Tuesday, May 22, 2012

"माझे अर्बन ग्राम"

"माझे अर्बन ग्राम"                                                 २२ मे २०१२


काल " काकस्पर्शपाहताना राहून राहून कोकणचे निसर्ग सौदर्य डोळ्यात भरत होते, त्यातील छोटे खेडे पाहून नकळत डोळ्या समोर आमचे गाव येऊन गेले.
मराठवाड्या वर निसर्गा ने थोडासा अन्याय केलाय कारण तिथे कोकणा सारखा समुद्र किनारा नाही, नारळ पोफळी च्या बागा नाहीत, तसेच पश्चिम महारष्ट्रा सारखी सुपीक जमीन नाही, किंवा उत्तर महारष्ट्रा सारखा समृद्ध शेतकरी वर्ग नाही....
बाहेरून येणार्यांना मराठवाड्यातील धूळ प्रथम दिसते पण खरे तर हि संतांची भूमी, ज्या थोर संतानी हि धूळ आयुष्यभर अंगावर घेतली ती आपण थोडी घेतली तर बिघडले कुठे!!!
असो एकनाथ महाराजांनी जेथे वास्तव्य केले त्या पैठण तालुक्यातील "बोकुड जळगाव" हे आमचे गाव...नाव ऐकून थोडे विचित्र वाटते ना? जसे कि पुण्याच्या आस पास बरेच मावळ किंवा वडगाव आहेत, तसेच आमच्या कडे अनेक जळगाव...मग ते  लिंबे जळगाव, फेरण जळगाव असेल किंवा आमचे बोकुड जळगाव..जळगाव च्या मागे बोकुड लावण्या मागे नक्कीच काही तरी कारण असणार...तर गावात एक "सटी आई" चे देऊळ आहे, परंपरा गत पंचक्रोशीत घरात बाळ जन्माला आले कि देवीला बोकडाचा बळी देण्याची पद्धत, ब्राम्हण घरातून दही भाताचा नैवेद्य....त्या मुळे या बळी वरून गावाचे नाव पडले "बोकुड जळगाव"
पैठण रस्त्यावर म्हणजे औरंगाबाद पासून २० किलोमीटर वर हे गाव, म्हंटले तर तसे फार जवळ...पण राजकारण्यांच्या उदासीनते मुळे गावा ची वाट फार खडतर करून ठेवली आहे....सरकारच्या "गाव तिथे रस्ता" या ब्रीद वाक्याला आव्हान द्यायचे असेल तर ह्या २० किलोमीटर पैकी शेवटचा किलोमीटर प्रवास करून पाहावा...
आठशे लोकसंखेचे गाव, सर्व जाती धर्मा चे लोक गुण्या गोविंदाने राहतात, शेकडो वर्ष चालत आलेल्या पद्धती प्रमाणे...जाती धर्मा प्रमाणे वेग वेगळ्या वाड्या वस्त्या, पण त्यात कुठेही हेवे दावे नाहीत.
गावात प्रवेश करताना छोटी नदी लागते, एके काळी हि दुथडी भरून वाहत होती असे लोक सांगतात, आताचे तिचे अस्तित्व आणि मुंबई च्या मिठी नदीचे अस्तिव फक्त भूगोलाच्या पुस्तक करिता राहिलेले!
हि नदी ओलांडून गेले कि मोठे मैदान लागते , त्यात डावी कडे प्राथमिक आणि माध्यमिक शाळा....उजवी कडे ग्रामदैवता चा "मठशेकडो वर्ष जुना, त्या काळच्या पद्धती प्रमाणे एखाद्या वाड्या प्रमाणे बांधलेला....मोठा दरवाजा...वर मोठी घंटा..रात्रीच्या किंवा पहाटेच्या वेळी तिचा आवाज अक्ख्या गावाला ऐकू जाणारा..ते ओलांडून आत गेले कि महाराजांची समाधी.... शेजारी महादेवाचे भव्य हेमाड पंथी मंदिर, पद्धती प्रमाणे १० पायर्या उतरून जाऊन महादेवाचे दर्शन घ्यावे लागते..तिथून बाहेर आले कि समोर मुंजा चे मंदिर...
खरे तर मठाच्या दोनही बाजूने जाणारे नदीचे पात्र, आज काल फक्त पावसाळ्यात फक्त पाणी बघायला मिळते आणि ते दृश्य खरेच मनमोहक असते...
मठाच्या मागील बाजूस नदीवरील घाटावर हिंदू घरातील दहन संस्कार होतात..
 मठा समोर मोठे पटांगण, थोडी फार झाडे, त्याच्या पारावर दिवसाच्या कुठल्याही वेळेला गेले तरी गावातील मंडळी बसलेली...तसे म्हणायचे तर हि एकच  गावातील "happening  place " तिथे पारावर बसलेल्या मंडळी कडून राम राम घेवून पुढे गेले कि लागते गावाची वेस... 
या वेशीच्या अलीकडे एक सार्वजनिक विहीर आहे , नदीचे पाणी आटले कि पिण्याच्या आणि वापरण्याच्या पाण्या करिता या विहिरीचा वापर...
वेशीच्या डावीकडे जनावरांचा दवाखाना आणि उजवी कडे प्राथमिक आरोग्य केंद्र?? दवाखान्याला लागून ग्राम पंचायतीचे कार्यालय. वेस ओलांडून पुढे गेले कि छोटी छोटी बसकी घरे..सुरुवातीला दिसते ते बंगलीवजा घर...हे एके काळी आमच्या एका काकांचे होते..जे एके काळी गावाचे पुढारी.. हे घर दगडी बांधकामामुळे लक्ष वेधून घेते..सगळ्या शहरी सुख सुविधा असलेले घर...नंतर वयोमानामुळे त्यांनी ते विकून शहरात स्थाईक झाले...तिथेच डावीकडे हनुमांचे मंदिर...त्यांच्या उजवी कडे गढीची आठवण करून देईल असे उंचावर असलेले घर... ज्या सत्पुरुषाचा मठ आहे त्यांची पुढची पिढी तिथे राहते...या वरून पुढे गेले कि उजव्या डावी कडे बारा बलुतेदारांची घरे....तिथे अंगणातच प्रत्तेकाचा व्यवसाय थाटलेला...तिथून अजून पुढे गेले गावातील त्या काळातील एक प्रतिष्ठित पाटील कि ज्यांना पूर्ण गाव अप्पा म्हणून ओळखतो त्यांचे घर...तिथे दारात गाई म्हशी बांधलेल्या...त्याच्या उजवी कडे आमचे एकेकाळचे  पिढी जात घर...त्याच्या समोरच माझ्या वडिलांच्या काकांचा म्हणजेच माझ्या अजून एका आजोबांचा वाडा...बाहेरूनच त्याची भव्यता दिसते...प्रचंड मोठे दगडी बांधकाम...मोठा दरवाजा...आत गेले कि मोठी ओसरी आणि नीर निराळ्या खोल्या...या वाड्याला पाहून "सोनियाचा पिंजरा" मध्ये दाखवलेल्या प्रसिद्ध भोर च्या वाड्याची आठवण येऊन जाते!!!
हे सगळे वाडे तिसर्या चौथ्या पिढी ने टिकवून ठेवले आहेत, यातच सगळे आले, नाही तर आज काल पैशाच्या लोभाने गुंठ्यावर शेती आणि वाडे विकून गाड्या उडवत ऐश आराम करणारी किती तरी उदाहरणे आजूबाजूला आहेत...
आई, वडील आणि गुरूच्या बरोबरीने गाव पण नकळत आपल्यावर संस्कार करत असते असे मला तरी वाटते...
या वाड्यावरून पुढे गेले कि गावाची मागची बाजू सुरु होते..तिथेच वडिलोपार्जित आमचा मळा...बाकी गावांचे मला माहिती नाही पण आमच्या गावात मुला बाळांच्या बरोबरीने मळ्यांचे नाम करण करण्याची पद्धत..कदाचित त्या काळी शेकडो एकर शेती करताना सोपे जावे म्हणून शेतांना नवे द्यायची पद्धत असावी....तर आमचा हा धनगर मळा!!! आमच्या पणजोबान पासून चालत आलेला....
मी वर म्हणलो तसे आमच्या गावाला निसर्ग सौंदर्य नाही, पण प्रतिकूल परिस्थितीत एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्या नंतर विकास कसा होऊ शकतो त्याचे उदाहरण म्हणजे आमचा मळा...चारी बाजूला कुंपण...त्यात पूर्वापार चालत आलेली आंब्याची झाडे...डावी कडे मोठी विहीर..ईश्वर कृपेने तिला बारा महिने पाणी...हे सगळे पिढीजात असलेले...आणि त्यात आता  गेल्या बारा वर्षात माझ्या वडिलांनी वाढवलेली बाग, त्यात नीर निराळ्या प्रकरची फुल झाडे, वेग वेगळ्या भाज्या, नारळाची झाडे, फणस, सीताफळ, चिकू,मोसंबीची बाग, राम फळ, वाळा, कढीलिंब, वेग वेगळ्या  मसाल्याची झाडे...त्यातच छोटे टुमदार घर..ज्यात सर्व सुख सोयी...घराला लागून गणपतीचे मंदिर...गणपतीची सुंदर मूर्ती पाहून नकळत हात जोडले जतात,हे सगळे पाहून कोकणा तल्या वाडीची आठवण ना येईल तर नवल !!!
 माणसाला नुसती दृष्टी असून उपयोग नाही तर बाबां सारखी दूरदृष्टी असावी लागते...त्याच बरोबर पडणार्या कष्टाला सामोरे जायची तयारी असावी लागते...त्या बरोबरीने गावा वर प्रेम आणि पूर्वजा बद्दल आदर अभिमान असायला हवा तरच कष्टाला यशाची जोड मिळते..
फक्त आमच्याच घरात नाही तर  आज प्रत्तेक घरातील तिसर्या किंवा चौथ्या पिढीची गावाशी नाळ घट्ट जोडून आहे...
जसे बाकी गावांचे झाले तसे आमच्या गावाचे पण शहरी करण होत आहेगावातील पुढच्या पिढीने शहरात शिक्षण घेवून  पोल्ट्री फार्मडेअरी असे व्यवसाय सुरु केले...तसेच नौकरी करून पैसे कमवू लागली, त्या मुळे घरात सगळ्या वस्तू आल्या, गावात गाड्या आल्या...
नकळत या पिढीच्या कष्टाला मागच्या पिढीच्या पुण्याची जोड मिळाली...आणि आता हळू हळू ते "अर्बन ग्रामबनत आहे...
मी वर म्हणलो तसे आमच्या गावाला कोकणा सारखा समुद्र किनारा नाही, नारळ पोफळी च्या बागा नाहीत, तसेच पश्चिम महारष्ट्रा सारखी सुपीक जमीन नाही, किंवा उत्तर महारष्ट्रा सारखा समृद्ध शेतकरी वर्ग नाही....पण त्याच वेळेस ईश्वर कृपेने आमच्या गावात कोकणा सारखे पिढ्यान पिढ्या चालणारे खटले नाहीत किंवा पश्चिम महाराष्ट्रा सारखी घरो घरी असणारी भाऊ बंदकी नाही...याला काही अपवाद आहेत पण ते खरोखरीच अपवादच आहेत!!!