Tuesday, January 13, 2015

अण्णा एवढी घाई कशासाठी केलीस ??

अण्णा एवढी घाई कशासाठी केलीस ??

प्रिय अण्णा,

७ जानेवारीचा दिवस उजाडला तोच  आम्हा सगळ्या करिता "ती "वाईट बातमी घेवून, तू निघून गेलास अनंताच्या प्रवासाला !

जन्माला येणारा प्रत्येक जण कधी तरी जाणारच हे त्रिकालबाधित सत्य असले तरीही , आपल्या जवळची व्यक्ती जाण्याचे दुख: काय असते हे मी तुला काय सांगणार ? मातृ वियोगाचे दुख: तुम्ही भावंडानी कोवळ्या वयात अनुभवलेपुत्र वियोगाचे दुख: तुला  तरुण पणी भोगावे लागले ….
तुझे ७१ वर्षाचे आयुष्य ! तू जरी नात्याने काका असलास तरी आमचा मित्रच जास्त होतास . ज्या काळी आमचे इतर मित्र त्यांच्या काकांना अहो जाहो करायचे तेंव्हा आम्ही तुला " ए अण्णा " हक्काने म्हणायचो ! कळलेच नाही तू सत्तरी ओलांडलीस  ते.

मला कळायला लागल्या पासूनच्या किती आठवणी सतत डोळ्या समोर येत आहेत, तुझ्या बरोबर केलेले असंख्य  औरंगाबाद - पुणे प्रवास , त्यात तासंतास मारलेल्या नीर निराळ्या विषया वरच्या  गप्पा , प्रवासात मधूनच तुला येणारी ती चहा ची लहर !

तुझी पुण्यात बदली झाल्या नंतर आपण कितीतरी वर्षे एकत्र निरनिराळ्या घरात राहिलो , घर मालकांचे आलेले नीर निराळे अनुभव आणि त्या वर आज पर्यंत केलेले असंख्य विनोद , प्रवीण अपार्टमेंट मध्ये राहत होतो तेंव्हा मालकीण बाई पहिल्या गुरुवारी "दत्त म्हणून " भाडे वसुलीला येत असे , कधी घरात पैसे असत किंवा नसत , तेंव्हा आपली होणारी धावपळ ,,,,त्यावरून आपण घेतलेले  "असतील तर द्या " हे वाक्य ! नंतर आपण कधी कुठे कसे वापरले ते फक्त आपल्यालाच माहिती.

औंध च्या घरातले दिवस …. ऑफिस च्या मागेच घर असल्या मुळे तुमचे ऑफिस, तिथले वातावरण, काम करणारे लोक इतकेच काय ऑफिस चे राजकारण आमच्या परिचयाचे झाले होते. किती गप्पा मारायचो आपण.
औरंगाबाद चे दिवस तर आपण कोणीच विचारू शकत नाही … तू पाडेगाव ला होतास, poultry farm ची जबादारी होती तुझ्या कडे ,  " दिवस रात्र तुम्हाला  आमच्या पेक्षा कोंबड्यांची जास्त  काळजी असते"  असे कधी काकू तुला गमतीने म्हणत असे.

किती तरी वेळा आपण रात्री अपरात्री पाडेगाव ला जाऊन कोंबड्यांची परिस्थिती पाहून आलो होतो ? मला आठवते बरेचदा तू सायकल वर जायचास ऑफिस ला…आज काल आहेत का रे असे अधिकारी ?

वयाच्या पस्तिशीत तू Class One अधिकारी झालास ? आजचे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले अधिकारी पाहून वाटते , तुला का गर्व झाला नाही ? यश का डोक्यात गेले नाही ?

तुम्ही लहान पणी अनुभवलेली गरिबी आणि ताई आणि नानांचे संस्कार हेच उत्तर असेल या प्रश्नांचे.

नाशिक हून नोकरीची सुरुवात करून नाशिक मधून निवृत्त झालास , नोकरीच्या काळात अनेक चढ उतार आले , अन्याय झाला , आरोप झाले पण  सोने अग्नीमध्ये तापवल्याने त्यात मिसळलेले अन्य हिणकस पदार्थ जळून जातात आणि शुद्ध बावनकशी सोने झळाळून निघते तसेच सगळ्या गोष्टींशी सामना करत  तू सर्वोच्च पदावर पोहोचलास.

मला माझे अगदी लहान पणाचे दिवस आठवतात , तू आम्हाला सायकल वर तुझ्या मित्रां कडे घेवून जायचास , एकदा मी तुझ्या सारखा पांढरा झब्बा घालण्या करता हट्ट केला आणि मग तू मला पांढरा झब्बा घालून नेले ,त्या वेळेस तुझ्या मित्रांनी माझे नाव “पाटील” ठेवले होते ……

भाऊसाहेब भालेराव काका शेवट पर्यंत कधी तरी मला पाटील म्हणून हाक मारायचे . तू तर आम्हाला खूप प्रेम दिलेसच पण तुझ्या मित्रांचे पण खूप प्रेम मिळाले.             

नोकरीला लागे पर्यंत कधी कुठल्या गोष्टी करिता बाबांना पैसे मागितल्याचे आठवत नाही , आणि बाबांनी  पण कधी चिंता केली नाही , कारण त्यांचा अनंत वर कोण विश्वास !

तुझ्या नोकरीच्या काळात मी खूप दिवस तुझ्या जवळ राहिलो , सगळे खूप जवळून पहिले . अण्णा तू किती भोळा होतास रे ! लोक कसा स्वार्थ साधतात हे आम्ही बघायचो …. पण तुझा इतर सगळ्या पेक्षा ईश्वरा वर जास्त विश्वास.

गणपती , नरसिंह , गजानन महाराज हि तुझी श्रद्धेची स्थाने …. पोखरणी ला नरसिंह दर्शन असो किंवा शेगाव ला गजानन महाराज दर्शना करिता तू किती फेऱ्या केल्यास ? तुला तरी आठवणीत होते का ?

या ईश्वरानी तुला भर भरून दिले …लेकि चांगल्या घरी पडल्या , जावई चांगले मिळाले , नातवंडे , आर्थिक स्थैर्य अजून काय पाहिजे …. आपल्या सारख्या सामान्य माणसाच्या दृष्टीने सुखाची हीच व्याख्या.

वयाच्या चाळीशीत तू Post Graduation केलेस , आमच्या पिढीला सांगितले तरी हे खोटे वाटेल . त्याच सुमारास तुला 
तब्बेतीचा काही त्रास झाला होता आणि डॉक्टर नि Sress Test करायला सांगितली होती , तू आणि मी रोपळेकर हॉस्पिटले ला गेलो होतो आणि सगळ्या टेस्ट केल्या होत्या , त्या तेंव्हा नॉर्मल आल्या होत्या. किती घाबरला होतास तेंव्हा तू ? आज आम्ही त्या वयाचे झालो तेंव्हा घाबरण्याचे कारण कळते.

तसा तुझा स्वभाव थोडा घाबरण्याचाच होता , छोट्या छोट्या गोष्टीची तू उगाच काळजी करत बसायचास .  खूप विचार करायचास तू !

किती हळवा होतास , टचकन डोळ्यात पाणी यायचे तुझ्या ? सिनेमातील लोकांचे दुख: पाहून पण डोळे पाणावायचे तुझे

आज काकुच्या डोळ्यातील पाणी थांबत नाही रे …. कसे समजावणार तिला ?

देवा धर्माची तुझी आवड , मन लावून पूजा करणे , श्रद्धेने पोथी वाचणे , नवरात्र किंवा इतर सणावाराच्या वेळेस ची तुझी गडबड, जळगाव च्या गणपती ची पूजा. कसे होणार इथून पुढे?

काळ कोणा करिता थांबत नसतो त्या मुळे या गोष्टी पण थांबणार नाहीत , पण तुझी उणीव पदोपदी जाणवणार आणि तुझी सर कोणाला येणार नाही, हेही तितकेच खरे.

तुला आठवते मी स्वकमाई ची पहिली कार घेतली तेंव्हा , कार घेण्या करिता आपण गेलो होतो (तू , मी, आई ,बागेश्री आणि गार्गी ) दुसर्याच दिवशी तू मला कौतुकाने म्हणाला होतास , " तुझ्या गाडीत ऑफिस मध्ये सोड " आणि आपण दोघेही तुझ्या खडकी ऑफिस मध्ये ऐटीत गेलो होतो , तू तुझ्या staff ला कौतुकाने कार दाखविलीस आणि नंतर तुझ्या मोठ्या Cabin मध्ये चहा प्यालो होतो, कौतुक करणारे वडील प्रत्येकालाच मिळतात पण तुझ्या सारखा काका मिळायला भाग्य लागते               

ऑक्टोबर मध्ये औरंगाबाद पुणे प्रवासात गप्पा मारताना आपण २०१५ मध्ये नर्मदा परीक्रिमा कार ने करायचे ठरवले पण होते , तसेच खूप वर्षा पासून आपले एकदा  पंढरपूरची वारी करण्याचे मनात होते पण शेवटी " Man Proposes & God Disposes " हेच खरे …. 

तू गेलास आणि काही केल्या या आठवणी थांबेच ना ? काहीतरी प्रचंड हरविल्या ची जाणीव होतेय ? मनाला रुख रुख लागलीय . तुझ्या सारखी माणसे खूप जगावीत कधीच जाऊ नयेत …. पण ती नियती आहे ना तिला हे सगळे मान्य नसते. 

तू गेलास हे कटू सत्य आहे , सत्या पेक्षा वास्तव भयानक आहे …. व पु म्हणतात तसे " ज्याच्या असण्याला अर्थ असतो , त्याच्याच नसण्याची पोकळी जाणवते " तुझी पोकळी तर क्षणो क्षणी जाणवणार ….
भगवद्गीतेत लिहिलंय -

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः

आत्मा अमर आहे असा याचा साधा सरळ अर्थ , पण भगवद्गीता समजण्याची आमची कुवत नाही , आम्ही आमच्या चालत्या बोलत्या प्रेमळ अण्णा ला मुकलो हे खरे सत्य

सुरेश भटांच्या शब्दात सांगायचे तर "`आसवां वाचुनी काय आपुल्या हाती` अशीच अवस्था …

तुझाच

गण्या