Thursday, November 23, 2017

Local Guardian



Local Guardian                                                                       23 Nov 2017

आज असेच अचानक एक वाचलेले वाक्य आठवले आणि विचारचक्र सुरु झाले ..... ते वाक्य होते…..

" आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्वाचे नाही पण तुमच्या मुळे किती लोक आनंदात आहेत याला महत्व आहे "

वाचल्यावर  विचार आला  , मी किती जणांना आनंद दिला हे मला तरी माहिती नाही पण मला  आनंद दिलेल्या अनेक व्यक्ती डोळ्या समोर आल्या आणि एका व्यक्तीची प्रकर्षाने आठवण झाली... कारण आजची ती उत्सव मूर्ती ... म्हणजेच आज तिचा वाढदिवस !!!

समाजाच्या दृष्टीने मी यशस्वी असेल किंवा नसेल , पण स्वतः विचार केला तर नक्कीच सुखी समाधानी आणि आनंदी आहे ... ह्या माझ्या आनंदाला जे अनेक अद्रुष्य  हात लागलेत त्यातील एक महत्वाचा हात नक्कीच तिचा ...

नात्याने म्हणायचे तर माझी मामे बहीण.... अंजली मेढेकर सुराणा !! माझ्या करिता नुसती बहीण आहे का ती? नक्कीच नाही ....   इंग्लिश मध्ये म्हणतात तसे ती माझी   " Local Guardian "  ...  आज वयाची चाळीशी मी केंव्हाच ओलांडली .... गेल्या अनेक वर्षात मी स्वतः अनेक जणांचा local Guardian झालो ... पण ती अजूनही आहे माझी local guardian !!

२०-२५ वर्षा पूर्वी जेंव्हा मी नोकरी मध्ये स्थिर होऊन  करिअर करण्या करता औरंगाबाद ला धडपडत होतो त्या वेळेस  मनात स्वप्न होते पुण्यात नोकरी करायची ... त्या वेळेस अंजु ताई च्या अदृश्य हाताने मला बोट धरून पुण्यात आणले .... नुसते आणलेच नाही तर पुण्यात स्थिरस्थावर केले ...

तिच्या आणि माझ्या वयात बरेच अंतर... त्या मुळे अजूनही माझा कान धरायचा तिला अधिकार  ... असो. …स्वातंत्र्य सैनिक आई वडिलांच्या पोटी तिचा जन्म झाला ... आई वडील दोघेही शिक्षक ... त्या मुळे त्यांच्या तालमीत शालेय आणि नंतर महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद मध्ये झाले ...एकत्र कुटुंबाबत वाढत होती... दिवस भर भर जात होते ...

आणि प्रत्येक मुलीच्या आयुषयात येते ती वेळ आली लग्नाची !! 

नातेवाईक तसेच  आई वडिलांचे मित्र मैत्रिणी आडून पाडून स्थळे सुचवत होते ... पण हिच्या मनात वेगळेच विचार चालले होते ,

श्री पन्नालाल सुराणा म्हणजे समाजवादी साथी ... समाजवादी मंडळी मध्ये भाऊ हे आदराने घेतले जाणारे नाव ... त्यांच्या पत्नी वीणा ताई !तर भाऊ आणि वीणा ताई चा मुलगा प्रभास औरंगाबाद मध्ये शिक्षण घेत सन्मित्र कॉलनी मध्ये राहत असताना त्यांचे आणि अंजु चे सूर जुळले ...

मेढेकर हे हे पक्के देशस्थ ऋग्वेदी तर सुराणा हे जैन मारवाडी ... तो काळ १९८० चा ... आंतर जातीय विवाहाला आजही  पोषक वातावरण नसताना त्या काळची कल्पनाच करू शकत नाही...
असे असूनही दोनही कुटुंबांनी या विवाहाला आनंदाने परवानगी दिली ... कदाचित समाजवादी विचारसरणीचा हा परिणाम असेल ...जाती पाती मानण्याचे संस्कार होते दोनही कुटुंबावर ...

प्रभास इंजिनिअरिंग मधले गोल्ड मेडलिस्ट ... टेल्को मध्ये नोकरी चालू होती...

यथासांग दोघांच्याही आई वडिलांनी औरंगाबाद मध्ये थाटात नोंदणी पद्धतीने लग्न करून दिले ...

लग्ना नंतर प्रयेक मध्यम वर्गीयांचा सुरु होतो तसा भातुकलीचा संसार यांचा  सुरु झाला ,
पुण्या सारखे नवखे गाव, थोडीशी उत्साही , किंचित  बावरलेली… भाडोत्री घर , एकट्याचा पगार ... यात होणारी ओढाताण त्यामुळे असेल त्या गोष्टीत निभावून नेणे, हौशी मौजी ला मुरड घालणे ...  म्हणून हा भातुकलीचा संसार ....
भाऊ आणि वीणा ताई चा समाजकारणा मुळे मोठा गोतावळा .... घरात सतत पै पाहुणा .... कधी नातेवाईक तर कधी इतर कोणी.... आले गेल्याचे करणे ... छोट्या घरात संसार ...  ११-११ महिन्याला घर बदलत राहणे .... जीव मेटाकुटीला येत नसेल तर नवल ....

आर्थिक विवंचने मध्ये असताना  किंवा प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही माणसे कशी जोडता, या वरच संसाराचे भविष्य ठरते .... प्रारब्ध किंवा नियतीचे फासे पडताना या गोष्टी ना फार मोठं  महत्व असते ...

हळू हळू परिस्थिती बदलत गेली तिच्या  बँकेतली  नोकरी मुळे  घरा ला हातभार लागला   , प्रभास नोकरी मध्ये सर्वोच्य पदावर पोहोचले .... संसारात दोन मुले ... घर ..गाडी ... जावई सगळे सगळे  मिळाले ....

माझ्या सारखे अनेक जण तिच्या कडे राहिले आणि पुढील आयुष्याला निघून गेले... ....

समाजाच्या दृष्टीने एक सुखी समाधानी आणि यशस्वी कुटुंब !!!

यशस्वी किंवा सुखी कुटुंब असे किती सहज पणे मी लिहून गेलो ....  आज ऊन जाऊन सावली आली आहे .... उन्हाचे चटके इतरां करिता इतिहास जमा झालेत ... पण त्या आठवणी त्यांच्या मनात कुठे तरी असणारच ... 

प्रत्येकाच्या आयुष्यात एक हळवा कोपरा असतो .... तो स्वतः च जपायचा असतो   ....किती जरी जपला तरी एखादया बेसावध क्षणी जुने दुःख बाहेर येते ....पण ते क्षणिक असते ...  हे प्रत्येकाच्या बाबतीतच  होत असते ...

पु म्हणतात तसे संसार ही एक जबाबदारी असते. त्याचं ओझं व्हायला लागलं की गंमत जाते ... कदाचित हे तिला आणि प्रभास ना माहित असल्या  मुळेच अजूनही संसाराची जबादारी हे दोघे समर्थ पण सांभाळत आहेत

रंग गोरा ... दिसायला पक्की कोकणस्थी पण वागायला पूर्ण देशस्थी ....  ... खरेदीची प्रचंड आवड ... लक्षमी रोड , मंडई किंवा जुन्या पुण्याचा आमच्या करता चालता बोलता  गूगल मॅप ...

वाचनाची . सिनेमा किंवा नाटक पाहण्याची आवड ... स्वयंपाकात साक्षात अन्नपूर्णा....

जितका चेहरा हसरा  तितकाच बोलका ... पण प्रचंड  हळवी ..... बोलता बोलता टचकन डोळ्यात कधी पाणी येईल सांगता येत नाही....

माझ्या प्रत्येक सुख दुःखाच्या परिस्थितीत कायम बरोबर असणारी अंजु ताई .... तुझा आज वाढ दिवस .... तुला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वराला प्रार्थना !!!

- बिपीन कुलकर्णी




Monday, November 20, 2017

बंद सम्राट




"बंद सम्राट"                                                                                         २१ नोव्हेंबर २०१७

राजमान्य राजश्री युवराज श्री राहुल गांधींच्या राज्याभिषेकाची घोषणा काल झाली , ती आज ना उद्या होणारच होती... बातमी वाचल्या नंतर न कळत एक व्यक्ती डोळ्या समोर आली ... 

खरे तर त्यांची जडण घडण समाजवादी विचारसरणी वर झाली ... आयुष्य भर राजकारण आणि समाज कारण करीत असताना जेव्हढे प्रेम समाजवादा वर केले तेव्हढेच काँग्रेस आणि गांधी द्वेषा वर राजकारणात पायऱ्या चढत होते. भारतीय राजकारणातील त्यांचे योगदान विसरून चालणार नाही .....

आज  प्रकृती अस्वस्थे मुळे सक्रिय राजकारणातून दूर झालेत . महाराष्ट्राच्या  किंवा देशाच्या राजकारणाचा आढावा घेताना या श्रेष्ठ नेत्याला विसरता येत नाही

पक्ष किंवा पक्षाची भूमिका या विषयवार वाद होऊ शकतो , पण राजकारणातील योगदाना बद्दल नक्कीच नाही !

मातृभाषा तुळू  कोकणी ! मध्यम वर्गिय आई वडिलांच्या पोटी जून १९३० ला मंगळूर सारख्या ठिकाणी  जन्म, किंग जॉर्ज V हे आईचे दैवत त्या नावा वरून आपल्या मुलाचे नाव ठेवले जॉर्जसनातनी किंवा कर्मठ कुटुंब असल्याने आई वडिलाची इच्छा थोरल्या मुलाने धार्मिक शिक्षण घ्यावे, आणि त्या करिता वयाच्या सोळाव्या वर्षी बेंगलोर ला रवानगी , तिथे वर्ष शिक्षण घेतल्या  नंतर, काही गोष्टी मनाला पटल्या मुळे आलेल्या FRUSTRATION चा शेवट शिक्षण सोडण्यात झाला.

तिथून मजल दलमजल   करीत स्वारी मुंबई ला आली, सुरुवाती ची काही वर्षे चौपाटी च्या फुटपाथ वर पथारी, दिवस भर मुंबई मध्ये फिरून मिळेल ते काम करून पोटाची खळगी भरणे आणि हे करीत असताना एखाद्या चांगल्या  नौकरी चा पर्याय  पाहणे,

रात्री चौपाटी च्या समुद्रा च्या साक्षीने भविष्या ची स्वप्ने पाहणे!!

नोकरी मिळाली ती वर्तमान पत्रात प्रुफ रीडर चीत्या नोकरी ने त्यांना भविष्याची दारे उघडून दिली कारण प्रुफ रीडर चे काम करीत असताना संपर्कात आले त्या वेळचे नावाजलेले कामगार पुढारी "डिमेलो" आणि त्या नंतर डॉ राम  मनोहर लोहिया
या व्यक्तींचा आणि त्या नंतर मधु लिमये सारख्यांचा आयुष्यावर पगडा पडला तो कायमचाच…….

डिमेलो यांच्या अचानक निधना नंतर त्यांनी सर्व युनिअन सांभाळत अनेक युनिअन ची भर घातली घातली

इथून प्रवास सुरु झाला तो जॉर्ज ते जॉर्ज फर्नाडीस, एक  कामगार पुढारी ते,बंद सम्राट७० च्या दशकात ज्यांच्या एकट्याच्या इशार्यावर मुंबई ठप्प व्हायची

समाजवादी विचाराचा पगडा , राहणी अत्यंत साधी, झब्बा आणि कुडताप्रत्येक समाजवाद्याच्या  गळ्यात असते तशी शबनम! जाड फ्रेम चा चष्मा…. गेल्या ५० - ५५ वर्षात या राहणीत तसा काही फरक पडला नाही…. मग ते कामगार पुढारी असोत किंवा देशाचे संरक्षण मंत्री!!!

समाजवादी विचारा मध्ये व्यक्तिस्तोम नामंजूर आहेत्या मुळेच  समाजवादी विचारांचे राजकीय पक्ष व्यक्तीचे माहात्म्य कटाक्षाने टाळतात. डॉ राम मनोहर लोहीयांचा पगडा असलेले जॉर्ज सारखे लोक, आत्म आणि पक्ष्य स्तुती पासून कायम दूर राहिले

जॉर्ज यांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक, मोहक आहेच, तसेच तळागाळातील कार्यकर्त्या पर्यंत संपर्क आणि लोकांना त्यांच्या बद्दल वाटत असेलेला आपले पणा, त्या मुळेच कदाचित कोणीही सामान्य व्यक्ती त्यांचा उल्लेख एकेरी करू शकतो

ओघवती भाषा, बेधडक, निर्भयी अन् नि:स्वार्थी वृत्ती या मुळेच ६० - ७० च्या दशकात वेगवेगळ्या कामगार संघटना  उभ्या केल्या, त्यात सफाई कामगारा पासून, ते थेट रेल्वे युनिअन पर्यंत

कामगारांच्या मागणी करिता केलेला १९७४ चा रेल्वे चा संप   गाजलापूर्ण  देशातील रेल्वे सेवा जवळ पास ३० दिवस
ठप्प होती…  इंदिरा गांधीनि पण जॉर्ज चा धसका घेतला होता , आणि देशावर आणि बाणी लादताना रेल्वे संप हे पण एक मुख्य कारण होते….. याचेच पर्यावसान पुढे त्यांना बडोदा डायनामाईट केस मध्ये अडकवण्यात ... आणि हाता पायात बेड्या घालून अटक करण्यात झाले.

तुळु, कन्नड, मराठी, हिंदी, बंगाली, इंग्रजी अशा १० भाषा मध्ये  ते  केवळ संवाद नव्हे तर अस्खलित भाषण करू शकतमुंबई हि कर्म भूमी म्हणून तुरुंगात असताना मराठी शिकून घेतली.

जायंट किलर शब्द राजकारणात पहिल्यांदा बहुतेक जॉर्ज च्या बाबतीत वापरला गेला , जेंव्हा १९६७ च्या निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेस  चे का पाटील ना  दक्षिण मुंबई मध्ये धूळ चारलीत्य काळी का पाटील हे कॉंग्रेस मध्ये फार मोठे प्रस्थ होते
पारंपारिक मतदार संघ कायम बिहार मधील मुझफर्पुरपण निवडणूक वेग वेगळ्या मतदार संघातून लढले कधी मुंबई तर कधी बंगलोरबरेचदा अपयशाचा सामना करावा लागलासत्तेची कधीच हाव नसल्या मुळे हार जीत चा तसा काही फरक पडत नव्हता.

एके काळचा बंद सम्राट .... जाईंट किलर ....
माजी उद्योग, रेल्वे आणि संरक्षण मंत्री ...
मा. बाळासाहेबांना एकेरी " बाळ " या नावाने बोलू शकणारे जे काही बोटावर मोजण्या सारखे लोक होते त्या पैकी एक ....
संघ विचार सरणीचा विरोधक ...असे असून पण वाजपेयी च्या सरकार ला पाठिंबा देणारा समाजवादी ... त्याला कारण संघा च्या विरोधा पेक्षा काँग्रेस द्वेष जास्त होता !

आज अल्झायमर आणि पार्किन्सन्स ने त्रस्त , त्यातच घराच्या लोकांनी त्यांचा ताबा मिळावा म्हणून न्यायालयाचे दरवाजे ठोठावले ... 

समता पार्टी चे संस्थापक अध्यक्ष , संस्थापक अध्यक्षाला त्याच्याच पक्षातून बडतर्फ केल्याचे उदाहरण म्हणजे जॉर्ज .....

समाजवादी विचारसरणी इहवादी , त्या मुळे नियती ईश्वर अशा गोष्टींवर विश्वास नसतो पण एकेकाळच्या ह्या  लढवय्या ची  गेल्या काही वर्षात झालेली  गलित गात्र परिस्थिती नियती ची आठवण नक्कीच करून देते  ....  

त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा !!

- बिपीन कुलकर्णी 


                                                                                ____________________