Monday, April 21, 2014

कासवाची गोष्ट









कासवाची गोष्ट -

काल मराठी चित्रपट "येलो (YELLOW )" पाहिला, निर्माता , दिग्दर्शक, तंत्रन्ज्ञ, कलाकार आणि संपूर्ण team ला सलाम !
कथा गौरी गाडगीळ च्या  मेहनतीची आणि यशाची  ! तशीच ती मुग्धा गाडगीळ म्हणजे गौरी च्या आईच्या जिद्दीची.
डाऊन सिंड्रोम'मुळे "स्पेशल चाइल्ड' असलेल्या गौरी गाडगीळचा प्रेरणादायी प्रवास म्हणजेच YELLOW , तिच्या आईच्या जिद्दीला मिळालेली  श्री मामा ची साथ आणि गौरी चे शिक्षक प्रताप सरांची मेहनत.
हा चित्रपट डाऊन सिंड्रोम' मुलांच्या पालका करिता नक्कीच प्रेरणादायी ठरू शकेल.
पण त्याच वेळेस प्रत्येक  मुलाला गौरी बनविण्याचा अट्टाहास होणार नाही याची जाणीव ठेवणे महत्वाचे! कारण मनुष्य स्वभाव असा आहे न तो  आपली स्वप्ने मुलांच्यात पहात असतोखरे तर या मुलांकडून expect करिण्या पेक्षा त्यांना accept करणे हि खरी गरज !
special मुलाच्या नशिबात जिद्दी आई वडील असतातच पण गौरी प्रमाणे  श्री मामा  आणि प्रताप सर मिळण्या करिता भाग्य असावे लागते. 

८०० मुलांच्या मागे एक special child हे  आजचे statistics आहे आणि या अशा Special  मुलांकडे सहानुभूतीने पाहण्याची नाही तर त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे हि खरी गरज आहे.


मी का लिहितोय हे ??

कारण सिनेमा पहात असताना सतत डोळ्या समोर एकच मुलगी येत होती ,

स्मिता अर्थात माझी बहिण पिंकी !!
८०० मुलांच्या मागे देव एका पालकाच्या हाती चिकण मातीच्या ऐवजी वाळूचा गोळा देतो आणि पाहतो आई  वडिलांची परीक्षा …. आई वडिलाचे दुख: वाळूचा गोळा मिळाले हे नसते तर वाळू ला आकार देवू शकत नाही या असहाय स्थिती चे असते.

७९९ नंतर ८०० वा क्रमांक आला तो माझ्या काका, काकूचा !!

८० च्या दशकात जेंव्हा special child किंवा mentaly challenged असे शब्द प्रचलित झाले नव्हते तेंव्हा आबा आणि काकुच्या पोटी पिंकी चा जन्म झाला. सुरुवातीचे काही दिवस तर तिच्या बाबतीत नक्की काय वेगळय हेच कळत  नव्हते … आणि नंतर हळू हळू परिस्थितीची कल्पना आली.  आपले मुल इतर मुलां पेक्षा वेगळे आहे हे कळाल्या नंतर कुठल्याही आई वडिलांच्या पाया खालची वाळू सरकेल …. साहजिक आहेइथेहि तेच झाले. मग सुरु झाली धावपळ Alopethic , Ayurvedic , Homeopatheic  अशा नीर निराळ्या प्रकारच्या डॉक्टर कडे चकरा. असहाय आई वडिलांच्या परिस्थितीचा गैर फायदा घेत बहुतेक लोकांनी आपली तुंबडी भरून घेतली …. काही चांगले लोक भेटले पण अपवादाने …

आज जेंव्हा विचार करतो तेंव्हा वाटते कि त्या काळात आबा आणि काकूला एखाद्या चांगल्या Counselor ची गरज होती , पण तो काळ असा होता जेंव्हा हे शब्द फक्त Dictionary मध्ये असायचे.…. बाकी लोकांनी दिले  फक्त सहानभूती चे चार शब्द !! खरे तर ज्याची अजिबात गरज नव्हती
खरे तर सहानभूती देणारा समोरच्याचे दुख: आपल्या वाटी आले नाही या समाधानात असतोत्या मुळे ते सगळे अर्थ हीन असते!
दिवसा वर दिवस जात होते  पिंकी हळू हळू चालायला लागली …. थोडे फार  बोलू लागली स्वतःच्या गोष्टी स्वतः करू लागली.
पण त्या वेळेस या special मुलांच्या संगोपनाची काही वेगळी पध्दत असते असे सांगणारे कोणी भेटत नव्हते. सांगितले असते तर कदाचित आजच्या परिस्थितीत खूप फरक पडला असता .

निसर्ग कोणा करिता थांबत नसतो ! 

चांगले आठवते घरात गौरी येणार होत्या , संध्याकाळची वेळ होती … आणि …
काकू उन्मळून पडली … आई आणि अपर्णा काकुच्या गळ्यात पडून ढसा ढसा रडत होती तिचे लेकरू वयात आलें होते ???
या गोष्टीचा दोष कोणाला द्यायचा ?  निसर्गाला , नियतीला का साक्षात परमेश्वराला?


एकत्र कुटुंबातील आम्ही ८ भावंडे  बरोबरीने वाढत होतो  त्यात पिंकी पण एक …. एकत्र मस्ती करणे , TV  पाहणे , तासंतास गप्पा मारणे … या सगळ्या मध्ये पिंकीचा  पण उत्साही सहभाग असे.   आम्ही तिच्या वाढीचे फक्त साक्षीदार.
त्या नंतर हळू हळू आम्ही एक एक करत औरंगाबाद च्या घरातून बाहेर पडलो बहिणींची लग्ने झाली , आम्ही मूले नोकरी करिता बाहेर पडलो आम्ही सगळे आमच्या संसारात मग्न झालो  आणि परत ती एकटी पडली

आजकाल ती फारच शांत झाली आहे , फार कमी बोलते  …कळत नाही काय विचार करीत असते ? कदाचित जुन्या आठवणी काढत असेल … देव जाणे
काल YELLOW सिनेमा ने   पिंकी ची अनेक रूपे परत डोळ्या समोर आणली -

१. प्रत्येक बहिणीच्या लग्नांत ढसा ढसा रडणारी 
२. वाहिनीच्या मागे मागे फिरणारी 
३. अण्णा (मधल्या काकांशी ) भांडणारी 
४. घरात केवळ बाबांना घाबरणारी …राग आल्यावर इतर कोणाची फिकीर न करणारी
५. आमच्या सर्वांच्या मुलांवर मनापासून प्रेम करणारी
६. आजोबांच्या मृत्यू नंतर रडणारी
७. अमेरिकेहून आल्यावर तिकडच्या आठवणी सांगणारी

आजकाल ती परत शाळेत जायला लागली आहे, मध्यंतरी मी ती शाळा पण पाहून अलो एक छान अनुभव. तो एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
आबाचा दिवस पिंकी बरोबर सुरु होतो आणि दिवसाचा शेवट पण तिच्या बरोबर ….
जगात अशा असंख्य पिंकी, प्रिन्स, गौरी, आहेत. आबा काकू सारखे असंख्य आई वडील हृदयाला पीळ पाडून संगोपन करीत आहेत.
कोण आहेत ही मुलं ? काय दोष आहे त्यांचा ? परमेश्वरानीच निर्माण केली आहेत ना? काय मिळाल परमेश्वराला ?
हा जाब कोणीतरी विचारायलाच हवा !!

एक वाचलेली कविता आठवली -

"देवा जवळ ये हळुच , सांगतो तुझ्या कानात
सुखी आहे मी इथे हे आल का तुझ्या ध्यानात
नाही आता खंत एकट असण्याची
मिळाली नवी आशा सुंदर जीवन जगण्याची"

गौरी ने दाखवून दिले आहे , शर्यतीत आम्ही ससे नाही तर कासव आहोत…
     
बिपीन कुलकर्णी