Sunday, October 7, 2018

मिनिमलिस्टिक लाइफस्टाइल ....



मिनिमीलिस्टिक लाईफ स्टाईल या विषयवार आज काल बरीच चर्चा किँवा लिखाण चालू असते ..

योगायोग असा ना कालच  या विषयवार एक लेख वाचला आणि त्याचा आज लगेच अनुभव आला ...नवरात्र येणार म्हणुन बायकोने घराची आवरा आवरी काढली ...पूर्वी आई ची गडबड असायची आणि आता बायकोची ...काय आहे हा विषय ?
आपण हौस म्हणून .. किंवा पुढे कधी गरज पडेल म्हणुन अथवा अजून काही कारणाने सतत वस्तूंची खरेदी करीत असतो ... यातल्या किती वस्तु आपण खरेच वापरतो ?
या वस्तुंनी घरातले माळे , कपाटे खचाकच भरलेले असतात ... माळे किँवा कपाटेच कशाला ? स्वयंपाक घरात किँवा कपडयांच्या कपाटात डोकवले तरी लक्षात येते ..या पैकी  कीती वस्तूचा वापर आपण खरेच करतो ?

एटी ट्वेण्टी थिअरी सगळ्या गोष्टींना लागु होत असते ... म्हणजे काय तर आपल्या २० टक्के वस्तु आपण ८० टक्के वेळेस वापरतो .. दुर कशाला आपल्या कपड्यां कडे पहिले तरी या थिअरी ची कल्पना येऊ शकते ...हेच स्वयंपाक घरातील भांडी असो किँवा घरातील अजून काही सामान याना लागु होते ...
याचा साधा सरळ अर्थ असा  वीस टक्के वस्तुं वर आपण आनंदात संसार च नाही तर आयुष्य जगु शकतो  ..असे असूनही उरलेल्या ८० टक्या करता अट्टाहास चालु असतो ..

घरातील कीती तरी वस्तु वर्ष भर वापरलेल्या नसतात ? वर्ष भर गरज नाही पडली म्हणजे खरे तर निरुपयोगी ना .. पण आपण ती वस्तु काढत का नाही ?

आपल्या भारतीय स्वभावात एखादी गोष्ट टाकून देणे जमत नाही. मग ती गोष्ट जीर्ण, जुनी असो, बिनकामाची असो, बिघडलेली असो वा तुटकीफुटकी असो. बहुतांश गोष्टींमध्ये आपली भावनिक गुंतवणूक झालेली असते. काही पाश्चात्त्य देशांप्रमाणे ‘यूज अँड थ्रो’ ही संकल्पना आपल्याकडे तितकीशी रुजलेली दिसून येत नाही.
आमचा  स्वभाव कशातही गुंतत जातो ... निर्जीव वस्तु वर पण जीव लावतो . ..
भावना असाव्यात पण त्या मुळे कीती जमवावे ?

एका अभ्यासा प्रमाणे  घरात माणशी जास्तीत जास्त शंभर वस्तुंची गरज असते   .. म्हणजे चौकोनी कुटुंबात जास्तीत जास्त चारशे ??
शर्ट किँवा इतर कपडे ...जुने मोबाईल , दिवे , मुलांची खेळणी ... चपला , बूट , घड्याळे ,ही काही उदाहरणे ...
स्वयपाक घर म्हणजे या सगळ्या वर कडी असते .. चार जणांच्या घराला ताटे वाट्या किँवा चहाचे कप कीती लागावेत ? इतकेच काय  अनेक प्रकारची चहाची  , दुधाची किँवा दह्याची भांडी असतात ..चमचे ,फुल पात्र , पेले  तर विचारायची सोय नाही .. शाकाहारी घरात फोर्क आणि नाईफ चे काय काम ? समजा असले काम तरी खरेच का आपण ब्रिटिश साहेबा सारखे काट्या चमच्याने जेवतो तवा कढई बद्दल तर न बोललेलेच बरे ...

या सगळ्या खरेदीत कीती पैसा अडकवला ? इकॉनॉमिक्स च्या नियमा प्रमाणे ROI म्हणजे Return on Investment कीती आले ? आपणच आपले working capital ब्लॉक करतो हे लक्षातच येत नाही ?

वस्तु जमवण्याच्या मानस शास्त्रा चा एक नियम आहे .. आणि तो सगळयांनाच लागु पडतो ...
You buy the things which you really don’t required, for that you don’t have spare money and you buy to show them whom you don’t like...

एका खोली पासून संसार सुरु करून आज जर का ४-५ खोल्यांचे घर कमीच पडत असेल तर विचार नको का करायला ?
भावनेने गुंतत असताना अडगळ आणि वारसा याना वेगळे करायलाच हवे ...अडगळीतून बाहेर पडलो तरच वारसा जपता येईल हे लक्षात घेणे महत्वाचे ...

नसता आजची खरेदी उद्याची अडगळ नाही झाली तर नवल ?

यालाच म्हणतात मिनिमलिस्टिक लाइफस्टाइल ...

बिपीन कुलकर्णी




आज जागतिक हृदय दिवस ...



मानवी शरीरात ऊर्जेची जी सात चक्रे आहेत त्या पैकी एक हृदय ...खरे तर शरीरातील सगळे अवयव महत्वाचे आहेतच पण एकूण हृदयाच्या बाबतीत आपण थोडी जास्तच काळजी घेतो ... ती काळजी भीती पोटी असते..
खरे तर  मेंदू आणि हृदय हे प्रमुख अवयव ... मेंदूची भूमिका घरातील कुटुंब प्रमुखाची तर हृदयाची भूमिका ही आई ची ...
एखादया पित्या प्रमाणे मेंदूचे काम अखण्ड चालू असते ... त्याच वेळेस घरातील आई प्रमाणे हृदयाचे कामही बिनभोबाट चालू असते ...
पित्याच्या भूमिकेत राहून मेंदू पूर्ण कुटुंबावर म्हणजेच शरीरावर एकसमान  नियंत्रण ठेवतो  ...
पण हृदयाचे तसे नाही ... आईचे जसे आपल्या कुटुंबातील खोडकर , द्वाड अपत्यावर जास्त प्रेम असते तसे हृदयाचे ही लाडके अपत्य असते ... त्याला म्हणतात "मन"... खोडकर अपत्या च्या वागण्याचा परिणाम जसा  आई वर होतो तसाच  मनाचा हृदयावर ...
हृदयाचे  ठोके आणि ब्लड प्रेशर नियंत्रित असेल तर हृदयाचे आरोग्य योग्य आहे असे म्हणतात ... पण ते द्वाड कार्ट यात खोडा घालायचे काम करीत असते.. 

वयाच्या तिशीत जर का हार्ट अटॅक येत असेल तर  काय म्हणावे ? . पूर्वीच्या पिढीत वैद्यकीय विज्ञानाची आजच्या इतकी प्रगती नसून सुद्धा  हृदय रोगाचे प्रमाण आजच्या पेक्षा कमी होते ...  

कुठे तरी काही तरी चुकतेय हे नक्की ..

बुद्धिवान लोकांची संख्या वाढत आहे , पण त्या प्रमाणात हृदयवान लोक वाढत आहेत का ?

रामदास स्वामी नी त्या काळी लिहिलेले मनाचे श्लोक हेच सांगतात ..

नको रे मना क्रोध हा खेदकारी। नको रे मना काम नाना विकारी। नको रे मना लोभ हा अंगीकारू। नको रे मना मत्सरू दंभ भारू। 

त्या मुळे शरीरा बरोबर , मनाचे व्यायाम आणि माईंड मॅनेजमेंट आता काळाची गरज झाली आहे ...

बिपीन कुलकर्णी






Tuesday, October 2, 2018

अकबराची गांधीगिरी ....

अकबराची गांधीगिरी ..

अकबर बिरबल गोष्टीतील अकबराचे  संस्थान केंव्हाच खालसा झाले होते , अकबराने पोटापाण्याच्या सोयी करता व्यवसाय सुरु केला होता , आता तो देशो देशी शाखा असलेल्या एका मोठ्या बिझिनेस हाऊस चा मालक आणि चेअरमन होता आता इंग्लिश नाव घेतले होते त्याने मिस्टर अक्की...आणि बिरबल मिस्टर बॅरी अर्थात कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO. ...आणि मिस रॉनी होती HR प्रमुख ...
मनुष्य स्वभाव बदलणे सोपे नसते ... त्या मुळे मी. अक्की  ची भूमिका बदलली तरी स्वभावातला विचित्र पणा तसाच होता .

बोर्ड मिटिंग मध्ये सगळे विभाग प्रमुख पुढच्या  तीन महिन्याचे प्लॅन्स बादशहा म्हणजे चेअरमन ला  प्रेझेंट करीत होते ... मिस रॉनी चे प्रेझेन्टेशन जेंव्हा सुरु झाले , तेंव्हा अक्की  च्या चेहरयावर वर चे रंग बदलले , बॅरी  शेजारी बसला होता , त्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही की " आज  चेअरमन कूछ तुफानी करने वाला है "
बॅरी पुढच्या येणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यायची तयारी करू लागला,

बादशहाने रॉनी ला मधेच थांबवून विचारले
" आपल्या कंपनी कल्चर बद्दल लोकांचे काय मत आहे "
" सर कल्चर च्या बाबतीत भारतातील पहिल्या काही कँम्पनीन पैकी एक आपली कंपनी आहे "  रॉनी HR च्या भूमिकेत पुटपुटली , आणि तिने हळूच बॅरी कडे पहिले , बॅरी नुसते हसला ..
" नाही मी समाधानी नाही या बाबतीत " अक्की म्हणाला
" सर आपल्या मनात नक्की काय आहे ? काय अपेक्षा आहेत आपल्या ?"
" आपण जरी बहुराष्ट्रीय झालो तरी मूळ भारतातले आहोत , म्हणून मला कल्चर वेगळे हवे आहे ... माझ्या डोक्यात थोड्या वेगळ्या कल्पना आहेत " अक्की म्हणाला .
" मी. अक्की काय आहे आपल्या मनात ?' बॅरी म्हणाला
" बॅरी आणि रॉनी , नीट ऐका मी काय सांगतो , आपल्या राष्ट्रपित्याची दीडशेवी जयंती या वर्षी आपण साजरी करीत आहोत , तर मला असे वाटते आपल्या समूहात आपण गान्धीवाद रुजवावा "
रॉनी आणि बॅरी हे समजण्याच्या पलीकडे गेले होते ..
" आपल्याला गांधीवाद म्हणजे नेमके काय अपेक्षित आहे ?" इति बॅरी
" सी बॅरी , स्वावलंबन , अहिंसा , सत्याग्रह , शाकाहार , सत्याचे आचरण , साधी राहणी आणि  ब्रम्हचर्य हे कल्चर आणावे लागेल "
" मी. अक्की बाकी ठीक , पण ब्रम्हचर्याचा आणि आपल्या कम्पनी कल्चर चा काय सम्बंध ? लोकं आपल्या समुहा बद्दल उगाच गैरसमज करून घेतील " आणि त्याला रॉनी ने पण दुजोरा दिला.
अक्की ने नाईलाजाने ब्रम्हचाऱ्याला कल्चरल पॉलिसी मधुन वगळायला परवानगी दिली.
आणि नवीन पॉलिसी आणायच्या सूचना दिल्या ..

दुसऱ्या दिवशी पासून रॉनी आणि टीम ने नवीन पॉलीसी अमलात आणली.
सकाळच्या बायोमेट्रिक हजेरी नंतर प्रार्थना सुरु झाली...
कॅन्टीन मध्ये शुद्ध शाकाहारी सात्विक जेवण सुरु झाले..
सुटा बुटात येणारे अधिकारी , बंडी पायजमा घालुन येऊ लागले...
वर्कर च्या जागी हरी सेवक हा शब्द आला...
चरखा नसल्या मुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला रोज किमान एक तास तरी फोटो कॉपीअर मशीन चालवावे लागे...
रॉनी आणि टीम ने .. शेळीच्या दुधाचा  चहा आणि कोफी देण्या करता खूप प्रयत्न केला .. पण ते शक्य झाले नाही ..
चहा कोफी मशीन अडगळीत गेले , कर्मचाऱ्यांना सकाळ दुपार दूध देणे सुरु झाले.
लोकांनी सत्य बोलावे आणि अहिंसा स्वीकारावी या करता प्रयत्न सुरु झाले.

बॅरी तसा हुशार ... या सगळ्या घडामोडी तो दुरून पहात होता ... विरोध अजिबात करीत नव्हता. यांचे परिणाम काय होणार हे तो जाणून तेंव्हाची परिस्थिती कशी हाताळायची याचा विचार करीत  होता ...

महिन्याच्या रिव्यू मिटींग्स होत होत्या ...
त्यात लोक बंडी पायजमा घालुन .. अतिशय मृदू आवाजात .. दूध पीत चर्चा करीत असत.

असे होता होता सहा महिने झाले ...

कंपनी चे अर्ध्या वर्षाचे निकाल बाहेर आले ...जे बॅरी ला अपेक्षित होते तसेच झाले ...budget vs actual मध्ये प्रचंड फरक होता ...
अर्थात अक्की नाराज होता ..आतून प्रचंड चिडला होता ... पण नवीन कल्चर मध्ये चिडणे योग्य नव्हते .. मृदू आवाजात आपल्या भावना पोहोचवणार तरी कशा ?

त्याने बॅरी कडे मदतीच्या अपेक्षेने पाहिले .. कारण बॅरी त्यातून मार्ग काढेल अशी खात्री होती ,,,,

बॅरी ने बोर्ड मेम्बर कडे एकदा कटाक्ष टाकला आणि बोलायला सुरुवात केली ..
मिस्टर अक्की आणि मान्यवर मंडळी , आपले अर्ध्या वर्षाचे निकाल पाहून .. हे असे का झाले याचा विचार करणे आज गरजेचे आहे , नसता खूप उशीर झालेला असेल ...
मी.अक्की च्या इचछे मुळे आपण कल्चर बदलण्याचा प्रयत्न केला , महात्माजी महान होते , त्यांच्या pirnciples चा आपण आपल्या सोयीने अर्थ लावत कल्चर बदलण्याच्या नावाखाली कम्पनी मध्ये विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम राबविला...अहिंसे च्या नावाखाली कर्मचारी विभाग प्रमुखाला उलट उत्तरे द्यायला लागली , स्वावलंबना मुळे कोणी कुठले काम करायचे याला धरबंध राहिला नाही ... सेल्स चे लोक बंडी पायजमा घालून नवीन बिझिनेस आणायला गेल्यावर त्यांना कोणी महत्व दिले नाही ...सकाळ दुपार दूध पिउन आणि पौष्टिक खाऊन कर्मचारी वर्ग सुस्तावला ...
वेळ झाली कि महत्वाची कामे सोडून लोक फोटोकॉपीअर कडे आणि प्रार्थनेला धावायला लागली ...
मग कसे results येतील ? हा गांधीवाद आहे का गांधीगिरि ??
त्या महात्म्याला तरी हे अपेक्षित होते का ? त्यांची तत्वे कळाली नाही म्हणून का आपल्या सोयीने अर्थ लावायचा ?
महान माणसे ज्या काही गोष्टी अंगिकारतात ती त्या काळाची गरज असते ?
साधी राहणी म्हणजे का बंडी पायजमाच घालायला हवा ?
ते चरखा कातत म्हणून का आपण लोकांना फोटोकॉपीअर वर बसवायचे  ?
खरे तर गांधीवाद आत्मसात करण्याचे पहिले पाऊल म्हणजे आत्मपरीक्षण , त्या मधुन आपल्या झालेल्या चुकांतून शिकायचे .. मग त्यातून येतो विवेक ... म्हणजेच संयम ... एकदा संयम आला की अहिंसा आपोआप येते  ...कोणताही विवेकी माणूस इतरांचा अनादर करीत नाही ... दुसर्यांचा सन्मान करणे ...त्याची लायकी न ठरवणे हा खरा गान्धीवाद ..
कंपनी चे नुकसान करून आपली तत्वे अंगिकारा असे कधीच बापू म्हणाले नाहीत ना ...
बॅरी ने  बोलणे सम्पविले ..
अक्की काय ते उमजला ..
रॉनी परत कामाला लागली ... परत जुनी पॉलिसी सगळ्या कर्मचाऱ्यात फिरवली ..
आणि परत जुने दिवस सुरु झाले ....

बिपीन कुलकर्णी





Monday, October 1, 2018

वृद्धाश्रम का आनंदाश्रम ?




वृद्धाश्रम का आनंदाश्रम ?  

काल बागेश्री च्या वडिलांच्या स्मरणार्थ कर्वेनगर मधील  मातोश्री वृद्धाश्रमात जेवण देण्याचा आणि ओघानेच तिथे असलेल्या  ९० आजी आजोबा बरोबर पंक्ती प्रपंचाचा योग आला ...त्या लोकांशी गप्पा मारल्या नंतर , वृद्धाश्रम ही काळाची गरज आहे का?  की कुटुंब व्यवस्थेची हार आहे ? या विचाराने डोके वर काढले.

गावोगावी मातोश्री सारख्या अनेक संस्था त्यांच्या परीने वृद्धांची काळजी घेतच आहेत ..वृद्धाश्रमात भर पडत आहे ...  समाजाकरिता हे नक्कीच चांगले लक्षण नाही , पण मान्य करावेच लागेल ती  एक गरज झाली आहे..

का आणि कशा मुळे झाली गरज ? कोण जबाबदार आहे या परिस्थितीला ?

सहज उत्तर देता येईल ... समाजात श्रावण बाळ राहिले नाहीत ? इतके सोपे का आहे हे उत्तर ?

याच्या खोलात गेले की अनेक उपप्रश्न येतात ...

श्रावण बाळ म्हणजे आई वडिलांना सांभाळणे एव्हढेच का आहे ? वृद्धाश्रम वाढण्या करिता फक्त श्रावण बाळ नसणे हेच का कारण आहे? वृद्धाश्रमात राहणे म्हणजे का आयुष्याची हार आहे ? इथले जिणे म्हणजे अपमानास्पदच  असते का ?वृद्धाश्रम पूर्वी नव्हते का ?

एकत्र कुटुंब पद्धती आज काल जवळपास  नष्ट झाली आहे ... याला कारण एकत्र कुटुंब पद्धती टिकून राहण्या करिता ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात त्या sacrifice ची गरज असते ... "मीच" का ? हा प्रश्न आला की कुटुंब व्यवस्था उन्मळून पडते  ... घरात "मीच" का हा प्रश्न विचारणारा जसा  श्रावण बाळ असू शकतो तसा वडिलधारा पण असू शकतो  ... पण दुर्दैवाने प्रश्न विचारणाऱ्या श्रावण बाळाचे प्रमाण जास्तच आहे .. असे असले तरी पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती मध्ये सगळेच वृद्ध सुखात नक्कीच नव्हते... मनुष्य स्वभाव आहे वर्तमानात रमणारा , भूतकाळात डोकावणे शक्यतो टाळतो.    

हे असे का ?या सगळया प्रश्नांचा विचार अगदी तरुण, मध्यमवयीन, वृद्ध प्रत्येकानेच केला पाहिजे.

एका घरात राहून जर मुला मध्ये आणि आई वडीलां मध्ये संवाद होत  नसेल तर घर आणि वृद्धश्रमात काही फरक आहे का  ?

मुले बाहेरच्या देशात असतील आणि आई वडीलांचे मन  तिथे रमत नसेल,  अशा वेळेस त्यांनी वृद्धाश्रमाचा मार्ग स्वीकारला तर चुकले का  ?

मुले नसलेल्या जोडीदारांनी कशा आणि कोणा कडून अपेक्षा ठेवायच्या ? एका जोडीदाराने अर्ध्या वरती डाव सोडल्या वर दुसर्याने काय करायचे ?

‘सेकंड इंनिंग होम’ हे बिल्डरने दिलेले गोंडस नाव म्हणजे वृध्दाश्रमा पेक्षा वेगळे काय आहे  ?

खरे तर माणूस हा कळपात राहणारा प्राणी आहे ... त्या मुळे अंत पेक्षा एकांत वाईट असतो...  एकांताला मनुष्य जास्त घाबरतो...

आयुष्य म्हणजे शेवटी तळ्यात मळ्यातला खेळ ...

कधी "शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी " हे वाक्य फोल ठरल्याने वृद्धाश्रम नशिबी येतो  ...
कधी नियती चा आघात होतो   ..
कधी पैशाचे गणित चुकते   ..
कधी कर्माचा  सिद्धांत न्याय देऊन जातो  ...
तर कधी नशीब खो देते  ...

वृद्धाश्रम कधी लादला जातो तर कधी स्वीकारला जातो .... काहीही झाले तरी शेवटी  गरज बनून राहतो ...

सन्मानाने जगायचा प्रत्येकाला अधिकार आहे ... सगळ्यांनाच आयुष्यातली space हवी आहे...  .. स्वतःसाठी जगणे महत्वाचे ,समाजाला फारसे महत्व न देता आपला आनंद शोधणे महत्वाचे ...  समाज इसापनीतीतील गोष्टी सारखा " पाठीवर घेतले काय किंवा पाठीवर बसले काय " नाव ठेवायचे काम करीतच असतो  म्हणुन आयुष्य कसे जगायचे, रडत की हसत? हे आपले आपणच ठरवायला हवे. आनंद आणि इतर समाधान  मिळविण्याचे ठिकाण प्रत्येकाचे वेगळे ... कोणाला स्वतः च्या घरात मिळेल तर कोणाला  वृद्धाश्रमात शोधावे लागेल म्हणून या शब्दाला चिकटलेली दुःखाची  किनार काढून फेकून देऊ तो खरा सुदिन..

आयुष्याची संध्याकाळ प्रसन्न होणे ही खरी गरज  ... कातरवेळेची हूरहूर न वाटता देवा समोर लावलेल्या निरांजनेतील दिव्या सारखी प्रसन्नता येणे  महत्वाचे .. 

एक गोष्ट मान्य करायलाच हवी जिथे समाजात पाळणा घर आनंदाने स्वीकराले जातात तिथे वृद्धाश्रम स्वीकारले तर चुकले कुठे ? आजचे पाळणा घर उद्याचे वृद्धाश्रम झाले तर आस्चर्य वाटायला नको ...

(आज आपल्यावर नियती प्रसन्न आहे असे समजून आपण हॉटेल मध्ये १५००-२००० रुपये सहज खर्च करीत असतो , मग कधी तरी मुलांना नेऊन अशा आनंदी लोकां बरोबर जेवण करण्याचा अनुभव घेणे गरजेचे आहे … शेवटी ती नियती आहे आपल्यावर किती दिवस प्रसन्न राहील हे एक कोणीच सांगु शकत नाही ना ? )

बिपीन कुलकर्णी