Friday, June 8, 2012

"तीर्थरूप"

"तीर्थरूप"                                                 ८ जून 2012



तीर्थरूप या शब्दाचा अर्थ आहे जन्मदाते म्हणजेच "वडील" 
तीर्थरूप म्हणजे जे तीर्था समान आहेत तेहिंदू धर्मात तीर्थ   हे सर्वात पवित्र आणि अनेक जन्माचा उद्धार करणारे मानले जातेत्याच्या प्रमाणे वडील हे आपल्या मुलांचा त्या जन्माचा उद्धार करतात म्हणून वडिलांना तीर्थरूप हा शब्द आहे पण आज काल या शब्दाचा उपयोग जास्त करून विनोद निर्मिती करण्या करिता होतो, जेंव्हा या शब्दावरून झालेले विनोद ऐकतो तेंव्हा खरेच काळजात चर्र..होते आणि असे विनोद करणाऱ्या लोकांच्या अकलेची कीव येते. वडिलांबद्दल  फार  कमीच  लिहील  जात ...घरातले ते  एक  असे  व्यक्तिमत्व  असते  ज्यामुळे  घराला खरे तर  आधार  मिळतो पण असे असून सुद्धा तसे पहिले तर वडील हे नाते आपल्याकडे गृहीत धरलेले आणि दुर्लक्षित...इंग्रजी मध्ये ज्याला "Thankless Job"म्हणतात तसे. याची सुरुवात अगदी पुराण काळात झालेली आणि नंतर इतिहासाने त्याचीच री ओढत पुढे आमच्या साहित्याने आणि चित्रपट सृष्टीने ती परंपरा पुढे चालू ठेवण्यात धन्यता मानली!!
आई  म्हणजे जर का ज्योत असेलजी पूर्ण घराला प्रकाश देते तर वडील म्हणजे समईत्याची जबाबदारी ज्योती ला आधार देण्याची...पण नकळत पणे आपण समई ला महत्व देत नाही...समई चे स्वतःला चटके  बसवून घेण्याचे दुखआपल्याला कळत नाही    
प्रत्तेक ठिकाणी वडील या नात्यावर अन्याय केला आहे असे मला वाटते...
कर्णाला नेहमी हिणविण्या करिता "सूतपुत्र" या शब्दाचा वापर झाला, पण जेंव्हा त्याचे उदात्तीकरण करायची वेळ आली तेंव्हा शब्द आले  "कौन्तेय" आणि "राधेय"!! आपल्या पैकी किती लोकांना माहिती आहे वडील सारथी होते आणि ज्यांच्या मुळे कर्णाला सूतपुत्र म्हंटले गेले, त्या सारथ्याचे नाव अधिरथ होते, आणि कर्णाला वाढविण्यात जेवढा राधे चा वाटा आहे कदाचित त्याहून थोडा मोठा वाटा अधीरथा चा कर्णाला धनुर्धारी करण्यात होता...पण दुर्देवा ने अधीरथा च्या वाटेला फक्त उपेक्षा आली.
इतिहास कारांनी  श्री कृष्णा च्या बाबतीत  देवकी आणि यशोदेला  जेवढे महत्व दिले तेवढे वासुदेवाला न देवून त्यांच्यावर अन्यायच केला आहे...श्री कृष्णा ला कंबरे एवढ्या पुराच्या पाण्यातून डोक्यावर टोपलीत नेणारा वासुदेव, त्या पुढे सामान्य माणसाला वासुदेवाची ओळख नाही..खरे तर "दिलेला शब्द पाळणारा" किंवा " सत्यवचनी "  म्हणून धर्मराज अर्थात युधिष्ठर सर्वाना परिचित पण तसा वासुदेव किती जणांना परिचित आहे?
येशू क्रीस्था च्या बरोबरीने मदर मेरी चे स्थान समाजात आहे  पण सेंट जोसेफ जे येशू क्रीस्था चे वडील  ज्यांचा उल्लेख बायबल मध्ये  गुणवान , पुण्यवान , सत्वगुण असलेला , सदाचरणी माणूस म्हणून केलेला आहे, त्यांच्या बाबतीत माहिती किती लोकांना आहे?
जिजाई नि शिवाजी महाराजांना घडवले यात वादच नाही, पण त्याच वेळेस शहाजी राजांची विजापूर दरबारात होणारी ओढाताण आपण लक्षात घेवून, शहाजी राजांना शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत किंवा यशात जेवढे द्यायला पाहिजे तेव्हडे स्थान देतो का?

आई घराचे मांगल्य असते तेंव्हा  वडील घराचे अस्तित्व असतात? पण दुर्दैवाने अस्तित्व संपल्या नंतरच अस्तिव नसल्याची जाणीव होते, पण त्या वेळेस खरे तर खूप उशीर झालेला असतो.
असे असून सुद्धा या अस्तित्वा बद्दल कधीच आम्ही का बोलत नाही? 
पडलो किंवा खरचटले कि लगेच तोंडातून निघत "आई गं!" पण मोठे संकट आले कि  " बाप रे!" असे उद्गार तोंडातून निघतात. कारण छोट्या संकटांसाठी आई आठवत असली तरी मोठी वादळे पेलताना बाबांची साथ लागते, हा जगाचा नियम आहे.... 
मुलांच्या जन्माच्या वेळेस आईनि भोगलेल्या शारीरिक यातनेची आम्ही जाणीव ठेवतो, पण त्याच वेळेस दवाखान्यात अस्वस्थ पणे येर झार्या घालणार्या वडिलांच्या अस्वथतेची ची जाणीव आपल्याला नसते महिन्या पूर्वीचे उदाहरण, माझ्या भाची च्या सई च्या जन्माच्या वेळेस, अशीच धाव पळ करावी लागली आणि त्या बाळाला ऐन वेळेस सह्याद्री हॉस्पिटल मध्ये हलवावे लागले...आई एका ठिकाणी आणि बाळ दुसर्या दवाखान्यात...प्रत्तेक जण येणारा आई आणि लेकी  बद्दल बोलत होता....पण योगेश म्हणजे सई च्या बाबाची परिस्थिती कशी होती, लेकरा करिता कसा जीव तुटत होतालेकरू सह्याद्री हॉस्पिटल च्या डॉक्टर्स कडे देताना त्याला किती यातना होत होत्या  ते मी फार जवळून पहिले पण काय आहे ना आपला समाज हे वडिलांचे दुखसमजूनच घेत नाही

या सगळ्यात कुठेही आईचे महत्व कमी करायचा प्रयत्न नाही..खरे तर ते कमी होऊ पण शकत नाही...पण त्याच वेळेस वडील या नात्याला थोडासा न्याय मिळायला हवा असे सारखे मनात येते.थोडे आठवून पाहायचा प्रयत्न करा- वडिलांची महती सांगणाऱ्या कविता, गाणी, श्लोक...आठवताहेत नाही ना??

आपल्या साहित्यातील आत्मचरित्रे वाचून बघा, बहुतेक ठिकाणी स्वतःचे मोठे पण सांगताना  लहान पणी वडिलांनी केलेला अन्याय सांगून नकळत त्यांना खलनायक बनवून स्वतःकडे वाचकांची सहानभूती घेण्याचा प्रयत्न करीत असतात..असे करून आम्हाला काय मिळते? लहान पणी वडील तसे का वागले याचा शोध घेण्याचा प्रयत्न कधी केला का?? खरेच वडिलांना तसे वागण्यात आनद मिळत होता का याचा शोध घेण्याचा विचार का करीत नाही? हे असे लिहिणारे लोक सोईस्कर पणे Genetics चे नियम विसरतात...
बर्याच ठिकाणी वडिलांचे जे चित्र रेखाटले आहेत ते तापट, व्यसनी किंवा मारझोड करणारे...समाजात ५-१०% असे असतीलही, पण बाकी ९०% चांगल्यांचे काय?
साहित्यात याला काही अपवाद आहेत जसे की व पु नि लिहिलेले "व पु सांगे वडिलांची कीर्ती"   
किंवा कविते च्या बाबतीत सांगायचे तर " दमलेल्या बाबाची कहाणी" असे फार मोजकेच अपवादात्मक... पण दुर्दैवाने बाकी सगळ्या ठिकाणी एकवचनी अनादार्थी उल्लेख !!!!
आपल्या बाल पणाच्या कष्टाला किंवा परिस्थिती ला वडिलांना जबाबदार धरताना, आपण कधी त्यांच्या बाल पणाच्या परिस्थिती चा विचार करतो का? आपण हा विचार करीत  नाही जरी आपण बाल पणी कष्ट भोगले असले तरी सुदैवाने आपल्या तरुणपणी तरी आपल्याला  चांगला काळ पाहायला मिळाला?पण वडिलांचे काय? त्याचा तर उमेदीचा काळच कष्टात गेला ना? बाल पण तर त्याहून वाईट  हालाखीतच...  

चित्रपटात तरी काय चित्र वेगळे? बहुतेक ठिकाणी वडील हे पात्र विनोद निर्मिती करण्या करिता वापरलेले,नाहीतर लाचार किंवा खलनायकी...असे किती चित्रपट आहेत ज्यात कर्तुत्ववान आणि प्रेमळ पिता दाखवलेला आहे. त्या उलट आई बद्दल - अमिताभ ची आई म्हंटले की लगेच निरुपा रॉय डोळ्या समोर...थोडी आधुनिक आई म्हणजे रीमा लागू?? कर्तुत्ववान आई म्हणजे नर्गिस "मदर इंडिया" 
असे किती अभिनेते वडील म्हणून डोळ्यासमोर येतात? वडिलांच्या संदर्भात लक्षात राहणारे चित्रपट म्हणजेज्यात वडील आणि मुलात विसंवाद..जसे कि - शक्तीबागबान किंवा दबंग.हिंदी चित्रपटात "मेरे पास मा है" हा संवाद जसा गाजला तसाच वडिलांच्या बाबतीत "मेरा बाप चोर है" हे दोनही संवाद एकाच चित्रपटातील..पण केवढा हा विरोधाभास...इथे वडिलांबद्दलचा हा संवाद त्यांची  लाचार परिस्थिती सांगण्या करिता वापरलेला खरेच का वडील एवढे लाचार असतात ? नक्कीच नाही...आणि कधी परिस्थिती मुळे झाले तरी ते केवळ कुटुंबा च्या भल्या करिता!!! पण दुर्दैवाने पुढील आयुष्यात कुटुंब बहुतेकदा हे सोयीस्कर पणे विसरते.. हा कदाचित एक त्या नात्याला शाप असावा!!!!
का यां चित्रपटसृष्टीला कर्तुत्ववान वडील दाखविता येऊ नयेत?  आठवून पहा - चंद्रकांत गोखले, ए के हंगल,  शरद तळवलकर अजूनही बरेच डोळ्या समोर येतात.... लहान पणी मुल आजारी पडले किंवा काही त्रास झाला तर बरेचदा आई रडून मोकळी होते , पण वडिलांना परिस्थिती संयमाने हाताळावी लागते ..खरे तर रडणाऱ्या पेक्षा समजावणाऱ्या वरच ताण जास्त पडतो..
पुढे मुलीच्या लग्नात तरी काय वेगळे घडते?
मुला मुलींच्या शिक्षणा करिता झटणे, शाळा, कॉलेजेस चे उंबरठे झिजवणे...वेग वेगळ्या क्लासेस ना मुलांना पाठविणे आणि त्यातच नोकरीची दोरीवराची कसरत करण्यात  आयुष्याची उमेदीची वर्षे संपतात, आणि तशात जमा खर्चाचा ताळ मेळ जोडता जोडता आयुष्याची संध्याकाळ होते, मुले पायावर उभी राहिली आणि आता ते आपली जबादारी घेतील या एका आशेवर आयुष्याच्या संध्याकाळ ला सामोरे  जायची तयारी करत असतात, पण या स्वप्नाचा सुखद शेवट प्रत्तेक वडिलांच्या नशिबी नसतो... पण आपले प्राक्तन म्हणून तशाही परिस्थितीला सामोरे जातात          
आपल्या समाजाने पण सतत वडील या नात्याची उपेक्षाच केली आहे...असे किती सण आहेत की जे वडिलान करिता आहेत? कोणी म्हणेल दिवाळी पाडवा...पण खरे तर तो सण त्यांच्या पेक्षा जास्त आई,लेकी आणि बायको करिता महत्वाचा....लग्नात विहिणीची पंगत असते...मान वर माई चा...वडिलांचे काय? 
एका वाचलेल्या कवितेची नकळत आठवण झाली, त्यात खरेच हि व्यथा किती थोडक्यात सांगितली आहे 
कळत नाही बापाचं मन स्वतः बाप झाल्याशिवाय,
बापमाणूस असतो तो, बापांशिवाय कसा कळणार?असतं न्यारंच रसायन, त्याची फोड उकलत नाही,म्हणून तर बापावर कविता कोणी करत नाही...”



या नात्याला हे जे सगळे शाप आहेत त्यांना उशा:प देण्याचा आपण सगळ्यांनी थोडा तरी प्रयत्न करावयास हवा..

"कौसल्ये चा  राम जरी म्हंटले गेले तरी, दशरथ राजा चा मृत्यू पुत्र वियोगाने झाला हे आपण विसरून चालणार नाही!!!”

बिपीन कुलकर्णी