Tuesday, December 4, 2018

विक्रमाचे प्रश्न आणि त्याचे भय ..



झाडावर लोंबकाळत असलेले प्रेत राजा विक्रमाने उचलले, पाठीवर घेतले आणि तो पुन्हां स्मशानाकडे जाऊ लागला. प्रेतात बसलेला वेताळ आज शांत होता ... खरे तर विक्रमाला गोष्टी सांगून वेताळ  कंटाळला होता..   एकूणच वेताळाचे शांत बसणे विक्रमाला नवीन होते.. ती स्मशान शांतता विक्रमाच्या अंगावर येत होती..विक्रमाने विचार केला आज वेताळाला आपण बोलते करूयात ... तेव्हढीच या भयाण शांतेतुन सुटका होईल...

विक्रमाने वेताळाला विचारले " वेताळा तुझ्या  गोष्टी मी खूप ऐकल्या आणि तुझ्या प्रश्नाची उत्तरे दिली , आज तू 
मला माझ्या प्रश्नांची उत्तरे देशील का ?

वेताळ चमकला आणि म्हणाला " हो नक्की , पण तुझे शंका निरसन झाले तर मी झाडावर लटकायला मोकळा " विचार तुझे प्रश्न ?

विक्रमाने प्रश्न विचारला ' वेताळा हे स्मशान , ही भयाण शांतता , हे असे वातावरण या वरून एक प्रश्न मनात  येतो  ... " वातवरण भीती निर्माण करते की  भीती मुळे वातावरण निर्मिती होते ? मुख्य भीती म्हणजे काय ?" 

वेताळाने जोरात हसत बोलायला सुरुवात केली ...कंदाचीत हा प्रश्न त्याला अपेक्षित असावा

विक्रमा भीती ही तुम्हा मनुष्य प्राण्यांची आवडती गोष्ट .. हो आवडती गोष्टचकारण तुम्ही तिचे लाड करून वाढवता. नीट एक कसे ते ...तुमच्या जगात मुख्यतः दोन प्रकारच्या भीती आहेत , एक मानसिक अथवा काल्पनिक आणि दुसरी नैसर्गिक. काल्पनिक भीती ही कायम सावली सारखी बरोबर असते , सावली अंधारात पाठ सोडते पण काल्पनिक भीती अंधारात गडद होते.. कारण हा मनातील सावल्यांचा खेळ आहे ..

अपयशाची , आजाराची , मृत्यूची , न घडणाऱ्या गोष्टीची, जर तर ची अशा एक ना अनेक काल्पनिक भीती खाली तुम्ही सतत वावरत असता..  नुसते वावरत नाही तर तिचे चोचले पुरवत वाढवत असता.

भविष्याचा विचार भीती निर्माण करण्यास कारणीभूत असतो.. तुमचे अध्यात्म उगीच का सांगते वर्तमानात राहा ? पण तुम्हा लोकांना वर्तमाना पेक्षा भूत आणि भविष्यात रमायला जास्त आवडते..  

जर तर ही संकल्पना तुमच्या मनाचा आवडता खेळ आहे ... आणि तिथेच भीती ची बीजे रोवली जातात..बघ न अगदी लहान पणी तुम्हाला सांगितले गेलेले असते " जर असे नाही केलेस तर तसे होईल "  आणि तिथून हे जर तर तुमची पाठ सोडत नाही ...त्या मुळेच मनुष्य स्वभावात सगळ्यात जुनी म्हणजे अगदी बालपणा पासून रुजवलेली आणि वयामुळे वाढलेली भावना असते ती भीती ... 

विक्रमा एक गोष्ट महत्वाची आणि लक्षात ठेव, मनुष्याच्या सगळ्या भीती फक्त दोन गोष्टीत विभागल्या गेल्या आहेत " अंत आणि अस्तिव" या दोंनही शिवाय तिसरी कुठलीही गोष्ट नाही... बघ विचार करून प्रत्येक भीती या दोनही पैकी एकाशी निगडित असते. 

त्या मुळे अंत आणि अस्तित्वाचा विचार थांबवला कि भीती नाहीशी होते ... पण एवढे सोपे नक्कीच नाही ते ?

तुमच्या दृष्टीने अस्तित्व म्हणजे  काय तर  तुमची स्वतः ची अपेक्षित ओळख...  खरे तर तुमचे असणे म्हणजे अस्तिव...बाकी सब झूठ...अस्तित्व अधोरेखित करण्याच्या प्रयत्नात जर तर चा खेळ सुरु होतो आणि मग  नवीन भीती चा जन्म होतो ..

अंत ही नैसर्गिक आणि पूर्णतः माहिती नसलेली गोष्ट त्या मुळे तिची भीती वाटणे स्वाभाविक आहे ... पण जी गोष्ट माहितीच नाही तिला का मग घाबरायचे  ? तुला एक साधे उदाहरण देतो…. रोलर कोस्टर च्या राईड पूर्वी तुम्ही प्रचंड घाबरलेले असता ... पण एकदा का राईड पूर्ण झाली की त्या भीती ची जागा आनंदाने घेतली जाते .... कदाचित अंताचेही असेच असेल ? पण खरी भीती तो आनंद सांगायला कोणी असेल का? याची असते ...

हे जग भित्र्या माणसाला जास्त घाबरवते आणि त्याच वेळेस घाबरावणाऱ्या व्यक्तीला  जास्त भिते .. आहे की नाही गम्मत ? तुमचे जग असेच चालणार .. कारण तुम्ही कायम भविष्याची चिंता करणार आणि भूतकाळ उगाळत बसणार...

विक्रम लक्ष देऊन ऐकत होता ...वेताळ काही क्षण थांबला ...आणि त्याने विक्रमा कडे पाहिले… आणि मग विक्रमा ने वेताळाला प्रश्न विचारला ज्याची वेताळ अपेक्षा करीत होता ..." ह्या वर काय उपाय ?"

वेताळ सांगू लागला -

जसे रागाला जिंकायचा पर्याय हा मौन आहे तसेच भीती करता पर्याय आहे " विचार" सामन्यतः ज्या गोष्टीची भीती वाटते तिचे विचार शक्यतो टाळले जातात पण तसे न करता ठरवून त्या गोष्टीच्या खोलात जाऊन विचार केला की भीती नष्ट होते.. कारण विचार बुद्धी समोर तोकडे पडतात , त्यांना कल्पने मधेच रमायला आवडते आणि म्हणून  सहसा त्यांना नियंत्रण आवडत नसते...

विचार दोन प्रकारे येतात ...नकळत आलेले विचार आणि ठरवून केलेले विचार ... नकळत विचारात भीती आणि इतर भावना असतात  तर ठरवून केलेले विचार इंग्लिश मध्ये म्हणतात तसे लॉजिकल असतात..

अजून एक महत्वाचे माणूस गर्दीत घाबरत नसतो तर  एकांतात घाबरतो कारण ...कारण एकांतात विचार गडद होतात...आणि गर्दीत विचार हरवून जातात... म्हणून भीतीच्या क्षणी लोकात मिसळणे महत्वाचे असते.

थोडक्यात काय तर अंत आणि अस्तित्वाचा विचार सोडला की भीती गायब होते ...एवढे बोलून वेताळाने विक्रमाकडे  कडे पहिले , विक्रमाची  शंका निरसन झाली होती  ….

वेताळाचे  बोलणे संपताच विक्रमाने आज प्रेत खांद्यावरून सोडून दिले , त्यातील वेताळ  उडाला व थेट वडाच्या पारंबीला लटकू लागला.

शांतपणे विक्रमादित्य स्मशानाच्या बाहेर चालू लागला ….

बिपीन कुलकर्णी  



Sunday, December 2, 2018

देवेन्द्रजी अभिनंदन !!




माननिय देवेन्द्रजी ,

आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्या बद्दल प्रथम तुम्हा सर्वांचे अभिनंदन !!

१९६० ला भाषावार प्रांत रचनेत , १०४ हुतात्म्यांच्या घराची होळी होऊन मुंबई सहीत महाराष्ट्राची निर्मिती  झाली ... यशवंतराव मंगल कलश घेऊन आले आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले .. त्या नंतर आज पर्यंत या महाराष्ट्राने अनेक मुख्यमंत्री पाहिले .. यशवंतरावांचे एक वाक्य होते “ जी जाता जात नाही ती जात “

१९६० ते २०१८ म्हणजे गेल्या ४८ वर्षात यशवंतरावांचे   अनुयायी म्हणणारे पुढारी किंवा मानसपुत्रांनी ते शब्द खरे करत ती जात काही जाऊ दिली नाही ..
आज पर्यंत या महाराष्ट्राने अनेक मराठा मुख्यमंत्री पाहिलेच , बरोबरीने मुस्लिम, वंजारा  , मागासवर्गीय असे सगळे मुख्यमंत्री पाहिले ... त्या वेळेस महाराष्ट्राची जनता या सर्व नेत्यांना फक्त मराठी  या दृष्टिकोनातून पाहात होती ...
तुमच्या मुळे मुख्यमंत्र्याला जात असते हे जनतेला कळाले .. पुरोगामी  मंडळी येता जाता फक्त तुमच्या जातीवर जात  होते ..याला कारण यांचे  बेगडी पुरोगामीत्व .. मतां करिता टोपी किंवा पगडी फिरवताना कसलाही विधिनिषेध  न बाळगणारी ही मंडळी , तुमच्या जाती वर आली नसती तरच नवल होते ?

राजकारण हा एक खेळ आहे आणि प्रत्येक खेळाचे काही अलिखित नियम असतात .. असे असूनही आज पर्यंत झाली नाही एव्हढी चर्चा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रयांच्या जातीची आणि बरोबरीने त्यांच्या पत्नी ची चर्चा झाली .. नुसती चर्चा झाली तरी ठीक होते .. पण पत्नी बद्दल अपशब्द काढले गेले तेंव्हा पुरोगामी मंडळी मिठाची गुळणी घेऊन बसले होते ..मुख्यमंत्र्यांची पत्नी  प्रथम स्त्री आणि मग ब्राम्हण आहेत  यांची साधी जाणीव काकासाहेब मंडळीना नसावी का ? छोट्या छोट्या गोष्टीवर प्रगल्भ विचार मांडणाऱ्या जाणत्या राजाला का नाही चिंता वाटली या विषयाची  ?
अर्थात हेच प्रश्न तुमच्याही मनात असतीलच ...

आपली एक गोष्ट आम्हाला आवडते .. ती म्हणजे आपण या असल्या गोष्टींना कधीच भीक घालत नाह ...कदाचित हीच मोठी पोटदुखी असेल या मंडळींची ... आपल्या संस्कारा मुळे आपले  असे विचार असावेत का   !!! तसे पाहता बाकी विरोधक पण खूप सुशिक्षित आहेत .. पण त्यातले सुसंस्कृत कीती हा शोधा चा विषय ..जातीचा आणि सुसंस्कृत पणाचा अजिबात सबंध नसतो  ...या महाराष्ट्रात आपल्या सारखे अजून काही सुसंस्कृत मुख्यमंत्री होऊन गेले  ...ती मंडळी ज्या पक्षाची होती ते खरे म्हणजे भांगेतील  तुळस .. असे लोक त्यांना परवडणारे नव्हते  ... मग मामासाहेबा पुढे टिकाव एकूण अवघडच होता .. काय झाले या मंडळींचे ? ... कधी विजन वासात पाठवले , कधी धोका देऊन स्वतः मुख्यमंत्री झाले ...एकूण ती पाण्याविणा होणारी माश्याची तडफड होती  !!

असो या सगळ्या गोष्टी तुम्हाला अपेक्षित असतीलच ..खरे तर  या लोकांनी तुम्हाला under dog ठरवले होते , पण तुम्ही पुरून उरलात .. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावलात तुमचे खूप खूप अभिंनदन !! मराठा समाजाची परिस्थिती गावा गावात बिकट आहे .. अर्थात मुठ भर राजकरणी यातुन बाजूला काढायला हवेत .. ज्यांची हयात सहकारी , शिक्षण संस्था लुटण्यात गेली ते लोक काय समाजाचे दुःख समजतील ? हा निर्णय घेण्या करता कुठली जात नव्हे तर संवेदनशीलता असावी लागते ... आणि ते येते तुम्ही कसे आणि कुठे वाढता त्यातून ...

परत एकदा अभिनंदन !! आणि हो 2019 करता आत्ताच शुभेच्छा !! २०१९ च्या चिंतेचे अजिबात कारण नाही ...
कारण आपले  कै अनंतराव भालेराव म्हणाले होते ना " खरारा करणारे अश्वमेधाचा घोडा कसा अडविणार ?"

आपला
बिपीन कुलकर्णी



"आणि काशिनाथ घाणेकर"




या चित्रपटावर बरेच काही लिहिले आहे, खरे तर एक सिनेकलाकृती म्हणुन अतिशय उत्कृष्ट चित्रपट ...सुबोध भावे आणि इतर सगळ्याच कलाकारांचा अभिनय खरेच लाजवाब ...

काशिनाथ घाणेकर यांना रंगभुमीवर माझ्या पिढीने पहिले नाही ...चित्रपट पहिल्या नंतर  आपण त्यांची नाटके पाहू शकलो नाही म्हणजे फार काही गमावले अशी खंत नक्कीच वाटली नाही.
फार पूर्वी कांचन घाणेकरांचे "नाथ हा माझा " वाचले होते , त्यांनी लिहिलेल्या चरित्रावर हा चित्रपट बेतला आहे , त्या मुळे चित्रपटाबद्दल थोडी कल्पना होती ...

काशिनाथ घाणेकर म्हणजे  " मराठी रंगभूमीच्या पहिल्या सुपर स्टार ची शोकांतिका ...इतरांच्या शोकांतिकेत रमायला एकूणच आवडते आम्हाला ..
कमालीची  लहरी वृत्ती , रंगेल स्वभाव , यश मिळाल्यावर मदिरा आणि मदिराक्षी म्हणजेच आयुष्य झालेले  ... फक्त स्वतः वर प्रेम करण्याची वृत्ती ..

अशा परिस्थितीत  शेवट शोकांतिकेत झाला नसता तरच नवल होते ...
दारू च्या आहारी जाऊन " लाल्या" च्या भूमिकेत गारंबीच्या बापू चे किंवा आनंदी गोपाळ चे संवाद प्रेक्षक कसे आणि किती  काळ सहन करतील? कलाकार प्रेक्षकांना उत्तरदायी असतात याची जाणीव असलेला कलाकार असा वागू नाही शकत ...मायबाप प्रेक्षकांशी केलेली प्रतारणा कुठल्याही कलाकाराला रसातळाला नेते ...

नीती अनीती च्या मर्यादा ओलांडल्या कि असे होणारच ...

कलाकाराला मिळणारी टाळी हा जसा  शाप असतो ... तसेच त्या शापाला स्वभावातील नम्रता किंवा लीनता हा उशाप : असतो ...

पहिल्या पत्नी वर केलेला अन्याय , स्वतः च्या वयापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलीशी केलेला विवाह , लहान वयात लेकीला आलेले पोरके पण ...
लागु पर्व सुरु झाल्यावर स्वतः चे अस्तित्व दाखविण्याची केविलवाणी धडपड ... ह्यात स्वतः चे अपयश सहन करू न शकलेला एक कलाकार दिसतो ...
पणशीकर अर्थात पंतां सारख्या मित्राने दिलेली साथ न समजता स्वतः च्या विश्वात मश्गुल असेलेला एक बेफिकीर माणूस दिसतो ..
ह्या सगळया गोष्टी त्यांचे मातीचे पाय दाखवितात.. एकूणच त्यांच्या बद्दल  सहानभूती नक्कीच वाटत नाही ...मग झालेल्या शोकांतिकेला नक्की जबाबदार कोण ?

या चित्रपटात भालजीं च्या तोंडी एक वाक्य आहे " काशिनाथ म्हणजे सगळ्या धान्यांची सरमिसळ " हे खरेच होते ... प्रेक्षका करता पण ती धान्याची सरमिसळ होती ...कोणाला त्यांचे राजबिंडे रूप आवडले तर  काहींना  लहरी स्वभाव , कोणी त्यांच्या बेफिकिरी चे चाहते होते...तर कोणी त्यांच्या सिनेमाचे ... कदाचित मला त्या धान्यातले खडेच जास्त दिसले असावेत...

चित्रपट आणि कलाकार उत्कृष्ट त्या बाबतीत दुमत नाही ..  पण ह्या बायोपिक ची खरेच गरज होती का ? हा माझ्या मनातला प्रश्न...
कदाचित आजच्या कलाकारानं करीता यश मिळाल्यावर कसे वागु नये याचा वस्तुपाठ हा चित्रपट ठरू शकतो ....

- बिपीन कुलकर्णी