Sunday, September 23, 2018

गोष्ट भैरवी ताईची ...


भैरवी पुरंदरे या व्यक्ती बद्दल एकूणच कुतूहल होते.. कोण आहेत या भैरवी पुरंदरे ?

एखाद्या गोष्टी बद्दल आत्मीयता असेल आणि ती गोष्ट पूर्ण करण्याचा ध्यास घेतल्यावर पडणाऱ्या कष्टाची फिकीर केली नाही कि अशक्य काहीच नसते याचे उदाहरण म्हणजे भैरवी पुरंदरे.

वयाच्या विसाव्या वर्षी पासून गेली तब्बल ३० वर्षे जाणता राजा मध्ये करीत असेलेल्या जिजाबाई म्हणजेच भैरवी ताई ... पण खरे तर त्यांची ओळख याहून किती तरी मोठी आहे. 

गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये त्यांच्या मॉडेल कॉलोनी मधील प्रशस्त फ्लॅट मध्ये भेट आणि गप्पा झाल्या आणि गप्पां मधुन  भैरवी पुरंदरे उलगडत गेल्या ...

वडिलांची फिरतीची  नोकरी , त्या मुळे शिक्षण अनेक ठिकाणी झाले ... दहावी हुजुरपाग मधून झाले, वाचनाची लहान पणा पासून आवड ... जे मिळेल ते वाचत गेल्या , आई मुळे अगदी लहान वयात ज्ञानेश्वरी वाचुन काढली... एकूणच या वाचन संस्कार मुळे विचार प्रगल्भ झाले आणि पुढील आयुष्यात याचा खूप उपयोग झाला ...

१९८५ साली अगदी चहा पोहे खाऊन भैरवी रानडे बनल्या भैरवी पुरंदरे ... 

महाराष्ट्रात  पुरंदरे या आडनावाला एक वलय आहे , त्याला कारणही तसेच ... ज्यांनी शिवछत्रपतींचे  चे चरित्र लिहिण्या आणि सांगण्या करिता आयुष्य वेचले , ते महाराष्ट्र भूषण आदरणीय बाबासाहेब पुरंदरे.... अशा घरातील जेष्ठ सुनबाई म्हणजे भैरवी ताई ...  

तसे पाहता बाबासाहेबांची सून होणे सोपेही नव्हते आणि म्हंटले तर अवघडही नव्हते... सोपे या करता नाही की बाबासाहेब या नावाला महाराष्ट्रात असलेला आदर ... आणि अवघड अशा मुळे नव्हते की बाबासाहेबां मध्ये असलेला प्रेमळ पिता... पण कुटुंबात येताना भैरवी ताई थोड्या बावरलेल्याच होत्या , पण पुरंदरे कुटुंबीयांनी त्यांना आपलेसे करून घेतले ... वटवृक्षाच्या छायेत वावरणे सोपे नसते असे म्हणतात त्याला कारण वटवृक्षाच्या छायेत नवीन रोपांची वाढ खुंटते ..  पण त्याच वृक्षा खाली साधना केली तर सिद्धी प्राप्त होते.. ताईंनी वाढीची चिंता न करता साधना केली, त्याचे फळ पुढील आयुष्यात मिळाले. 

आज सांगुन खरे वाटणार नाही पण लग्ना नंतर भैरवी ताईंना “स्टेज फिअर” होते असे त्या सांगतात... लग्न झाले तेंव्हा जाणता राजा रंगभूमी वर आलेले होते , या महानाट्यात जिजाबाईंची  ची भूमिका तीन वेग वेगळ्या कलाकार करीत होत्या ...  कारण त्या भूमिकेचा एकूण काळ शिव जन्म ते राज्याभिषेक म्हणजे जवळ पास सत्तर वर्षाचा ... एका  कलाकारा  करिता या भूमिकेतील स्थित्यंतरे दाखविणे अवघडच  होते , पण नंतर काही कारणां मुळे ही भूमिका भैरवी ताई कडे आली ..आणि त्यांनी आव्हान स्वीकारून तीनही कलाकारांची भूमिका एकत्रित पणे केली  ...   ही गोष्ट १९८६ ची ... त्या नंतर त्यांनी मागे वळून पहिलेच नाही...                

त्या पूर्वीची एक घटना , बाबासाहेबांचे " फुलवंती" पुस्तक लिहून तयार होते , त्याच्या मुखपृष्ठा करिता चेहेरा शोधण्याचे काम चालु होते , त्या वेळेस भैरवीताई चा चेहेरा बाबासाहेबांना मुखपृष्ठा करिता योग्य वाटला ... हा त्यांचा कॅमेरा चा पहिला अनुभव !

जिजाबाई करीत असताना त्यांना रंगभूमी समजत गेली , नाटकाची आवड निर्माण झाली ... मग हळू हळू स्वतः च्या हिमतीवर शाळां मध्ये नाटकाची छोटी मोठी कामे करीत गेल्या ... जाणता राजा बाबासाहेबांचे स्वप्न होते ... त्याच वेळेस सुने च्या मनात पण स्वतःची काही स्वप्ने होती, स्वप्ने म्हणजे काय तर स्वतः ची वेगळी ओळख निर्माण करणे..

शाळेत कामे करीत असताना त्यांना आपण मुलां मध्ये जास्त रमतो या गोष्टीची जाणीव झाली, आणि मग त्या दृष्टीने विचार सुरु झाले ... मग मुलां करिता हळू हळू नाटके लिहू लागल्या , त्याचे दिग्दर्शन , निर्मिंती अशा सगळ्या भूमिकेत त्या वावरू लागल्या ...बाल रंगभूमी उद्याचे कलाकार निर्माण करीत असते ... नाटक हे शास्त्र नसून संस्कार आहेत अशी भावना असलेल्या भैरवी ताईनि काही वर्षा पूर्वी " नाटकाची शाळा " ही संस्था सुरु केली. सुधा करमरकर , सुलभा देशपांड्यानी आधीच्या पिढीत भरभरून काम केले आहे ... त्यांचे काम पुढे नेणे हि काळाची गरज होती ... आपल्या शिक्षण पद्धती मध्ये नाटक हा विषय दुर्लक्षित याची त्यांना मनापासून खंत वाटते ... एकूणच बालरंगभुमीची परिस्थिती अवघड आहे आणि प्रचंड उदासीनता आहे ... ती उणीव भरून काढण्याचे काम त्यांची संस्था करीत असते .. कलाकारांची पुढची पिढी घडविण्याचे व्रत घेतलेले असे लोक आहेत आपल्या समाजात   ...अनेक नाटके लिहिली , रंगभूमीवर आणली ... प्रसंगी पदरमोड केली ...

चौकोनी कुटुंब .. पतीचा व्यवसाय ... मुलगी Editing & Event Management मध्ये करिअर करते.. मुलाचे शिक्षण चालू आहे... मुलगा पुरंदरे घराण्याची परंपरा पुढे चालवतो ... त्याला एकूणच गड आणि किल्ल्यांचे आकर्षण ... घरून सिंहगडा पर्यंत चालत जातो , रात्र रात्र गडावर मुक्काम करतो ... विशेष म्हणजे ही दोनही मुले दत्तक घेतलेली .... काय म्हणावे या पती पत्नीला?   स्वतः शी प्रामाणिक असेलेले लोकच असे वागू शकतात ? आपण अशा दांपत्याला फक्त दंडवत घालू शकतो...

भैरवी ताई ना सिनेमा या माध्यमाचे आकर्षण नाही , पण सिरियल्स चे आहे कारण जास्तीत जास्त लोकां पर्यंत पोहोचण्या करिता ते योग्य माध्यम आहे असे त्यांचे मत आहे ... सतत नवीन गोष्टींचा शोध चालू असतो ... आता त्यांनी कुमार रंगभूमी अशी संकल्पना आणली आहे.. नवीन विषयवार लिखाण चालू आहे... वारी आणि गणेश उत्सव हा विषय डोक्यात घोळत आहे ... पन्नास पैकी सत्तेचाळीस हे नाटक गाजते आहे ...

सकाळ आणि इतर वृत्तपत्रात मुलां करिता केलेले किंवा करीत असलेले लिखाण ,मुलां करीता लिहिलेली  अनेक पुस्तके, ज्ञान प्रबोधिनी , अक्षर नंदन आणि इतर शाळात घेत असलेल्या नाट्य कार्यशाळा या सगळ्या गोष्टी पुरंदरे घराण्याच्या सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढे चालवीत आहेत.

अशा एक ना अनेक गोष्टी सामावलेल्या ... कुमार रंगभूमी करता पोट तिडकीने काम करणाऱ्या ... मुलां वर जगावेगळे संस्कार करणाऱ्या ... नाटकांची शाळा संस्थे च्या सर्वेसर्व्या... म्हणजेच जाणता राजाच्या जिजाबाई अर्थात भैरवी पुरंदरे ....

जगात दोन प्रकराचे लोक असतात, यश मिळविण्या करिता काम करणारे किंवा समाधान मिळविण्या मेहनत करिता करणारे ... भैरवी ताई नक्कीच दुसऱ्या प्रकारातील ... कारण त्यांच्या दृष्टीने आत्मिक समाधान म्हणजेच यश हे साधे सरळ तत्वज्ञान...

त्यामुळेच आजकाल बहुतेक ठिकाणी शाळेचे नाटक करणाऱ्या संस्था असताना तिथे नाटकाची शाळा करणाऱ्या भैरवी ताई चे कौतुक न वाटेल तरच नवल ना ?

बिपीन कुलकर्णी



एका जेलर ची गोष्ट ...


एका जेलर ची गोष्ट ...
महीला कर्तृत्ववान आहेत का किंवा असतात का ? हा खरे तर प्रश्न पडायला नको , भारत हा दुर्गेची पूजा करणाऱ्या संस्कृतीतील स्त्री शक्तीचा देश...
असे असुन पण आपल्या पुरुष प्रधान संस्कृती मध्ये अधून मधून हा प्रश्न डोके वर  काढतच असतो  ... उघड पणे जरी विचारला नाही तरी आडून पाडून येत असतो...

कर्तृत्ववान स्त्रियांची अनेक उदाहरणे पुराणात , इतिहासात किंवा अगदी वर्तमानात आहेत ... सीता , कुंती पासून जिजाबाई, लक्ष्मीबाई , अहील्या बाई ते सावित्री बाई मार्गे अगदी इंदिरा गांधी ते सुषमा स्वराज पर्यंत अनेक उदाहरणे आहेत ...

अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रिया आपल्या आजूबाजूला पण असतीलच ना ?

कर्तृत्ववान म्हणजेच यशस्वी का ?

सामान्यतः कर्तृत्वाचे मोज माप यशात असते ... पण यश मिळणे म्हणजे कर्तृत्व नव्हे .. कारण  काही वेळेस यश मिळविण्या करिता नशीब किंवा इतर गोष्टी कामी येतात ... निखळ स्वतः च्या मेहनतीवरचे यश म्हणजे कर्तृत्व ..
अशाच एका कर्तृत्त्ववान महीले बद्दल चार शब्द ...
स्वाती साठे (कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग येरवडा पुणे)
माझी त्यांची ओळख अशाच एका समाजपयोगी कामातून झाली , एका होतकरू खेळाडू करता निधी जमवीत असताना , स्वाती ताईंनी केलेली मदत आणि त्यातून पुढे झालेली त्यांची ओळख ...

जेलर म्हणजे आम्ही सिनेमा मध्ये पाहीलेले.... त्या मुळे पहील्या भेटीत स्वाती साठें  सारखी एक साधी गृहीणी जेलर आणि ते पण अकरा तुरुंगाची प्रमुख असेल या वर विश्वास बसायला थोडा वेळच लागला ... कुतूहल म्हणून बोलत असताना त्यांच्या बद्दल माहीती उलगडत गेली ...  

कुटुंब मूळचे तसे पुण्याचे पण वडील सरकारी नोकरीत असल्या मुळे अनेक ठिकाणी फिरती झाली  ...  आई गृहीणी ... अशा  मध्यम वर्गीय घरात स्वाती ताई चा जन्म झाला ...
लहान पणा पासून अभ्यासात हुशार .. ... खेळाची जात्याच आवड .. २० वर्षे बॅडमिंटन चॅम्पियन .. शिक्षण नागपूर आणि इतर ठिकाणी झाले ... . प्रवाहा विरुद्ध वाहायची लहान पणा पासून सवय त्या मुळे  off beat शिक्षण घेत Criminology या विषयात पदवी घेतली ...

नंतर रीतसर परीक्षा देऊन महाराष्ट्र कारागृह विभागात अधिकारी झाल्या ... आणि भारतातील पहील्या महीला कारागृह अधीक्षका झाल्या त्या नंतर मागे वळून कधी पहीलेच नाही आणि पायऱ्या चढत चढत या पदावर पोहोचल्या ...

प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एक स्त्री असते असे म्हणतात , मग यशस्वी स्त्री मागे कोण असते ? प्रत्येक वेळेस तिच्या मागे कोणी पुरुष असेलच  असे नाही... खरे  तर जिद्द आणि चिकाटी या दोन गोष्टी स्त्री ला मिळालेल्या नैसर्गिक देणग्या , त्याचा योग्य वापर करता आला की स्वाती ताई सारख्या स्त्रियांच्या पायाशी यश लोळण घेते ...       
तुरुंग किंवा कारागृह म्हणजे सतत गुन्हेगारांचा सहवास ... गुन्हेगार तरी कोण ? अगदी कच्या कैद्यां पासून संजय दत्त , तेलगी ते कसाब पर्यंत ...

तुरुंगातील प्रत्येक कैद्याला एकाच मापाने मोजायचे हे घटनेने दिलेले तत्वज्ञान आत्मसात केलेले स्वाती ताईनं सारखे अधिकारी अभावाने आढळतात ... त्या मुळेच संजय दत्त ने कारागृहाचे कपडे घालण्यास नकार दिला तेंव्हा त्यांनी त्याला दिलेलं " तू बातोसे मानेगा? या लातोसे ?" हे वाक्य सोशल मेडिया मध्ये खुप गाजले ... कैद्याला वठणीवर आणणारे जेलर फक्त चित्रपटात नसतात याचा सामान्य जनतेवर विश्वास बसायला ही घटना पुरेशी होती  ...

आयुष्यात नकळत क्षणी केलेली एक चूक माणसाला कैदी बनवते .... शेवटी ती पण माणसेच आहेत याची जाणीव असणारे स्वाती ताई सारखे अधिकारी आहेत म्हणून भारतातील कैद्यांची थोडी तरी सुसह्य अवस्था आहे , नाही तर भारतातील तुरुंग केंव्हाच व्हेनेझुएला, रशिया किंवा थायलंड सारखे झाले असते. कैद्यां करता आयोजित केलेली विपश्यना शिबीरे,राम देव बाबांचे योगा शिबीर  , श्री श्री चे Art of Living असे अनेक कार्यक्रम करण्यात  त्यांचा पुढाकार असतो... कैद्यांमधली माणुसकी जिंवत ठेवण्या करिताची धडपड !
कारागृहात  बनविलेल्या चपला export करणे  ... कारागृहा च्या पडीक जमिनीवर कैद्यांच्या मदतीने कारागृहा करिता शेती उत्पादन अशा अनेक  गोष्टी खाकी वर्दीतील संवेदनशीलता आणि माणुसकी अधोरेखित करीत असतात.

प्रत्येक नोकरीत  काही न आवडणाऱ्या गोष्टीना सामोरे जावे लागते त्याला इंग्लिश मध्ये शब्द आहे " occupational hazard "  ...  स्वाती ताई तर ११ कारागृहाच्या प्रमुख त्या मुळे अशा अनेक प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागले असणार ...२००३ साली छोटा राजन टोळीकडून झालेला गोळीबार , ज्यात त्या  थोडक्यात बचावल्या ... तसेच फाशीच्या अनेक प्रसंगाच्या साक्षीदार , खरे तर occupational hazard  म्हणून नोकरी स्वीकारताना या सगळ्या गोष्टींची आधीच तयारी केलेली असते ..   तरीही परिस्थिती ला सामोरे जाणे अतिशय   अवघड असते  ... अशा अनेक प्रसंगी  नसेल झाला का त्रास ? पण कदाचित त्यांच्या अध्यात्म्याच्या पायाने त्यांना प्रसंगातून तारून नेले असेल ...
राहणी अत्यंत साधी प्रसंगानुरूप साडी अथवा साधा ड्रेस ... कुठलाही बडेजाव नाही , त्यांच्याच शब्दात सांगायचे तर कर्तबगारी दाखविण्या करीत खूप आधुनिक दिसणे किंवा राहणे महत्वाचे नाही , अत्यंत साधे पणाने मोठी कर्तबगारी करता येते ... वागण्यात अत्यंत नम्रता ... आपल्या position  चा कुठलाही शिष्ट पणा नाही ... अतिशय अभ्यासु ... प्रेमळ , दुसर्याबद्दल आदर... वर्तमान पत्रात नियमित लिखाण असे अभावाने दिसणारे गुण एका व्यक्तीत सामावलेले ...

एकुलत्या एक लेकीची प्रेमळ माउली , लेक पण आई पेक्षा एक पाऊल पुढे जाऊन  तिने वेगळी वाट निवडली आणि झाली " योग शिरोमणी "
म्हणतात ना माणसा जवळ पत हवी , ऐपत हवी आणि दुनिये ला ठोकरण्याची जिगर हवी मग दुनिया तुमचे कौतुक करेल ... पण स्वाती ताई सारखे अधिकारी पत आणि ऐपत असून दुनियेला न ठोकरता कौतुकास पात्र आहेत ...





Thursday, September 13, 2018

शुचिर्भूत अर्थात स्नान !!!

शुचिर्भूत अर्थात स्नान !!!

आज सकाळी गणपती आणायला जायचे म्हणून उत्साहाने अंघोळीला गेलो ... शॉवर चालू केले आणि नकळत अंघोळी बद्दल विचार मनात आले ...

शुचिर्भूत हा स्नान अथवा अंघोळी करता हिंदु धर्मशास्त्राने दिलेला शब्द ..

शुचिर्भूत म्हणजे शुद्धता ...शास्त्रा प्रमाणे शरीर आणि मन या दोनही गोष्टींची स्वच्छता महत्वाची ...

शरीरा करिता अंघोळ किँवा स्नान !!!
शास्त्रात अंघोळीच्या वेळा दिल्या आहेत ... अर्थात सामान्यतः कोणी त्या पाळत नाहीत..

स्नान कीती छान शब्द आहे ...
अंगावर पाणी घेता घेता अनेक अंघोळीच्या  आठवणी नकळत जाग्या झाल्या ....

आयुष्यातली पहिली अंघोळ आठवत नसते आणि शेवटची अंघोळ अनुभवण्याच्या  पलीकडे  आपण गेलेले असतो ...
पहिली अंघोळ हौसेने घातलेली असते तर शेवटची उरकलेली असते ...

पण या दोन अंघोळीच्या  मध्ये अनेक स्नानांच्या आठवणी असतात ..

लहान मुलाला अंगाला तेल लावून पायावर घातलेली अंघोळ .. आजीच्या पायातुन आणि हातातून मिळणारी मायेची उब आणि नंतर अंगावर पडणारे गरम पाणी ..

लहान पणी घरोघरी गिझर नव्हते तेंव्हा बंबाच्या पाण्यात केलेल्या अंघोळी ... त्या अंघोळीची एक वेगळीच मजा .. ऊन ऊन पाणी आणि त्या पाण्याला असणारा एक प्रकारचा  सरपणा मुळे लागलेला छान जळकट वास ...

वाढ दिवसाच्या दिवशी आई ,बहीण , लेक अथवा बायकोने तेल लावून घातलेली अंघोळ .. त्या अंघोळी मध्ये पण एक वेगळीच मजा असते , तेल लावातना बहिणींनी किंवा लेकीने केलेले कमेंट्स ..... नशीबवान असु आणि तेल लावायला लेकी, बहीण, बायको , आई  अशा सगळ्या जणी असतील तर मग त्या नंतर ची गरम पाण्याची अंघोळ पुर्ण वेळ अंगावरील तेल काढण्याच्या खटाटोपात संपते ...

नरक चतुर्दशी ची अंघोळ पण पहाटेच्या अंधारातील , तेल
लावून नंतर सुवासिक उटण्याने केलेली अंघोळ ... दिवाळीचे म्हणजे थंडीचे दिवस ..पहाटेच्या प्रसन्न वातावरणात , बाहेर होणाऱ्या फटाक्यांच्या आवाजात होणारी अंघोळ खरेच लाजवाब ....

लांबचा प्रवास करून आल्या नंतर केलेली अंघोळ एक वेगळीच energy देऊन जाते ..
आजारपणातून उठल्या नंतर दोन तांब्याची का होईना  केलेली अंघोळ आजार पण काही क्षण दूर करते ...

लहान पणी केस कापून आल्या नंतर घरातील मोठयांनी घरात इकडे तिकडे न जाता बाथरूम मध्ये ढकलून करायला लावलेली अंघोळ ...

प्रवासाला निघताना केलेली घाईतली अंघोळ ,
सुट्टीच्या दिवशी केलेली मनसोक्त अंघोळ...
स्विमिंग पुल वर तलावात उडी मारण्याच्या पूर्वीची  अंघोळ ...
जिम मधल्या वर्क आउट नंतर केलेली अंघोळ ...
कधी तीर्थ क्षेत्री नदीवर केलेली अंघोळ ..

अशा अनेक अंघोळी ...

अंघोळीचा आणि भुकेचा काही तरी संबंध आहे ...अंघोळी नंतर ताजेतवाने वाटणे आणि भूक लागणे या एकमेकाला पूरक गोष्टी ... याला एका अंघोळीचा अपवाद ...
स्मशानातून आल्या नंतर केलेली अंघोळ उदासीनता नाही घालवू शकत  ... कारण  शरीरा पेक्षा मन जास्त थकलेलं असते ... मनाच्या अंघोळीचे शास्त्र इतके सोपे  नक्कीच नाही...

त्या मुळेच तुकोबांनी म्हंटले आहे ना “ नाही निर्मळ जीवन तर काय करील साबण "
निर्मळ जीवन हा मोठा आणि गहन विषय आहे , कारण ते स्वच्छ करण्या करिता साबण , उटणे किंवा शाम्पू चा शोध अजून लागायचा आहे  त्या  मुळे आपण फक्त निर्मळ शरीरा बद्दल बोलू शकतो ...

बिपीन कुलकर्णी


Friday, September 7, 2018

पुन्हा एकदा अकबर बिरबल...

पुन्हा एकदा अकबर बिरबल...      
  ( शेवट चुकवु नका )
बादशाह दरबारात ऐटीत बसला होता , त्यांची नवरत्ने डाव्या बाजूला तर बेगम उजव्या बाजूला बसली होती. सगळे दरबारी आप आपल्या जागी मानाप्रमाणे स्थानापन्न  होते...

बादशहा ने बिरबलाच्या आसना कडे एकदा पाहिले..बिरबलाची प्रसन्न मुद्रा पाहिली आणि कसे कोण जाणे बादशहाच्या मनात अनेक विचार सुरु झाले ..खूपशा जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि मागोमाग अनेक प्रसंग आठवले ... बेगम बरोबर आंबे खाण्याचा प्रसंग, बिरबलाची खिचडी किंवा चांदणी चौकात अत्तराचे भरलेले हौद ... या सगळ्या प्रसंगात बिरबलाने बादशाह वर मात केलेली होती...ते आठवून बादशाह खजील झाला... नुसता खजील होईल तो बादशाह कसला ? या सगळ्या  प्रसंगात  बादशाह च्या विचित्र स्वभावाला बिरबलाने युक्तीने उत्तरे देऊन त्याला निरुत्तर केले होते...

बादशाहने आज मनात काही ठरविले होते ...

एकदा नावरत्नां वर नजर टाकली आणि बिरबला ला विचारले,
" बिरबला आज माझ्या मनात दोन प्रश्ने आहेत आणि त्याची उत्तरे मला हवी आहेत ... "
"खाविंद आज एकदम असे का "
"बिरबला का ते विचारू नकोस , पण मला उत्तरे हवी आहेत  "

बिरबलाला एका क्षणात परिस्थिती ची कल्पना आली ...

बादशहा ला कुर्निसात केला आणि म्हणाला " विचारा खविंद "
" बिरबला विचार कर , माझे दोनही  प्रश्न वेगवेगळ्या विषयांवरचे आहेत"
" विचारा महाराज , मी माझ्या परीने उत्तरे द्यायचा प्रयत्न करेन ... पण माझीही  एक अट असेल  ... "
"बिरबला तू कसल्या अटी घालतोस ... तरी पण मान्य बोल तुझी अट "
"महाराज माझ्या उत्तरांनी आपले समाधान झाले तर मला एक प्रश्न आपणास विचारायची सवलत मिळावी ... "
"मान्य बिरबल "
बादशाह ने पहिला प्रश्न विचारला ,
"आयुष्य म्हणजे काय ?"
बिरबलाने काही क्षण विचार केला आणि बोलायला सुरुवात केली ...

महाराज सायन्स म्हणते हृदयाचे ठोके चालू असणे म्हणजे मनुष्य जिवंत ...मनुष्य जिवंत म्हणजे आयुष्य ... हे सर्व साधारण उत्तर ... पण आयुष्य म्हणजे फक्त दोन श्वासा मधले अंतर नक्कीच नाही ... कोणी लिहून ठेवले आहे ना , मनुष्य जन्माला येतो तेंव्हा श्वास असतो पण नाव नसते ... आणि मृत्यू नंतर नाव राहते पण श्वास जातो ... त्या नियमाने नाव आणि श्वास म्हणजे आयुष्य... श्वास ठेवणे हा निसर्गाचा नियम पण नाव जिवंत ठेवणे म्हणजे आयुष्य ...
प्रत्येकाची आयुषयाची व्याख्या वेगळी ... कोणाला संपत्ती , ऐश्वर्य म्हणजे आयुष्य वाटते ...तर कोणा साठी दोन वेळचे जेवण म्हणजे आयुष्य ... दोन श्वासा मधल्या गरजां वर आयुष्य ठरत असते... गरजा काय आणि किती असाव्यात हा ज्याचा त्याचा प्रश्न ?

तुमच्या गरजा तुमचे आयुष्य ठरविते ... गरजा वाढविल्या कि आयुष्याचे गणित चुकत जाते ..
शेवटी एकच सांगतो आयुष्य म्हणजे तुम्ही साधे गणित मांडायचे ... आपण जन्माला आल्याचा आनंद केलेल्या लोकांच्या संख्येला  तुमच्या मृत्यू चे दुःख केलेल्या संख्येने भागायचं ... उत्तर एका पेक्षा जितके जास्त तितके तुमचे आयुष्य मोठे होते असे सरळ समजायचे ...
शेवटचे वाक्य ऐकून दरबारात पिन ड्रॉप म्हणतात तशी शांतता झाली ..
उत्तराने बादशहा ही  चकित झाला ...

बिरबल नम्र पणे म्हणाला " खाविंद विचारा  दुसरा प्रश्न "

बादशाह म्हणाला "राजकारण म्हणजे काय ?"

बिरबलाने परत क्षण भर विचार केला आणि बोलायला सुरुवात केली ...
राजकारण म्हणजे नेत्यांची भाषणे , सभा , मोर्चे , बेरजेचे गणित असा सर्व साधारण समज असतो ... पण ते राजकारण नव्हे... राजकारण खरे तर "यत्र तत्र सर्वत्र" असते ...अगदी लहान पणी शाळेत मॉनिटर झालेल्या विद्यार्थ्या बद्दल किंवा वर्गात पहिल्या आलेल्या मुला बद्दल इतर मुले मागे जे बोलतात ते राजकारण ...समाजाला राजकारण फार आवडते ...
स्वतः चे अस्तित्व दाखविण्या करता केलेला खटाटोप म्हणजे खरे तर राजकारण... उथळ पाण्याला नेहमी खळखळाट असतो हे विसरायला नको…आता नवं नवीन शब्द प्रयोग येतात " गुड  पॉलीटिक्स  अँड बॅड पॉलिटिक्स " पण असे काही नसते महाराज... महाराष्ट्राच्या एका नेत्याने सांगून ठेवले होते ...राजकारण म्हणजे गजकर्ण ?
राजकारण म्हणजे सत्येच्या सारीपाटावरची प्यादी ... सत्ता म्हणजे इथे शासन नव्हे ...घरात , बाहेर, नोकरीच्या ठिकाणी किंवा शासनात प्रत्येक ठिकाणी अस्तित्वाची धडपड ...
म्हणतात ना In politics nothing happened by an accident, it is planned that way " खरे तर हे planning  म्हणजे राजकारण ...
शेवटी एकच सांगतो जिथे मी पण आले तिथे राजकारण आले  ....
एवढे बोलून बिरबल थांबला ... आणि बादशहा ला कुर्निसात केला ...
बादशहा समाधानाने मंदसा हसला... आज परत निरुत्तर झाला होता ... पण आज हरण्या मध्ये पण जिंकल्याचे समाधान होते ...

बादशाह म्हणाला " वाह खूब बिरबल ... आमचे समाधान झाले ... आता विचार तु तुझा प्रश्न ?
बिरबला ने बादशहा कडे पाहून स्मित केले , वाकून कुर्निसात केला आणि विचारले ....
"गेली  अनेक वर्षे तुम्ही मला निरनिराळे प्रश्न विचारून भंडावून सोडता , परत परत तेच प्रश्न विचारता ... माझ्या उत्तरावर समाधानी होता पण आचरणात काहीच आणत नाही ,प्रत्येक गोष्टी वर आपले मत देत असता ... विषयाचा अभ्यास नसताना विचारायचे म्हणून प्रश्न विचारता ...  म्हणून मला विचारावेसे वाटते आपल्या मातोश्री चे माहेर इटलीचे आहे का ?

- बिपीन कुलकर्णी