Thursday, September 29, 2016

सूर्यास्त

२९ सप्टेंबर २०१६

सूर्यास्त

आज पुन्हा एकदा  मृत्युलेख लिहिण्याची वेळ माझ्यावर आली...गेल्या दीड  वर्षात तिसरा मृत्यू लेख  !!
 प्रा. पुरुषोत्तम राव कुलकर्णी यांचे २५ सप्टेंबर ला हैदराबाद ला निधन झाले , निधन हे नेहमीच दुःखद असते त्या मुळे " दुःखद निधन " या शब्दाच्या जोडाची गरज नसते. नात्याने माझे सासरे , बागेश्री चे वडील !

त्या बहीण भावंडावरील पितृछत्र हरपले, आपण वयानी किती जरी मोठे झालो तरी आई आणि वडिलांच्या प्रेमाची सर कशालाच येऊ शकत नाही

मृत्यू लेख वाचणे जवळच्या लोकां करिता अतिशय त्रासदायक असते, कारण  ते  जखमे वरची खपली काढण्या सारखे असते ....  हे  लेख गेलेल्या व्यक्ती च्या प्रति  कृतज्ञग्नता व्यक्त करण्या करिता लिहिले जातात, पण खरे सांगायचे तर मी माझ्या समाधान करिता लिहीत आहे... कारण कृतग्नता व्यक्त करून त्याच्या ऋणातून मुक्त न होता मला आजन्म त्यांच्या ऋणात राहायचे आहे.   

जवळची  व्यक्ती फक्त फोटो पुरता उरणे  किंवा काल पर्यंत "श्री" लिहिलेल्या व्यक्ती ला आज "स्व" अथवा  "कै" संबोधणे म्हणजे काय ? त्याचे दुःख फक्त जवळच्या व्यक्तीच समजू शकतात...

या कुटुंबियांचे दुःख एवढे मोठे आहे ... कुठल्याही शब्दात त्याचे सांत्वन होऊ शकत नाही ... व पु म्हणाले तसे सांत्वन हि दुःखाची आई आहे ... मुलं हे आई पेक्षा मोठे होऊ शकत नाही तसेच सांत्वन दुःख हलके करू शकत नाही ....    

कुलकर्णी कुटुंब बिनोलीचे म्हणून बीनोलीकर कुलकर्णी , पूर्ण हयात आंध्र प्रदेशात गेली , लहान पण शिक्षण , नोकरी सगळेच... त्यांचा जन्म बसोले  कुटुंबात झाला , काही कारणा मुळे लहानपणीच  कुलकर्ण्यांकडे दत्तक गेले.
वडील आयुर्वेदिक डॉक्टर , निझाम संस्थानात चांगले नाव कमावलेले , मुलांनी पण डॉक्टर व्हावे हि इचछा ,पण नियती च्या मनात नसावे ... पितृ छत्र लवकर हरपले !! त्या मुळे व्यावहारिक जाबदाऱ्या लहान वयात डोकयावर आल्या आणि स्वप्न हवेत विरले...

शिक्षण पूर्ण करून नोकरी करणे एक मेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून , शिक्षकी पेशा स्वीकारला...   निझामाबाद सारख्या थोड्या आडवळणाच्या ठिकाणी स्थायिक झाले... मध्यम वर्गीय राहणी, आचार आणि  विचार सगळ्यात माध्यम वर्गीय झाक... 

समाज नियमा प्रमाणे लवकरच दोनाचे चार हात झाले , समंजस जोडीदार मिळाला ...

सुखी संसाराचा  असा मंत्र नसतो ! खरे तर तो  ज्याचा त्यानेच शोधून काढायाचा असतो .समजूतदार पणा आणि समतोल राखायची वृत्ती असेल तर संसार सुखीच होतो, त्या प्रमाणे यांचा संसार खरेच सुखी आणि समाधानी झाला...
याचा अर्थ आयुष्य साधे सरळ नव्हते , आर्थिक , प्रापंचिक अडचणी या तर मध्यम वर्गीयाच्या पाचवीला पुजलेल्या
आयुष्याच्या मार्गावर खाच खळगे येणारच पण त्या परिस्थितीतून मार्ग काढणे  हे महत्वाचे ...

कुमार गंधर्वां नि गाऊन ठेवले आहे तसेच आयुष्य होते या दोघांचे ,

कधि जवळ सुखाने बसलो
दुःखात सुखाला हसलो
कधि गहिवरलो, कधि धुसफुसलो

येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला धीरा ने तोंड देत दिवसा वर दिवस  जात होते  ....निझामाबाद ला ज्या घरात भाडेकरी म्हणून राहत होते तेच घर विकत घेतले , शेती वाडी जमीन सगळे झाले…… काळ धावत होता

मुला मुलींची लग्ने केली ...  प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पाडत होते…
निवृत्ती नंतर नांदेड ला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला... तिथे हौसेने घर बांधले ... ४ खोल्याचे टुमदार घर ...समोर बगीचा... नंतर वय वाढले तसे हैदराबाद ला मुला आणि सुने बरोबर राहू लागले...

साधारण उंची ,बारीक अंग काठी , मागे वाळविलेले केस  ह्या रूपात फारसा कधी फरक पडला नाही  शेवटच्या दिवसात चालताना काठीचा आधार घ्यावा लागत होता. ... तेव्हढाच काय तो फरक

राहणी  अत्यंत साधी ... कायम Full Sleeves चा शर्ट आणि डार्क रंगाची पॅन्ट हे  बाहेर जातानाचे कपडे , घरात असताना पांढरे स्वछ बाह्यांचे बनियान आणि पांढरे धोतर ... मला आठवते तसे कायम हेच कपडे....

खाण्यात विशेष अशा काही आवडी नव्हत्या ... अन्न हे पूर्ण ब्रम्ह म्हणत पानात असेल ते खाणे पण  गोड पदार्थ विशेष आवडत...

मराठी , हिंदी, इंग्रजी , उर्दू , तेलगू या भाषांवर प्रभुत्व .... वाचनाची .... अध्यात्माची आवड आणि परिपूर्ण माहिती ...

साधारणतः  मनुष्य दोन प्रकारचे असतात ... एक भविष्यात वावरणारे किंवा भूतकाळात रमणारे ... सर्व साधारण माणूस वर्तमानात रहात नसतो .... ती कला असते फक्त माहात्म्यांकडे अथवा योगी पुरुषांकडे !
तर यांचा स्वभाव भूतकाळात रमणारा ... नातवंडांना किंवा प्रत्येकाला जुन्या आठवणी सांगणे , जुन्या आठवणी लिहून काढणे , जुने फोटो जमा करणे , जुन्या गाण्यांचा संग्रह करणे ... अशा एक ना अनेक आवडी ... 

दिवसा वर  दिवस जात होते ...  मुली -जावई , मुलगा - सून यांच्या संसाराला जमेल तसा हातभार लावत  ... चार चौंघां सारखे सुखी समाधानी आयुष्य जगणे चालू होते  ... 

आयुष्यात प्रत्येकाच्या काही श्रद्धा असतात , श्रद्धा म्हणजे जिथे माणूस नतमस्तक होतो किंवा प्रत्येक न सुटलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्या करिता विश्वासाने जातो , मग ते ईश्वराचे कुठलेही रूप असेल अथवा योगी असेल किंवा कोणी महापुरुष असेल ... यांचे श्रद्धेचे स्थान अवतार मेहेर बाबा ... पराकोटीची श्रद्धा ... त्यांच्या श्रद्धेने प्रत्येक कठीण प्रसंगात तारून नेले... 

वय वाढण्या बरोबर प्रकृतीच्या कुरुबुरी चालू झाल्या....  जन्म मरणाचा फेरा हा कोणाला चुकलाय ? त्याच नियमाने त्यांनी शेवटचा श्वास घेतला....   

मला "बिपीन राव म्हणणारे २ जण , एक माझे सासरे कायम तोंड भरून म्हणत होते  आणि दुसरा माझा काका मूड मध्ये असताना नेहमी बिपीनराव म्हणून हाक मारायचा ...  नियती ने एका पाठोपाठ दोघांना हिरावून घेतले ...  कालाय तस्मै नमः!!! दुसरे काय ?

वडील धाऱ्याचे जाणे हा त्या घरा वरचा सूर्यास्त च असतो , ह्या कातर वेळेला धीराने तोंड देण्याचे बळ मिळो आणि आत्म्याला  सदगती मिळो  , हीच ईश्वराला प्रार्थना !!


बिपीन  कुलकर्णी

Tuesday, September 20, 2016

तू चाळीशीची झालीस .....


२१ सप्टेंबर २०१६

तू चाळीशीची झालीस ..... 

प्रिय पिंकी,

आज तुझा चाळिसावा वाढदिवस , म्हणता म्हणता चाळीशीची झालीस ... सर्व प्रथम तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ...

काय कोण जाणे असे वाटले या वर्षी तुला पत्र लिहावे , त्याचे मुख्य कारण , आज एवढ्या वर्षात  तुला उद्देशून असे कोणी पत्र लिहिले नाही आणि मी पण असे पत्र तुला कधीच लिहिले नव्हते …  आमच्या करिता मोबाईल, मेल चा जमाना  ... हो आमच्या करिताच ... तु मात्र चाळीसाव्या वर्षा ला पोहोचलीस पण अजूनही तशीच लहान निष्पाप आहेस ...

मनातील भावनाना वाट मोकळी करून देण्या करिता पत्रा सारखे माध्यम नाही , ई-मेल किंवा मोबाईल मधून भावनेचा ओलावा पोहोचूच शकत नाही,  म्हणून हा पत्र प्रपंच !! माझे पत्र तुला नक्कीच कोणीतरी वाचून दाखवेल आणि मला माहिती आहे  मला जे सांगायचे आहे ते तुझ्या पर्यंत पोहोचेल  .

जगाच्या दृष्टीने तु " स्पेशल चाईल्ड " पण माझ्या करिता कायम लहान  बहीणच  असणार आहेस .... 

तुम्हाला स्पेशल म्हणणे योग्य आहे का  ?, स्पेशल म्हणण्याची खरेच गरज आहे का ? याचे उत्तर प्रत्येकाचे स्वतंत्र असू शकते ….म्हंटले तर हो म्हंटले तर नाही , मला विचारशील तर त्याची गरज नाही , कारण स्पेशल म्हणून तुम्हाला आम्ही मुख्य प्रवाहा पासून वेगळे करतो ना . स्पेशल किंवा नॉन स्पेशल पेक्षा एक माणूस म्हणून एक दुसऱ्या कडे पाहण्याची आज खरी गरज आहे ,

मला एक सांग “स्पेशल” नाव दिल्याने खरेच कधी स्पेशल वाटले का ग तुला.... असो… तुला पत्र लिहायचे ठरविले तेंव्हा असे अनेक विचार मनात यायला लागले, आणि कुठून आणि कसे सुरु करावे हेच कळेनासे झाले ...

प्रत्येक स्री पुरुषाच्या आयुष्यात पहिल्या मुलाचा जन्म हा सर्वात आनंदाचा क्षण असतो , पण कधी कधी आनंद आणि आव्हाने एकत्र येतात , “आई-आबा” सारखे असंख्य आई वडील आहेत ज्यांनी हि आव्हाने लीलया पेलली आहेत... स्पेशल मुलां करिता स्पेशल आई वडील नसतात तर नियती आई वडिलांना स्पेशल करीत असते ... त्या मुळे आज तुझ्या शुभेच्छांच्या  बरोबरीने आई आबा च्या ध्येया शक्तीला दंडवत !!!

तुझ्या जन्मा नंतर तसा मी फार मोठा नव्हतो , त्या मुळे आई आबा तुला वाढवत असताना होणाऱ्या त्यांच्या मनस्थिती ची मला जाणीव नव्हती , पण आज जेंव्हा मी स्वतः वडील झालो तेंव्हा मुलांना वाढवत असताना  कळते , किती वेगवेगळ्या परिस्थितीतून ते गेले असतील.  Hats off to them !!!

असे म्हणतात सामान्य मनुष्याचे वय आणि बुद्धी बरोबरीने वाढत जाते , आम्हा लोकांचे वय आणि  बुद्धी दोनही वाढत गेले  ग ... पण तुला कल्पना येणार नाही, त्याच्या  बरोबरीने अनेक समस्या वाढत गेल्या  , करिअर च्या मागे लागून आयुष्य घडाळ्याच्या काट्यावर नेले , संसाराचे खाच खळगे अनुभवताना  कधी  पैसे कमावण्याचा ताण तर कधी ऑफिस किंवा नात्यातील हेवे दावे या मध्ये आयुष्य खर्च होत गेले ... काय चूक आणि काय बरोबर याचा विचार आम्ही प्रत्येक वेळेस करतोच असे नाही.

आता हेच बघ ना  अध्यात्म सांगते, ईश्वराने  मनुष्याला आनंदी, शांत आणि प्रेमळ हे स्वभाव विशेष  जन्मतः दिले आहेत...  आज आहोत का आम्ही शांत ?आहोत खरेच आम्ही आनंदी  ?...  प्रत्येक क्षणाला आजूबाजूच्या घडणाऱ्या छोट्या मोठ्या घटने मुळे  स्वभावात होणारे चढ उतार ... व्यक्ती सापेक्ष वागणारी आम्ही माणसे … या सगळ्या मुळे किती जण राहू शकतात खरेच आनंदी आणि शांत ?

स्पेशल म्हणजे नक्की काय ग? जे प्रमाणा नुसार नाही किंवा सामान्य नाही तेच स्पेशल ना ? आता तूच सांग प्रमाणा नुसार आम्ही आहोत का तू ? आम्ही असतो तर आमचे आयुष्य शांत आणि आनंदी नसते का झाले? प्रमाणाच्या सिद्धान्ता नुसार मग स्पेशल कोणाला म्हणायचे तुला का आम्हाला ?

प्रत्येक गोष्टीत स्वार्थ पाहणारे किंवा दुसऱ्यांवर  अपेक्षांचे ओझे टाकणारे आम्ही आणि दुसऱ्या बाजूला प्रत्येक छोटी मोठी गोष्ट निरपेक्ष करणारी तू ? कोण आहे खरेच स्पेशल ?

अगं साधी गोष्ट आम्ही लोक देवाला नमस्कार करीत असताना नकळत देवा कडून पण  अपेक्षा करीत असतो .... जिथे आमच्या अपेक्षेतून देव सुटत नाही तिथे इतरांचे काय बोलणार ? दुसरी कडे निरपेक्ष पणे इमाने इतबारे देवाला नमस्कार करणारी तू ... काय मागतेस ग देवाला ?

मला विचारशील तर खरे आम्हीच आहोत स्पेशल चाईल्ड!!! नॉर्मल तर तू आहेस ... जाऊ दे...

वाढ दिवस म्हणजे कौतुकाचा दिवस , ३६५ दिवसा पैकी असा एक दिवस कि ज्या दिवशी लहाना पासून मोठ्यानं पर्यंत प्रत्येक जण  कळत किंवा नकळत कौतुकाची अपेक्षा करीत असतो  आणि  त्याला तू खरेच  अपवाद आहेस .... अपेक्षा न करिता मिळालेल्या शुभेच्छा चे महत्व काय असते याचा मला तरी अनुभव नाही ... तू तर हा अनुभव नेहमीच घेतेस .... या वर्षी तर तू अमेरिकेत आहेस ... मस्त केक कापून वाढदिवस साजरा कर...

पिंकी बेटा  तू तर अर्धे जग पाहिलेस ग , अमेरिका असेल किंवा  यूरोप म्हण , सिंगापुर , मलेशिया, थायलंड  एक ना अनेक देश फिरलीस ... भारत पूर्ण  पाहून झाला .... हे असे प्रत्येक मुलाच्या नशिबात नसते ना  ... मग का म्हणू मी तुल स्पेशल चाईल्ड ?

तुला माहिती का पिंकी, २१ सप्टेंबर ला करीना कपूर चा पण वाढदिवस असतो , तुझ्या पेक्षा कदाचित ३- ४ वर्षांनी लहान असेल. पण तुला सांगतो  आपला आणि कोण्या सेलेब्रिटी चा वाढ दिवस एका दिवशी हि कल्पनाच वेगळी असते ग ... मला विचारशील तर करीना खरेच भाग्यवान  आहे कारण तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी ती जन्माला आली... 

चाळीशी म्हंटले कि सामान्य माणसाच्या काळजात धस्स होते कारण  त्या नंतर येणारे आजार, लागणारा चष्मा , वय वाढल्याची जाणीव या मुळे आयुष्या कडे पाहणायचा दृष्टिकोन बदलू शकतो , पण खरे सांगतो असे काही नसते, सकारात्मक दृष्टिकोन या सगळया चिंता पासून लांब ठेवतो , तू तर अजून खूप लहान आहेस.... आणि या सगळ्या पासून खूप दूर आहेस... त्या मुळे जास्त विचार करायचा नाही... जशी आहेस तशीच रहा…

जेंव्हा तुझ्या सारख्या मुलांचा विचार करतो  आणि मग आठवते …अबुली मामाजी नावाच्या तुझ्या सारख्या एका स्पेशल चाईल्डने पूर्वीच बॉलीवूड मध्ये पदार्पण केले  आहे , गौरी गाडगीळ ने इतिहास घडवलाच आहे... पुण्यात ऋचा चितळे नावाची ११ वर्षाची मुलगी , भरत नाट्यम च्या परीक्षे मध्ये यश मिळवतेय... आदित्य सुब्रमण्यम म्हणून मुंबईचा मुलगा हॉटेल रामदा प्लाझा या पंचतारांकित हॉटेल मध्ये नोकरी करतो , आणि त्या हॉटेल ची मॅनेजमेंट सांगते " Children with Down’s Syndrome make great employees. They do not need any distractions like tea break, or smoke break. They work continuously,”

.या पेक्षा मोठे कौतुक काय हवे ? अशी एक ना अनेक उदाहरणे .... मग  प्रश्न पडतो स्पेशल तु का मी ?    

तुला सांगतो पुण्यात आदित्य तिवारी नावाच्या एका सॉफ्टवेअर इंजिनीर ने  डाउन सिन्ड्रोम चाईल्ड दत्तक घेऊन इतिहास घडविला  , त्यात पुन्हा तो सिंगल पॅरेण्ट .... खरेच जग  बदलत आहेत , चांगली सुरुवात आहे... 

एक संस्कृत सुभाषित आहे,

आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम्
सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति

याचा अर्थ आकाशातून पडणारे पाणी समुद्राला जाऊन मिळते, किंवा एका देवाला केलेला नमस्कार सर्व देवां पर्यंत पोहोचतो , त्या प्रमाणे हे तुला लिहिलेलं पत्र ,तुझ्या सारख्या सर्व निष्पाप मुलां पर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा करतो….

व पु म्हणतात तसे आयुष्यात बालपणच फक्त सुखाचे असते कारण ते अहंकार आणि अपेक्षां पासून खूप लांब असते, ... अशीच निष्पाप आनंदी आणि भाबडी राहा.... 

तुला उदंड आणि निरोगी आयुष्य मिळो हीच आज ईश्वर चरणी प्रार्थना !!

तुझाच

दादा


(बिपीन कुलकर्णी )