वृद्धाश्रम का आनंदाश्रम ?
काल बागेश्री च्या
वडिलांच्या स्मरणार्थ कर्वेनगर मधील
मातोश्री वृद्धाश्रमात जेवण देण्याचा आणि ओघानेच तिथे असलेल्या ९० आजी आजोबा बरोबर पंक्ती प्रपंचाचा योग आला
...त्या लोकांशी गप्पा मारल्या नंतर , वृद्धाश्रम ही काळाची गरज
आहे का? की कुटुंब
व्यवस्थेची हार आहे ? या विचाराने डोके वर काढले.
गावोगावी मातोश्री
सारख्या अनेक संस्था त्यांच्या परीने वृद्धांची काळजी घेतच आहेत ..वृद्धाश्रमात भर
पडत आहे ... समाजाकरिता हे नक्कीच चांगले
लक्षण नाही , पण मान्य करावेच लागेल ती एक गरज झाली आहे..
का आणि कशा मुळे झाली गरज
? कोण जबाबदार आहे या परिस्थितीला ?
सहज उत्तर देता येईल ...
समाजात श्रावण बाळ राहिले नाहीत ?
इतके सोपे का आहे हे
उत्तर ?
याच्या खोलात गेले की
अनेक उपप्रश्न येतात ...
श्रावण बाळ म्हणजे आई
वडिलांना सांभाळणे एव्हढेच का आहे ?
वृद्धाश्रम वाढण्या करिता
फक्त श्रावण बाळ नसणे हेच का कारण आहे? वृद्धाश्रमात राहणे
म्हणजे का आयुष्याची हार आहे ? इथले जिणे म्हणजे अपमानास्पदच असते का ?वृद्धाश्रम पूर्वी नव्हते
का ?
एकत्र कुटुंब पद्धती आज
काल जवळपास नष्ट झाली आहे ... याला कारण
एकत्र कुटुंब पद्धती टिकून राहण्या करिता ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात त्या sacrifice ची गरज असते ... "मीच" का ? हा प्रश्न आला की कुटुंब व्यवस्था उन्मळून पडते ... घरात "मीच" का हा प्रश्न
विचारणारा जसा श्रावण बाळ असू शकतो तसा
वडिलधारा पण असू शकतो ... पण दुर्दैवाने
प्रश्न विचारणाऱ्या श्रावण बाळाचे प्रमाण जास्तच आहे .. असे असले तरी पूर्वी एकत्र
कुटुंब पद्धती मध्ये सगळेच वृद्ध सुखात नक्कीच नव्हते... मनुष्य स्वभाव आहे
वर्तमानात रमणारा , भूतकाळात डोकावणे शक्यतो टाळतो.
हे असे का ?या सगळया प्रश्नांचा विचार अगदी तरुण, मध्यमवयीन, वृद्ध प्रत्येकानेच केला पाहिजे.
एका घरात राहून जर मुला
मध्ये आणि आई वडीलां मध्ये संवाद होत नसेल
तर घर आणि वृद्धश्रमात काही फरक आहे का ?
मुले बाहेरच्या देशात
असतील आणि आई वडीलांचे मन तिथे रमत नसेल, अशा वेळेस त्यांनी वृद्धाश्रमाचा मार्ग
स्वीकारला तर चुकले का ?
मुले नसलेल्या
जोडीदारांनी कशा आणि कोणा कडून अपेक्षा ठेवायच्या ? एका जोडीदाराने अर्ध्या
वरती डाव सोडल्या वर दुसर्याने काय करायचे ?
‘सेकंड इंनिंग होम’ हे
बिल्डरने दिलेले गोंडस नाव म्हणजे वृध्दाश्रमा पेक्षा वेगळे काय आहे ?
खरे तर माणूस हा कळपात
राहणारा प्राणी आहे ... त्या मुळे अंत पेक्षा एकांत वाईट असतो... एकांताला मनुष्य जास्त घाबरतो...
आयुष्य म्हणजे शेवटी
तळ्यात मळ्यातला खेळ ...
कधी "शुद्ध बीजापोटी
फळे रसाळ गोमटी " हे वाक्य फोल ठरल्याने वृद्धाश्रम नशिबी येतो ...
कधी नियती चा आघात
होतो ..
कधी पैशाचे गणित
चुकते ..
कधी कर्माचा सिद्धांत न्याय देऊन जातो ...
तर कधी नशीब खो देते
...
वृद्धाश्रम कधी लादला
जातो तर कधी स्वीकारला जातो .... काहीही झाले तरी शेवटी गरज बनून राहतो ...
सन्मानाने जगायचा
प्रत्येकाला अधिकार आहे ... सगळ्यांनाच
आयुष्यातली space हवी आहे...
.. स्वतःसाठी जगणे महत्वाचे ,समाजाला फारसे महत्व न देता आपला आनंद शोधणे महत्वाचे
... समाज इसापनीतीतील गोष्टी सारखा "
पाठीवर घेतले काय किंवा पाठीवर बसले काय " नाव ठेवायचे काम करीतच असतो… म्हणुन आयुष्य कसे
जगायचे, रडत की हसत?
हे आपले आपणच ठरवायला
हवे. आनंद आणि इतर समाधान मिळविण्याचे
ठिकाण प्रत्येकाचे वेगळे ... कोणाला स्वतः च्या घरात मिळेल तर कोणाला वृद्धाश्रमात शोधावे लागेल म्हणून या शब्दाला
चिकटलेली दुःखाची किनार काढून फेकून देऊ
तो खरा सुदिन..
आयुष्याची संध्याकाळ
प्रसन्न होणे ही खरी गरज ... कातरवेळेची
हूरहूर न वाटता देवा समोर लावलेल्या निरांजनेतील दिव्या सारखी प्रसन्नता येणे महत्वाचे ..
एक गोष्ट मान्य करायलाच
हवी जिथे समाजात पाळणा घर
आनंदाने स्वीकराले जातात तिथे वृद्धाश्रम स्वीकारले तर चुकले कुठे ? आजचे पाळणा घर उद्याचे वृद्धाश्रम झाले तर आस्चर्य वाटायला नको ...
(आज आपल्यावर नियती
प्रसन्न आहे असे समजून आपण हॉटेल मध्ये १५००-२००० रुपये सहज खर्च करीत असतो , मग कधी तरी मुलांना नेऊन अशा आनंदी लोकां बरोबर
जेवण करण्याचा अनुभव घेणे गरजेचे आहे … शेवटी ती नियती आहे आपल्यावर किती दिवस प्रसन्न राहील हे एक कोणीच सांगु शकत
नाही ना ? )
बिपीन कुलकर्णी
No comments:
Post a Comment