Sunday, November 27, 2011

"मनु" स्मृती

"मनुस्मृती                                            २८ नोव्हेंबर २०११

शांता बाई शेळक्यांचे एक फार सुंदर वाक्य आहे " स्त्री च्या फक्त तरुण किंवा प्रौढ वयालाच नाही तर वार्धक्यालाही
 त्याचे स्वतःचे असे एक लोभसपण आणि सौंदर्य असतेहे जेंव्हा वाचले तेंव्हा डोळ्या समोर ती व्यक्ती परत आली...हो परत, कारण ती व्यक्ती त्या पूर्वी पण खूप वेळा काही न काही  वाचताना येत होतीते "लंडनच्या आजी बाईअसेल किंवाडॉक्टर आनंदी बाई जोशींचे चरित्र असो!!! कारण हि दोनही चरित्रे गेल्या शतकातील प्रतिकूल परिस्थिती शी झगडणाऱ्या स्त्री शक्तीची कहाणी सांगतात आणि आजचे माझे व्यक्ती चित्र पण त्या नंतरच्या ३० - ४० वर्षाच्या काळातले  .....कर्तुत्व समाजा पेक्षा तिच्या कुटुंबां करता असामान्य.
देवाने आम्हा भावंडांवर थोडासा अन्याय केला असे पूर्वी आम्हाला वाटायचे, कारण आमच्या सगळ्या मित्र मैत्रिणी ना, वडिलान कडचे एक आजी आजोबा आणि आई कडून एक आजी आजोबा असायचे , पण आमच्या बाबतीत आम्हाला वडिलांकडून फक्त आजोबा आणि आई कडून फक्त आजी अशी वाटणी होती....पण आज मागे वळून पाहताना असे वाटते कि आम्ही खूपच नशीबवान आहोत, कारण या दोघांनी आम्हाला उर्वरित दोघांची कधीही कमी जाणवू दिली नाही...
माझा मागचा लेख त्या आजोबांवर होता ज्यांनी आमच्यावर भर भरून प्रेम आणि  संस्कार केले...आणि आता जर का मी त्या आजी बद्दल लिहिले नाही तर  कळत तो तिच्या वर अन्याय होईल असे मला वाटते..
तर ती आजी म्हणजे माझ्या आई ची आई " मनुताई मेढेकर "जन्म १९०३ आणि मृत्यू १९९६...९३ वर्षाचे वर वर दिसायला सुखी समाधानी आयुष्य, असे म्हणायचे कारण म्हणजे आम्ही फक्त तिच्या शेवटच्या काही सुखी वर्षाचे साक्षीदार, त्या पूर्वी आयुष्यात तिने आणि तिच्या मुलांनी जे काही सोसले होते ते फक्त तेच जाणोत .....आम्ही फक्त ऐकलेले
त्या काळी परिस्थिती अशी होती कि बाई चे आयुष्य पूर्णतः  नवर्या वर अवलंबून असायचे, त्या वेळेस आमचे आजोबा म्हणजे कै रामचंद्र मेढेकर माजलगाव ला सरकारी खात्त्यात वरिष्ठ अधिकारी.....हा काळ स्वातंत्र्या च्या आस पास चा....सगळे छान चालले होते आजोबांची सरकारी नोकरीदाराशी गाडीघरात कामाला गडी माणसे...संसारात मुले आणि मुली आणि एक लेकरू  पोटात जे कि लवकरच जन्म घेणार होते....पण काय झाले कोणास ठाऊक आणि नियती रुसली या कुटुंबावर!!!!....हृदय विकाराच्या झटक्याने माजलगाव ला आजोबांचे निधन झाले... आणि क्षणात होत्याचे नव्हते झालेइथे  आपण समजू शकतो कर्त्या पुरुषाच्या जाण्या नंतर या सुखी कुटुंबाची कशी परवड झाली असेल!!!
त्या काळी विधवा बाई चा उपयोग म्हणजे मुले सांभाळणे किंवा पोळ्या लाटणे...आणि तिच्या बाबतीत पण वेगळे काही घडले नाही...
माहेरची तशी श्रीमंती , त्या मुळे आजोबांच्या निधना नंतर भाऊ काही दिवस बहिणीला आश्रयाला घेवून गेले, पण तिला  आश्रित म्हणून राहणे मान्य होणार नव्हते, त्या मुळे सुरुवातीला अपमान पोटात घालून शिरवळ ला काही दिवस काढले आणि नंतर निर्णय झाला पुण्याला जाण्याचा!!! पुण्याला तर आले पण राहायचे कुठे? करायचे काय? सगळेच प्रश्न... पण म्हणतात देव एक दार बंद करतो तेंव्हा दुसरे दार उघडतो, त्या प्रमाणे पुण्यात आजी ला पेठे ताई भेटल्या, या पेठे ताईंची सदाशिव पेठेत खानावळ होती, तिथे मग त्यांना हि वागायला पूर्ण देशस्थी पण दिसायला अस्सल कोकणस्थी स्त्री पोळ्या लाटायला  योग्य वाटली
दिसायला गोरीपान, बुटकी, नऊ वार साडी, आवाज मृदू पण त्यात करारी पणा, आपल्या मतांवर ठाम, कधी कोणाचा अनादर केला नाही आणि स्वतः पण कधी करून घेतला नाही!!! वागण्यात एक जरब....
इथे सुरु झाले तिचे पोळ्या लाटणे... वेळच्या जेवण्याची सोय तर झाली पण बाकी पण असंख्य प्रश्न होते..जसे कि मुलांची शिक्षणे, राहायला जागा , पैसा वगैरे... तरुण मुले, २ मुली आणि एक छोटे लेकरू, म्हणजे ६ जणांचे कुटुंब आजच्या भाषेत ती Visionary होती कारण तिने त्या परिस्थितीत मुलांचे भविष्य पहिले होते, आपल्या वर जी वेळ आली ती वेळ मुलांवर कुठल्याही परिस्थिती येऊ नये आणि त्या करिता शिक्षणाचा पाया भक्कम असायला पाहिजे आणि मुले आणि मुली स्वतःच्या पायावर उभी असायला पाहिजेत हे तिने तेंव्हा जाणले होते, आणि त्या करता पडणार्या कष्टाला तिची तयारी होती.  
कोणाच्या तरी ओळखीने बहुदा पेठे ताई किंवा टिळक बाईंच्या (या टिळक बाई म्हणजे जयंत राव टिळकांच्या मातोश्री) ओळखीने कॉलेज च्या समोर वाड्या मध्ये खोली मिळाली, पण तिथे हे एवढे मोठ कुटुंब राहणे शक्य नव्हते.त्या वेळेस मोठा मुलगा हैदराबाद मुक्ती संग्रामात होता, 
दुसर्या  मुलाने  थोडे फार शिकून घरोघरी दुध आणि पेपर टाकायची जबादारी घेतलेली उद्देश एकच आई च्या कष्टाला हातभार लावणे... परिस्थिती माणसाला नकळत जबादारीची जाणीव करून देते, आणि त्याच वेळेस मुलांचे बाल पण हिरावून घेते,
 मुलीना टिळक बाईंच्या ओळखीने "अनाथ हिंदू महिला आश्रमात" जागा मिळाली, त्या मुळे मुलींचे राहणे तिथे आणि शिक्षण रेणुका स्वरूप (भावे स्कूल),
त्या वेळेस लहान मुलाला पुण्यात कुठल्याही आश्रमात जागा मिळाली नाही म्हणून, मुंबई मध्ये चेंबूर ला ठेवले.... वर्षाच्या लेकराला आश्रमात ठेवताना या माउलीला किती यातना झाल्या असतील!!! हे आज जेंव्हा आम्ही आई बाप झालो तेंव्हा कळते कारण आमची पिढी मुलांच्या बाबतीत फारच Possessive !!!
हे सगळे करत असताना तिची तारेवरची कसरत चालू होती, खानावळीत पोळ्या करणे, पोळ्या करता करता हळू हळू पूर्ण जबादारी तिच्यावर येवू लागली, दुपारी जेंव्हा जमेल तसे आश्रमात जाऊन मुलीना भेटणे, कधी मुंबई ला मुलाला भेटणे, या सगळ्या मध्ये प्रचंड ओढाताण होत होती, नुसतीच ओढाताण नाही तर जीवाची कालवा कालव!!! खानावळीत रोज शेकडो लोक जेवत होते, पण तिच्या नशिबी आपल्या हातचे मुलांना २ घास घालणे नव्हते, मुले बिचारी दुसरी कडे आश्रित होती ...ह्या सारखा दुसरा  दैव दुर्विलास काय असू शकतो...सणासुदी ला तर खानावळीत गोडधोड करताना अश्रुची संतत धार चालू असे!!

 पुं चे एक वाक्य आठवले ते म्हणतात " आकाशा  जेवा एखादा कृत्रिम ग्रह सोडतात तेंवा गुरुत्वाकर्षणाच्या सिमे बाहेर तो जाई पर्यंत प्रचंड संघर्ष असतो आणि त्याने एकदा गती घेतली कि पुढचा प्रवास आपोआप होतोअसेच आयुष्याचे असते.... तिच्या आणि मुलांच्या आयुष्याचे तरी दुसरे काय झाले 

बरेचदा परीस्थित्ती माणसाला लाचार करायची शक्यता असते, आणि त्या वेळेस कर्ती व्यक्ती परिस्थिती ला कशी सामोरे जाते त्या वर बरेच अवलंबून असते त्या मुळेच या सगळ्या परिस्थितीत तिने मुलांना योग्य  संस्काराचे बाळ कडू पाजले आणि परिस्थिती ची कल्पना देताना, लोकांनी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवण्यची शिकवण दिली, म्हणूनच हि सर्व मुले आज पण ५० वर्षा पूर्वी केलेल्या उपकाराची  जाणीव ठेवून आहेत
नारायण पेठेतून आश्रामावरून जाताना आजही माझ्या आई च्या डोळ्यात टचकन पाणी येते!!!! ते याच मुळे....

खरे तर अशा परिस्थितीत आजी ला फक्त चांगलेच अनुभव आले नसावेत,  त्याची दुसरी बाजू पण असेलेच ना, पण तिने त्या गोष्टी चा कधी उल्लेख केला नाही....

मुले मुली वेग वेगळ्या आश्रमात वाढत होते, अभ्यासात  प्रगती करत होते, पण कुठे तरी विधात्याला पण या कुटुंबाची ची परवड पाहून दया येत होती,  त्या वेळे पर्यंत मोठा मुलगा शिकून नोकरी ला लागला होता, दुसरा मुलगा तर बाल पणा पासूनच आई ला हात भार लावत होता, या वेळे पर्यंत दोन्ही मुलींचे शालेय शिक्षण संपले होते....आणि ती वेळ आली....पुण्यात बरीच वर्ष सदशिव पेठेत काढून ह्या  कुटुंबाने  औरंगाबाद ला स्थाईक होण्याचा निर्णय घेतला.

इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, खरे तर इतके वर्ष सदशिव पेठेत एका  वाड्यात रहायल्या मुळे नियमा प्रमाणे खरे तर ती खोली आजीच्या नावावर झाली होती, पण कुठलाही मागचा पुढचा विचार न करता पुणे सोडताना तिने खोलीचे पेपर्स तिच्या भाच्याच्या नावाकारून दिले, हा व्यवहारी अपूर्णांक होता का ??? नाही कारण तिचा तिच्या मुलांवर आणि त्या पेक्षा जास्त कर्माच्या सिद्धांता वर जास्त विश्वास होता....
मी मागे लिहिले तसे ती Visionary होती......
पुढे यथा सांग मोठा मुलगा औरंगाबाद ला नामवंत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून नोकरी ला लागून मुख्याधापक म्हणून निवृत्त झाला...दुसरा मुलगा औरंगाबाद च्या त्या काळातल्या आघाडी च्या "मराठवाडा" वृत्त पत्रात सेवा करून निवृत्त झाला, तिसरा मुलगा बँके मध्ये अधिकारी पदावरून निवृत्त झाला....२ मुली....एक मुलगी डॉक्टर होऊन कॅनडा मध्ये स्थाईक झाली, दुसरी मुलगी BA मराठी करून थोडा काळ नोकरी करून स्वतःच्या संसारात व्यस्त झाली...याच वेळेस तिला चांगल्या सुना मिळाल्या...त्यांना तिने नोकरी करण्या करता प्रोत्साहन दिले, त्या मुळेच या सगळ्या सुना शिक्षण क्षेत्रात नाव कमावून निवृत्त झाल्या....दोनही जावई डॉक्टर आणि प्राध्यापक एका पेक्षा एक सरस मिळाले......औरंगाबाद मध्ये बंगल्या मध्ये राहायचे भाग्य मिळाले.....यालाच म्हणतात कर्माचा सिद्धांत!!!

 पुढे जाऊन म्हणजे 60 -७० च्या दशकात विदेश गमन हे खरे अप्रूप होते तेंव्हा लेकी आणि जावया मुळे ती अर्धे अधिक जग पाहू शकली, नऊ वार साडीत वर ओवर कोट घालून काढलेलं फोटो पाहताना कौतुक मिश्रित हसू येते
आम्ही गमतीने म्हणतो तसे US कॅनडा ची जमीन ती सावरून आली होती, त्या मुळेच तिची अर्धी नातवंडे / पतवंडे तिथे स्थाईक होऊन नाव आणि पैसा कमावत आहेत. यातला विनोदाचा भाग सोडला तर या सगळ्या च्या मागे या लोकांचे कष्ट आणि कर्तुत्व तर आहेच पण तेवढेच तिचे कष्ट आणि आशीर्वाद आहेत...
तिला आयुष्याच्या प्रत्तेक वळणावर प्रवासात खूप चांगले लोक भेटले आणि तिच्या यशात कळत अथवा नकळत या लोकांचा सहभाग  होता, त्या मुळे आपण समाजचे काही देणे लागतो याची तिला जाणीव होती...त्या मुळे या कुटुंबाने पण समाजाची थोडी फार परत फेड करण्याचा सतत प्रयत्न केला आणि करत आहेत...

माणसांनी कितीही यश मिळविले तरी पाय जमिनीवर असायला हवेत....कारण ती नियती वरून पहात आणि हसत  असते!!! या गोष्टीची जाणीव असेलल्या आजी सारख्या फार कमी व्यक्ती असतात...साधे उदाहरण एके काळी घरोघरी किंवा खानावळीत पोळ्या करणारी हि बाई,  त्या मुळे पुढे आयुष्यात तिच्या मुलांच्या घरी पोळ्याला येणाऱ्या बायकान बद्दल तिला प्रचंड आस्था होती....त्या मुळेच आनंदी बाई तिची मानस कन्याच होत्या...
हे सगळी संचित पुण्य दीर्घ आणि निरोगी आयुष्य देते, असे मला तरी वाटते....
कधी कधी म्हणतात दीर्घ आयुष्य हा शाप असतो, पण जर का मूले आणि सुंना ना परीस्थित ची जाणीव आणि योग्य संस्कार असतील तर तो खरेच आनंद सोहळा होतो,कारण वार्धक्य हे एक बाळ पण असते, आणि त्या मुळेच  
तिच्या मुलांना आणि सुनांना त्याच्या वयाच्या साठी  आणि सतरीत एक ९० वर्षाचे बाळ होते....  आपण कल्पना करू शकतो कि तिचे शेवटचे आयुष्य किती आनंदात गेले असेल.

 बहिणाबाई चौधरींची कुठे वाचलेली किंवा ऐकलेली एक गोष्ट प्रकर्षाने आठवते...जेंव्हा त्यांचे "माझे माहेर माहेर" गाजत होते त्या वेळेस त्या खानदेशातील एका गावातून जात होत्या....एक साधू त्यांचे "माझे माहेर माहेर" ऐकून वैतागलेला...त्याने बहिणा बाई ना प्रश्न विचारला ..." एवढे जर का माहेरचे कौतुक तर सासरला आलीच कशाला?" प्रश्न ऐकून सगळे लोक स्तब्ध!!!   पण तेवढ्यात बहिणा बाई नि जे उत्तर दिले ते खरेच लाजवाब " ऐक गोसावड्या लेकी च्या माहेरा साठी माय नांदते सासरी !!!!!"

आजी सारख्या स्त्रिया या उत्तराच्या मूर्तिमंत उदाहरण!!!