरी नैसर्गिक. काल्पनिक भीती ही कायम सावली सारखी बरोबर असते , सावली अंधारात पाठ सोडते पण काल्पनिक भीती अंधारात गडद होते.. कारण हा मनातील सावल्यांचा खेळ आहे ..

अपयशाची , आजाराची , मृत्यूची , न घडणाऱ्या गोष्टीची, जर तर ची अशा एक ना अनेक काल्पनिक भीती खाली तुम्ही सतत वावरत असता..  नुसते वावरत नाही तर तिचे चोचले पुरवत वाढवत असता.

भविष्याचा विचार भीती निर्माण करण्यास कारणीभूत असतो.. तुमचे अध्यात्म उगीच का सांगते वर्तमानात राहा ? पण तुम्हा लोकांना वर्तमाना पेक्षा भूत आणि भविष्यात रमायला जास्त आवडते..  

जर तर ही संकल्पना तुमच्या मनाचा आवडता खेळ आहे ... आणि तिथेच भीती ची बीजे रोवली जातात..बघ न अगदी लहान पणी तुम्हाला सांगितले गेलेले असते " जर असे नाही केलेस तर तसे होईल "  आणि तिथून हे जर तर तुमची पाठ सोडत नाही ...त्या मुळेच मनुष्य स्वभावात सगळ्यात जुनी म्हणजे अगदी बालपणा पासून रुजवलेली आणि वयामुळे वाढलेली भावना असते ती भीती ... 

विक्रमा एक गोष्ट महत्वाची आणि लक्षात ठेव, मनुष्याच्या सगळ्या भीती फक्त दोन गोष्टीत विभागल्या गेल्या आहेत " अंत आणि अस्तिव" या दोंनही शिवाय तिसरी कुठलीही गोष्ट नाही... बघ विचार करून प्रत्येक भीती या दोनही पैकी एकाशी निगडित असते. 

त्या मुळे अंत आणि अस्तित्वाचा विचार थांबवला कि भीती नाहीशी होते ... पण एवढे सोपे नक्कीच नाही ते ?

तुमच्या दृष्टीने अस्तित्व म्हणजे  काय तर  तुमची स्वतः ची अपेक्षित ओळख...  खरे तर तुमचे असणे म्हणजे अस्तिव...बाकी सब झूठ...अस्तित्व अधोरेखित करण्याच्या प्रयत्नात जर तर चा खेळ सुरु होतो आणि मग  नवीन भीती चा जन्म होतो ..

अंत ही नैसर्गिक आणि पूर्णतः माहिती नसलेली गोष्ट त्या मुळे तिची भीती वाटणे स्वाभाविक आहे ... पण जी गोष्ट माहितीच नाही तिला का मग घाबरायचे  ? तुला एक साधे उदाहरण देतो…. रोलर कोस्टर च्या राईड पूर्वी तुम्ही प्रचंड घाबरलेले असता ... पण एकदा का राईड पूर्ण झाली की त्या भीती ची जागा आनंदाने घेतली जाते .... कदाचित अंताचेही असेच असेल ? पण खरी भीती तो आनंद सांगायला कोणी असेल का? याची असते ...

हे जग भित्र्या माणसाला जास्त घाबरवते आणि त्याच वेळेस घाबरावणाऱ्या व्यक्तीला  जास्त भिते .. आहे की नाही गम्मत ? तुमचे जग असेच चालणार .. कारण तुम्ही कायम भविष्याची चिंता करणार आणि भूतकाळ उगाळत बसणार...

विक्रम लक्ष देऊन ऐकत होता ...वेताळ काही क्षण थांबला ...आणि त्याने विक्रमा कडे पाहिले… आणि मग विक्रमा ने वेताळाला प्रश्न विचारला ज्याची वेताळ अपेक्षा करीत होता ..." ह्या वर काय उपाय ?"

वेताळ सांगू लागला -

जसे रागाला जिंकायचा पर्याय हा मौन आहे तसेच भीती करता पर्याय आहे " विचार" सामन्यतः ज्या गोष्टीची भीती वाटते तिचे विचार शक्यतो टाळले जातात पण तसे न करता ठरवून त्या गोष्टीच्या खोलात जाऊन विचार केला की भीती नष्ट होते.. कारण विचार बुद्धी समोर तोकडे पडतात , त्यांना कल्पने मधेच रमायला आवडते आणि म्हणून  सहसा त्यांना नियंत्रण आवडत नसते...

विचार दोन प्रकारे येतात ...नकळत आलेले विचार आणि ठरवून केलेले विचार ... नकळत विचारात भीती आणि इतर भावना असतात  तर ठरवून केलेले विचार इंग्लिश मध्ये म्हणतात तसे लॉजिकल असतात..

अजून एक महत्वाचे माणूस गर्दीत घाबरत नसतो तर  एकांतात घाबरतो कारण ...कारण एकांतात विचार गडद होतात...आणि गर्दीत विचार हरवून जातात... म्हणून भीतीच्या क्षणी लोकात मिसळणे महत्वाचे असते.

थोडक्यात काय तर अंत आणि अस्तित्वाचा विचार सोडला की भीती गायब होते ...एवढे बोलून वेताळाने विक्रमाकडे  कडे पहिले , विक्रमाची  शंका निरसन झाली होती  ….

वेताळाचे  बोलणे संपताच विक्रमाने आज प्रेत खांद्यावरून सोडून दिले , त्यातील वेताळ  उडाला व थेट वडाच्या पारंबीला लटकू लागला.

शांतपणे विक्रमादित्य स्मशानाच्या बाहेर चालू लागला ….

बिपीन कुलकर्णी  



No comments:

Post a Comment