Monday, November 20, 2017

सिनेमॅजिक ....


सिनेमॅजिक ....                                                                                                     २० नोव्हेंबर २०१७

जेंव्हा दक्षिण भारतातील रजनीकांत च्या फॅन्स च्या कथा ऐकतो किंवा वाचतो तेंव्हा नकळत माझे सिनेविश्व डोळ्यासमोर येते .... 

आजच्या मल्टिप्लेक्स च्या जमान्यात जुन्या म्हणजे १५- २० वर्षा पूर्वी च्या सिनेमा बद्दल आजकालच्या मुलांना सांगितले तरी खरे वाटणार नाही...

तेंव्हा सिनेमा हा आजच्या इतका खर्चिक नक्कीच नव्हता तसेच लोक सिनेमा ला जाणे म्हणजे केवळ सिनेमा पाहणे या उद्देशाने जात होते , पॉपकॉर्न किंवा फ्राईज खाणे हा उद्देश खचितच नव्हता... 

सोलापूर , औरंगाबाद आणि पुणे .... या तीनही शहराना स्वतःचे असे सिनेमाचे  तत्वज्ञान  होते...

मल्टिप्लेक्स चा उदय होण्याच्या कैक वर्षा आधी पासून सोलापूर शहरात भागवत टॉकीज नामक ४ सिनेमा गृह एकत्र असलेले चित्रपट गृह आहे , या शिवाय आजूबाजुला अनेक चित्रपट गृह आहेत .... नवी पेठ हे सोलापूर चे खरे तर  "डाउनटाउन" त्या भागात एकत्र अनेक थिएटर्स आहेत  ... 
यातील बरेचसे बहुदा  हिंदी चित्रपट दाखवत , पण कल्पना  सिनेमागृहात फक्त इंग्लिश , प्रभात मध्ये मराठी , पदमा आणि अजून एक दोन ठिकाणी फक्त तेलगू आणि कन्नड अशी अलिखित विभागणी होती..
या प्रत्त्येक चित्रपट गृहाच्या च्या बाहेर सिनेमा चे मोठं मोठे कट आउट्स असत  , १५-२० फुटी अमिताभ , धर्मेंद्र ,अमजद खान , रेखा , हेमा  अजूनही डोळ्या समोर येतात , त्यात या कट आउट्स ना नोटांचे हार , फुलांचे हार एवढेच काय लॉटरी च्या तिकिटाचे हार घातले जायचे...

या पैशाचे आणि लॉटरी च्या तिकिटाचे नंतर काय करत असतील हा तेंव्हाचा  बाल मनातील प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे ...

सिनेमा हा पाहायचा नाही तर अनुभवायचा असतो हे सोलपूरकरांना चांगलेच माहित... शिट्ट्या वाजविणे , ओरडणे , गाण्यावर पैसे फेकणे इतकेच काय एखाद्या चित्रपटात देवीची आरती असेल तर बायकांच्या अंगात आल्याचे किस्से पण चर्चिले जायचे...

सकाळी एक तास खिडकी उघडून तिकिटे विकणे म्हणजे ऍडव्हान्स बुकिंग... त्यात मोठी रांग , मारामाऱ्या आज सांगून खरे वाटणार नाही...
सिनेमा तिकीटा  चा काळा बाजार हा सर्रास असे .... "दस  का बीस" किंवा " बाल्कनी पच्चीस" हे नेहमीचे...
"House Full " चा बोर्ड लावून त्याला हार घालणे... प्रत्येक गोष्टीला हार घालून नकळत देवत्व देण्याची पद्धत ...
या सगळ्या दिव्यातून तिकीट मिळून सिनेमा पाहणे हा नक्कीच अनुभव असे....  

अगदी आई वडीलां बरोबर प्रभात ला लाखाची गोष्ट, शेजारी, संत ज्ञानेश्वर  हे सिनेमे रिपीट ला पाहिल्याचे आठवते... अगदी तसेच एका ईद च्या दिवशी भागवत थिएटर ला " पाकिझा " पण पाहिल्याचे आठवते...

आमची कॉलनी थोडी उच्चभ्रू म्हणता येईल , तर कॉलोनी तील एखादे काका आम्हा मुलांना नेऊन इंग्लिश सिनेमा दाखवत ... Jaws , star wars किंवा Bruce Lee चे चित्रपट, जेम्स बॉण्ड पट आणि असेच अजून काही चित्रपट पाहिल्याचे आठवते. खरे सांगायचे तर इंग्लिश सिनेमा तेंव्हाही नाही आणि आजही मला समजत नाही      ... त्यांचे तोंडातल्या तोंडात बोलणे अक्षरशः डोक्यावरून जाते ... इंग्लिश सिनेमा ला गर्दी करणाऱ्या प्रेक्षकांची मला खरेच भीती वाटते, असे लोक बघितले की मी स्वतःला फार कमी लेखायला लागतो .... असो
आपला प्रांत हिंदी चित्रपटाचा... त्यावर मात्र आपले मनापासून प्रेम ... हिंदी सिनेमा आवडला नाही असे तेंव्हा कधी झाल्याचे आठवत नाही...

एक तर सिनेमा ला जाणे हे क्वचित व्हायचे त्यात  तिकीट मिळण्या करिता एवढे दिव्य....  त्या मुळे  आवडला नाही म्हणायची चैन परवडणारी  नव्हती... 

अमिताभ तर दैवत च... त्या मुळे त्याचे शान, दोस्ताना , सिलसिला , मुकद्दर का सिकंदर या  सिनेमाना आई आम्हाला घेऊन गेली होती , अमिताभ चे त्या पूर्वीचे चित्रपट नंतर TV  वर किंवा रिपीट ला पाहिलेत...

प्रत्येक सोलापूर कराचे ग्राम दैवता इतकेच हिंदी चित्रपटा वर प्रेम , आपण चित्रपट पहिला नाही तर कदाचित निर्माता दिवाळखोर होईल अशी भाबडी भीती , त्या मुळे येणारा प्रत्येक चित्रपट हाऊस फुल होणारच...

औरंगाबाद चे थोडे वेगळे... निझाम संस्थानातून वेगळे होऊन काळ लोटला तरी आजही दोन मराठी मित्र भेटले कि हिंदीत बोलणारे शहर...

सादिया , रॉक्सि , गुलजार, रिगल , अंबा ,अप्सरा , अंजली , संगीता, मोहन  अशी मिश्र चित्रपट गृहांची नावे ...
महाराष्ट्रात असूनही मराठी पेक्षा हिंदीचाच पगडा असलेले शहर...

इंग्लिश सिनेमा ला औरंगाबाद मध्ये  पोषक वातावरण कधीच नव्हते  , मराठी ला तर  त्याहून कमी... हिंदी मात्र तुफान चालत... एकच सिनेमा २-३ चित्रपट गृहात प्रदर्शित होणे पहिल्यांदा मी औरंगाबाद मध्ये पहिले...

सिनेमा ला देवत्व देणे किंवा त्याचे फार लाड असे औरंगाबाद मध्ये होत नव्हते ... गर्दी करून सिनेमा पाहणे आणि नंतर हिंदी भाषे मध्ये अर्धा  कप चहा पीत संध्याकाळी गप्पा रंगवणे... हीच काय ती सिनेमा परीक्षण करण्याची पद्धत ....

मोहन , रिगल किंवा स्टेट talkies औरंगाबाद मधील शहागंज आणि सिटी चौक भागात , तो जुन्या औरंगाबाद चा भाग... दर्शनी भागात मोठा जाळीचा दरवाजा आणि नंतर अंधारातील चिंचोळ्या रस्तयाने गेल्यावर पुढे तिकीट खिडकी .......आंबा -अप्सरा त्या मानाने औरंगाबाद मधील मध्यवस्तीत , त्या काळातील थोडे उच्यवर्गीय सिनेमागृह .... भरपूर खेळती हवा, समोर मोठी मोकळी जागा , व्यवस्थति तिकीटाची खिडकी ...त्याच्या थोडे पुढे गेले कि अंजली-  संगीता , ज्यांनी डॉल्बी साऊंड ची औरंगाबाद कराना ओळख करून दिली,
नंतर आलेले  सत्यम, अभिनय वगैरे पण थोडे उच्यवर्गीय चित्रपट गृह....

सोलापूरकरांनी सिनेमा वर भाबडे प्रेम केले ... तर औरंगाबाद करानी व्यवहारी प्रेम.... तिकीट काढल्या नंतर पैसे वसूल व्हायलाच हवे हि अपेक्षा.... आता प्रत्येक सिनेमा चा निर्माता काय औरंगाबाद कराना डोळ्यासमोर ठेवून का निर्मिती करणार?

समांतर किंवा कलात्मक असे पण सिनेमे असू शकतात या वर औरंगाबाद करांचा विश्वासच नाही.... तसे काही सिनेमे आले कि डोअर किपर ला कंपनी मिळेल याची खात्री नसे....
आज औरंगाबाद मध्ये काही जुनि  चित्रपटगृहे मल्टिप्लेक्स मध्ये रूपांतरित झाली आहेत  आणि त्याच बरोबरीने नवीन उभारली गेलीत ....

बदल तर होणारच कारण शेवटी change is only the constant thing !

पण शेवटी औरंगाबाद काय किंवा सोलापूर काय ,त्या गर्दीत तिकीट काढून , अंधारात चाचपडत खुर्ची शोधत , फॅन च्या उकाड्यात , मध्यन्तरात खाल्लेल्या खारे दाण्या बरोबर पाहिलेल्या सिनेमाची मजा आज घरी बसून book my show वरून तिकीट काढून , १०० रुपयाचे फ्राईज , पॉपकॉर्न खात , ac ची थंड हवा घेत सिनेमा पाहण्यात नक्कीच नाही....

आजची तरुण पिढी नक्कीच त्या गमती ला  मुकली आहे....

पुढील भागात पुणे ....

बिपीन कुलकर्णी





   

1 comment:

  1. Excellent! True to the spirit of Multiplex, Bhagavat talkies had restaurant and even video parlour. It's unbelievable but true.

    I used go to watch a movie with my cousin. It used to be complete fun with movies, video game at parlour and Vada Sambar at Gadag Grand.

    Very well written Bipin.

    I was never a serious movie watcher, but the write up brought out whatever small memories

    ReplyDelete