Saturday, February 20, 2016

न येणारे पत्र !



न येणारे पत्र !



चि बिपीन ,                                                                                                                          २१ फेब्रुवारी २०१६

कसा आहेस बाळा ! तु किती जरी मोठा झालास तरी बाळच आहेस रे  माझ्या साठी … कारण तुझ्या जन्मा पासून पाहतेय तुला मी  …. किती भर भर जातो ना काळ ? एवढासा होतास आता चाळीशी ओलांडलीस

तुम्ही सगळे आपल्या संसारात व्यस्त पुण्या पासून अमेरिके पर्यंत कुठे कुठे स्थाईक झालात …फार आठवण येते रे तुम्हा लेकरांची … आजकाल  फार एकटे वाटते रे, बोलायला कोणी नसते ना !

अधून मधून तुम्ही सगळे येता दोन दिवस राहता आणि परत आपल्या कामाला निघून जाता त्या दोन दिवसाच्या आठवणी वर मी दिवस ढकलते …. तुमचा  दोष नाही रे  … तुम्ही तरी काय करणार ? तुमच्या नौकर्या , मुलांचे शिक्षण महत्वाचे … कळतेय मला

पण तुमची लहान मुले  , त्यांचा गोंधळ … त्यांचा आरडा ओरडा सगळे खूप हवे हवेसे वाटते रे … कोणी मला स्वार्थी म्हणेल … म्हणू देत     

तुमची आजची पिढी इमेल किंवा whats app वर बोलणारी , मला हे कुठले जमतेय , म्हणून म्हंटले पत्रच पाठवू …तेव्हढेच मन मोकळे करू …

माझे आणि तुझे नाते नक्की  काय असा प्रश्न पडू शकतो कोणालाही   ? सहवासाने  प्रेम निर्माण होते आणि वाढत  जाते  , त्या मुळे गेल्या ४० वर्षात तुझे आणि माझे प्रेमाचे नाते निर्माण झाले हा नक्कीच बादरायण संबंध नाही

कोण आहे मी तुझी ?

तुम्हा चार पिढ्यांना अंगा खांद्यावर वाढवले !!
सगळ्या  सुख: दुःखाची  बरोबरीने मूक  साथ दिली   !!

म्हणजेच ज्या  ४ भिंतीच्या आत राहून तुझी जडण घडण झाली ती  मी  …म्हणजे

 …… तीच ती मी तुमची वास्तू  " १६७ बल्वन्त बंगला "

आज असेच सगळे आठवले  … आणि थोडी हळवी झाले म्हंटले तुझ्याशी बोलून मन मोकळे करू … 

तुझ्या आजोबांचे फार उपकार आहेत माझ्यावर …

तुमचे नाते वाईक , मित्र मैत्रिणी सगळ्यांना ना आज माझे दिमाखात उभे राहणे दिसते …पण सुरुवातीला किती त्रास काढला कल्पना नाही त्या लोकांना

किती उन्हाळे पावसाळे रे  पहिले मी … झालि बघ पंचेचाळीस वर्षे …आली कि माझी पण पन्नाशीथकले नाही हा अजून मी …  

तुला सांगते ७० च्या दशकात औरंगाबाद मध्ये डॉ  ख्रिश्चन म्हणून एक भला माणूस होऊन गेला त्यांनी  शहराच्या बाहेर पडीक जमिनीवर प्लॉट  विकायला काढले, किंमत काय तर १ रुपया स्क्वेयर फूट  !आज लोक हसतील या किमतीला , त्या वेळेस लोकांचा पगार कितीसा असणार , तुझ्या आजोबांचा पगार होता रुपये १५० … केले त्यांनी धाडस आणि घेतली हि जागा एकूण ३६०० स्क्वेयर फूट आणि किंमत रुपये ३६०० … ते पण हप्त्याने … 

आजच्या सारखे त्या वेळेस बँका कर्ज देण्या करिता मागे लागत नव्हत्या … पण आजोबांनी धाडस केले आणि  कष्टातून मला उभे केले …. तुझे वडील आणि काका पण फार हौशी … त्यांनी पण मला बांधताना सगळ्या गोष्टींचा विचार केला

सुरुवातीला पैशाची ओढाताण करून छोटे टुमदार घर बांधले … ४ खोल्या , पुढे अंगण, बाग , तुळशी वृंदावन ।  मागच्या बाजूला परत बाग आणि विहीर त्या वेळेस पाण्याची दुसरी काही सोय नव्हती , म्हणून विहीर करावी लागली
बागेत दोन  उंच अशोकाची झाडे होती … तुम्ही काय म्हणता त्याला landmark का काय तशी होती ती दोन झाडे  होती  , त्या दोन झाडा मुळे लांबून घर दिसायचे?  बागेत निरनिराळे गुलाब, जास्वंदी चे अनेक प्रकार , रात राणी , क्रोटन अशी अनेक झाडे  … तुझ्या बाबा ना फार आवड बागेची

आजोबांची फार ओढाताण झाली मला आकाराला नेताना , सुरुवातीचे बांधकाम २८००० रुपयात झाले … मग हळू हळू मागचे घर बांधले तिथे अनेक कुटुंबे राहून गेलीत नंतर म्हणजे ९० च्या दशकात  वरचा दुसरा मजला बांधला  

सांगितले तर खोटे वाटेल , सुरुवातीला काही वर्षे घरात लाईट नव्हते , आई काकू चे रोजचे काम  कंदील साफ करून ठेवायचे

किती स्ठीतंतरे मी पहिलीत ,

एका ओळीत सांगायचे तर बंब तापविण्या पासून सोलर गिझर पर्यंत आणि कंदिलाच्या दिव्या पासून थेट LED  पर्यंत  

तुमच्या चार पिढ्यांचे  खूप प्रेम मिळाले मला  …

जशी घराला घर पण देणारी माणसे असतात तशी माणसाना  प्रेम देणारी वास्तु  पण असू शकते  ना  ?

इंग्रजी मध्ये दोन चांगले शब्द आहेत "होम" आणि "हाउस" , मराठीत त्या दोन्हीला प्रतिशब्द  मला तरी माहिती नाही कुठलीही इमारत " हाउस " असू शकते ,पण प्रत्तेक इमारत होम होऊ शकत नाही.
"होम" म्हणजे ज्या वास्तूत आपण वाढलो, मोठे झालो , अनेक आठवणी  जडल्या आहेत … आणि मुख्य जिथे आपले पणाची भावना असते अशी ती  जागा.

आता तूच ठरव मी तुझ्या करिता होम आहे का हाउस ?

तुमच्या सुखात आनंदाने नाचत होते   त्याच वेळेस दुखाने : कधी हुंदके देत  आक्रोश करीत होते …

काय नाही पहिले …तुझा जन्म,मुंज, लग्न इतकेच काय तुझ्या मुलांचा जन्म, त्याची मुंज … तसेच तुझ्या बायकोला सामावून घेतले माझ्या मध्ये   ! या  प्रत्येक क्षणी आनंदाने बेहोष होत होते  …तुमचा आनंद तो माझा आनंद आनंदाच्या क्षणी तुम्ही देवाला करिताना वास्तूला म्हणजे मला वंदन करीत होता मी फक्त तथास्तु म्हणत होते । 

दिवाळी किंवा लग्ना कार्यात माझ्यावर केलेली विद्द्युत रोषणाई मला एक प्रकारची श्रीमंती देवून गेली … जणू माझ्या अंगावर पैठणी चढवली असे वाटे

नरसिंह जयंती ची धामधूम , " गणपती बाप्पा मोरया " ची आरोळी , सजून धजून येणाऱ्या गौरी … दिवाळीतील फटाक्याची आतष बाजी , दारात केलेला किल्ला माझ्या शिरावर डौलात उभी केलेली गुढी … अशा असंख्य आठवणी आहेत … तुम्ही सर्वांनी मला कृतकृत्य केलेते …

जसे आनंदाच्या क्षणी तुमच्यात  होते तसेच दुखा:त पण तुमच्या बरोबरीने होते … घरातील व्यक्तींचा म्हणजे आजोबा आणि काकांचा मृत्यू पहिला …  माझा प्रत्येक कोपरा आसवे गाळत होता आणि  आक्रोश करीत होता 
काल पर्यंत माझ्यात  असणारा  माणूस , आज एकदम  माझ्याच  अंगावर म्हणजे भिंतीवर  "फोटोत" विसावतो तेंव्हा काय करावे कळत नाही  … माझे दुख:कळणार नाही रे तुम्हा माणसाना …   तुझे व पु म्हणतात तसे आपले बोलणे  समोरच्या पर्यंत न पोहोचणे हि शोकांतिका जास्त भयाण असते …

असो मी जास्तच हळवी होते आज काल , तुला दुखवायचा हेतू नाही … पण बोलले कि मन हलके होते ना म्हणून

आता एकूणच आपल्या आजूबाजूला फार गर्दी झाली आहे , नुसते सिमेंट चे जंगल एके काळी लांबून अशोका च्या झाडा मुळे ओळखू येणारी मी आता जवळ आले तरी दिसत नाही चालायचेच " कालाय तस्मे नमः "

आता अशोकाची झाडे राहिली नाहीत , विहीर नाही … नरसिंह जयन्ती असो किंवा गणपतीतील किंवा दिवाळी ची   धामधूम पण पूर्वी सारखी राहिली नाही …

नित्य नियमाने देवा  समोर तिन्ही सांजेला दिवा लावला जातो पण पूर्वी सारखा  " शुभं करोति " चा आवाज काही घुमत नाही ….

अंतुबर्वा च्या भाषेत सांगायचे तर आजोबा गेले आणि परत रातराणी कधी फुललीच नाही बघ  ….

असो … मुलांना आणि तुझ्या बायकोला आशीर्वाद आयुष्यात मोठे व्हा , सगळी स्वपने पूर्ण करा पण  एक नेहमी लक्षात  ठेवा          " वास्तू म्हणत असते  तथास्तु "

वरचे वर येत राहा …

तुझीच -


वास्तू  "१६७ बलवंत बंगला "




Friday, February 5, 2016

श्राद्ध कर्म - श्रद्धा , शास्त्र कि कर्मकांड ?



श्राद्ध कर्म - श्रद्धा , शास्त्र कि कर्मकांड ?                          ५ फेब्रुवारी २०१६

आपल्या समजात "श्राद्ध कर्म" श्रद्धा म्हणून करणारा एक वर्ग आहे , तसेच  या गोष्टीला थोतांड समजून अंधश्रद्धेचा आधार देणारा दुसरा वर्ग आहे.
दोनही वर्गांचे त्या बाबतीत काही ठोकताळे आणि वाद विवाद असतात.
श्रध्ये आणि अंध श्रध्ये मध्ये एक बारीक रेषा असते …. जेंव्हा शास्त्राचा आधार प्रमाण असतो तेंव्हा ती श्रद्धा , नसता अंधश्रद्धा !
या लेखाचा उद्देश "श्राद्ध कर्मा " मागील शास्त्र समजून घेणे , माझा या विषयावर अधिकार नाही , पण वेग वेगळ्या वाचनातून जसे समजत गेले  ते एकत्रित करणे हा उद्देश … काही उणीवा / चुका असतील तर जाणकारांनी प्रकाश टाकावा …
हा विषय एकूणच खूपच  गहन अहे.
_____________________________________________________________________________________________________
प्रथम अध्यात्मा नुसार मानवी देहाची रचना समजून घेणे महत्वाचे … हा देह एकूण ४ विभागात वाटला गेलेला आहे  - स्थूल देह म्हणजे कि "शरीर" , मनोदेह म्हणजे " मन ",  कारण देह म्हणजे " बुद्धी " आणि महाकारण देह म्हणजे " अहम "

शास्त्रानुसार मनुष्याचे शरीर पाच तत्व - अग्नी, पाणी, पृथ्वी, वायू, आकाश या पासून निर्माण होऊन शेवटी त्यात विलीन होते … मृत्यू पश्चात स्थूल देह तर पंच तत्वात विलीन होतो , पण त्याच वेळेस बाकी इतर देह म्हणजे " मन , बुद्धी आणि अहम " एकत्रित पणे बाहेर पडतात त्याला " लिंगदेह " म्हणतात …
हा लिंग देह अनंताच्या प्रवासाला निघतो !

अध्यात्मा नुसार या लिंग देहाला पुढच्या प्रवासाला गती मिळावयास हवी , त्या करिता तो देह हलका असणे महत्वाचे … भौतिक शास्त्रा च्या नियमा नुसार जडत्व आणि गती एकदुसर्याला पूरक !

लिंग देहात जितक्या इच्छा  , आकांक्षा , वासना राहिल्या असतील त्या वर त्याचे  जडत्व ठरते , आणि जितके जडत्व तितका पुढचा प्रवास कठीण होत जातो … यालाच सदगती न मिळणे असे म्हणू शकतो.

गेलेल्या व्यक्ती ला श्रद्धांजली वाहताना " आत्म्याला सदगती मिळो " अशी प्रार्थना करण्या मागचे हे शास्त्र !

श्राद्धकर्म  म्हणजे  लिंग देहाचे जडत्व कमी करून पुढच्या प्रवासाला शक्ती देण्याचा विधी ….
याच कारणामुळे मृत्युनंतर वर्षभर आणि त्यांनतर मृत व्यक्तीला जन्म-मरणाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी श्राद्धकर्म केले जाते.

दिवसाचे पाच भाग केल्यानंतर चवथ्या भागाला अपराह्नकाल म्हणतात. त्या वेळेत श्राद्ध करतात , ती वेळ म्हणजे दुपारी १२ नंतर ची .

श्राद्ध विधीतील काही विधी मागील शास्त्र -
श्राद्धामध्ये भाताच्या पिंडाचे महत्व -

तांदूळ हा सर्व समावेशक पदार्थ , तांदुळाचा जेंव्हा भात करतो तेंव्हा त्याची आर्द्रता वाढते
ज्या वेळी दहाव्या दिवशी मृतदेहाला आवाहन करून भाताचा  गोल बनवून त्यावर संस्कार केले जातात, त्या वेळेस पिंडात लिंग देहातील लहरींचे आगमन होते लिंग देहाचे प्रतिक म्हणून भाताच्या पिंडाचे महत्व आहे.

पिंड हा केवळ भाताचा नसून त्यात सर्व अन्नातील थोडा थोडा भाग घेण्याची पद्धत आहे ,

जडत्वा ला आसक्ती हि कारणीभूत असते , आसक्ती मागे अन्न पदार्थांचा वाटा सगळ्यात मोठा , प्रत्येक जिवाची अन्नाविषयीची आवड-निवड वेगळी असते. या सर्व आवडींचे निदर्शक म्हणून गोड, तिखट अशा प्रत्येक चवीतील पदार्थांनी युक्त असलेल्या अन्नांतील थोडा थोडा भाग घेऊन त्याच्या साहाय्याने पिंड बनवायची पद्धत आहे.

मधातून थंडावा निर्माण होत असल्या मुळे त्यात लहरी आकर्षित होऊन , पिंडा मध्ये वास्तव्य करितात म्हणून मधाचे महत्व.

तांदुळाच्या खिरी चे महत्व -
श्राद्धामध्ये पितरांना नैवेद्य दाखवून त्यांना संतुष्ट करण्यासाठी गोड पदार्थ म्हणून तांदुळाची खीर बनवतात. यात वापरलेल्या पदार्था मध्ये  साखर हा मधुर रसाचे दर्शक, दूध हे चैतन्याचा  व तांदूळ हे सर्वसमावेशक म्हणून वापरले जातात.

दर्भाचे महत्व -
`दर्भ हि  चपळता किंवा जलदता निर्माण करणारी वनस्पती  , म्हणून दर्भाच्या  साहाय्याने विधी केला असता, त्यातून प्रक्षेपित होणार्‍या लहरींमुळे श्राद्धातील प्रत्येक विधीला गती मिळते आणि त्यायोगे लिंग देहाला पुढची गती प्राप्त करता येते.

सव्य आणि अपसव्य -
उजव्या खांद्यावर सूर्य नाडी आणि डाव्या खांद्यावर चंद्र नाडी असते. सुर्य नाडी कर्तव्य दक्ष असते आणि कर्तव्य पार पाडण्यास भाग पाडते अथवा प्रवृत्त करते.

पितृ ऋणातून मुक्त होण्या साठी "अपसव्य" करून पितरांची जबादारी घेण्या करिता उजव्या खांद्या वर जानवे घेतले जाते. डावी किंवा चंद्र नाडी तटस्थ असते. ती प्रत्येक कर्म करीत असताना व्यक्तीला तटस्थ ठेवते. त्या मुले इतर वेळेस जानवे डाव्या खांद्या वर ठेवून  सव्य केले जाते.

इतर काही गोष्टी - 

श्राद्धासाठी एकच ब्राह्मण मिळाल्यास त्याला पितृस्थानी बसवून देवस्थानी शाळीग्राम अथवा बाळकृष्ण ठेवावा
·         श्राद्धात रांगोळीच्या भुकटीने रांगोळी काढू नये
·         श्राद्धामध्ये रांगोळी भस्माने काढावी
·         श्राद्धाच्या दिवशी जेवल्यानंतरही चूळ भरू नये

आपल्या धर्मात या बद्दल बरेच काही लिहून ठेवले आहे , कुठलेही कर्म करीत असताना त्या मागील शास्त्र समजून केले  तर फलनिष्पत्ती लवकर होते !

महाभारत आणि रामायणात पण श्राद्ध कर्माचे दाखले आहेत , त्या मुळे हि अंधश्रद्धा तर नक्कीच नाही.

शेवटी काय श्रद्धापूर्वक केलेले कृत्य म्हणजे श्राद्ध !

अजूनही बरीच अनुत्तरीत प्रश्ने आहेत, त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न पुन्हा कधी …

बिपीन कुलकर्णी

(संदर्भ - धर्मसिंधु , निर्णय सिंधू , सनातन आणि इतर )