Friday, September 7, 2018

पुन्हा एकदा अकबर बिरबल...

पुन्हा एकदा अकबर बिरबल...      
  ( शेवट चुकवु नका )
बादशाह दरबारात ऐटीत बसला होता , त्यांची नवरत्ने डाव्या बाजूला तर बेगम उजव्या बाजूला बसली होती. सगळे दरबारी आप आपल्या जागी मानाप्रमाणे स्थानापन्न  होते...

बादशहा ने बिरबलाच्या आसना कडे एकदा पाहिले..बिरबलाची प्रसन्न मुद्रा पाहिली आणि कसे कोण जाणे बादशहाच्या मनात अनेक विचार सुरु झाले ..खूपशा जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि मागोमाग अनेक प्रसंग आठवले ... बेगम बरोबर आंबे खाण्याचा प्रसंग, बिरबलाची खिचडी किंवा चांदणी चौकात अत्तराचे भरलेले हौद ... या सगळ्या प्रसंगात बिरबलाने बादशाह वर मात केलेली होती...ते आठवून बादशाह खजील झाला... नुसता खजील होईल तो बादशाह कसला ? या सगळ्या  प्रसंगात  बादशाह च्या विचित्र स्वभावाला बिरबलाने युक्तीने उत्तरे देऊन त्याला निरुत्तर केले होते...

बादशाहने आज मनात काही ठरविले होते ...

एकदा नावरत्नां वर नजर टाकली आणि बिरबला ला विचारले,
" बिरबला आज माझ्या मनात दोन प्रश्ने आहेत आणि त्याची उत्तरे मला हवी आहेत ... "
"खाविंद आज एकदम असे का "
"बिरबला का ते विचारू नकोस , पण मला उत्तरे हवी आहेत  "

बिरबलाला एका क्षणात परिस्थिती ची कल्पना आली ...

बादशहा ला कुर्निसात केला आणि म्हणाला " विचारा खविंद "
" बिरबला विचार कर , माझे दोनही  प्रश्न वेगवेगळ्या विषयांवरचे आहेत"
" विचारा महाराज , मी माझ्या परीने उत्तरे द्यायचा प्रयत्न करेन ... पण माझीही  एक अट असेल  ... "
"बिरबला तू कसल्या अटी घालतोस ... तरी पण मान्य बोल तुझी अट "
"महाराज माझ्या उत्तरांनी आपले समाधान झाले तर मला एक प्रश्न आपणास विचारायची सवलत मिळावी ... "
"मान्य बिरबल "
बादशाह ने पहिला प्रश्न विचारला ,
"आयुष्य म्हणजे काय ?"
बिरबलाने काही क्षण विचार केला आणि बोलायला सुरुवात केली ...

महाराज सायन्स म्हणते हृदयाचे ठोके चालू असणे म्हणजे मनुष्य जिवंत ...मनुष्य जिवंत म्हणजे आयुष्य ... हे सर्व साधारण उत्तर ... पण आयुष्य म्हणजे फक्त दोन श्वासा मधले अंतर नक्कीच नाही ... कोणी लिहून ठेवले आहे ना , मनुष्य जन्माला येतो तेंव्हा श्वास असतो पण नाव नसते ... आणि मृत्यू नंतर नाव राहते पण श्वास जातो ... त्या नियमाने नाव आणि श्वास म्हणजे आयुष्य... श्वास ठेवणे हा निसर्गाचा नियम पण नाव जिवंत ठेवणे म्हणजे आयुष्य ...
प्रत्येकाची आयुषयाची व्याख्या वेगळी ... कोणाला संपत्ती , ऐश्वर्य म्हणजे आयुष्य वाटते ...तर कोणा साठी दोन वेळचे जेवण म्हणजे आयुष्य ... दोन श्वासा मधल्या गरजां वर आयुष्य ठरत असते... गरजा काय आणि किती असाव्यात हा ज्याचा त्याचा प्रश्न ?

तुमच्या गरजा तुमचे आयुष्य ठरविते ... गरजा वाढविल्या कि आयुष्याचे गणित चुकत जाते ..
शेवटी एकच सांगतो आयुष्य म्हणजे तुम्ही साधे गणित मांडायचे ... आपण जन्माला आल्याचा आनंद केलेल्या लोकांच्या संख्येला  तुमच्या मृत्यू चे दुःख केलेल्या संख्येने भागायचं ... उत्तर एका पेक्षा जितके जास्त तितके तुमचे आयुष्य मोठे होते असे सरळ समजायचे ...
शेवटचे वाक्य ऐकून दरबारात पिन ड्रॉप म्हणतात तशी शांतता झाली ..
उत्तराने बादशहा ही  चकित झाला ...

बिरबल नम्र पणे म्हणाला " खाविंद विचारा  दुसरा प्रश्न "

बादशाह म्हणाला "राजकारण म्हणजे काय ?"

बिरबलाने परत क्षण भर विचार केला आणि बोलायला सुरुवात केली ...
राजकारण म्हणजे नेत्यांची भाषणे , सभा , मोर्चे , बेरजेचे गणित असा सर्व साधारण समज असतो ... पण ते राजकारण नव्हे... राजकारण खरे तर "यत्र तत्र सर्वत्र" असते ...अगदी लहान पणी शाळेत मॉनिटर झालेल्या विद्यार्थ्या बद्दल किंवा वर्गात पहिल्या आलेल्या मुला बद्दल इतर मुले मागे जे बोलतात ते राजकारण ...समाजाला राजकारण फार आवडते ...
स्वतः चे अस्तित्व दाखविण्या करता केलेला खटाटोप म्हणजे खरे तर राजकारण... उथळ पाण्याला नेहमी खळखळाट असतो हे विसरायला नको…आता नवं नवीन शब्द प्रयोग येतात " गुड  पॉलीटिक्स  अँड बॅड पॉलिटिक्स " पण असे काही नसते महाराज... महाराष्ट्राच्या एका नेत्याने सांगून ठेवले होते ...राजकारण म्हणजे गजकर्ण ?
राजकारण म्हणजे सत्येच्या सारीपाटावरची प्यादी ... सत्ता म्हणजे इथे शासन नव्हे ...घरात , बाहेर, नोकरीच्या ठिकाणी किंवा शासनात प्रत्येक ठिकाणी अस्तित्वाची धडपड ...
म्हणतात ना In politics nothing happened by an accident, it is planned that way " खरे तर हे planning  म्हणजे राजकारण ...
शेवटी एकच सांगतो जिथे मी पण आले तिथे राजकारण आले  ....
एवढे बोलून बिरबल थांबला ... आणि बादशहा ला कुर्निसात केला ...
बादशहा समाधानाने मंदसा हसला... आज परत निरुत्तर झाला होता ... पण आज हरण्या मध्ये पण जिंकल्याचे समाधान होते ...

बादशाह म्हणाला " वाह खूब बिरबल ... आमचे समाधान झाले ... आता विचार तु तुझा प्रश्न ?
बिरबला ने बादशहा कडे पाहून स्मित केले , वाकून कुर्निसात केला आणि विचारले ....
"गेली  अनेक वर्षे तुम्ही मला निरनिराळे प्रश्न विचारून भंडावून सोडता , परत परत तेच प्रश्न विचारता ... माझ्या उत्तरावर समाधानी होता पण आचरणात काहीच आणत नाही ,प्रत्येक गोष्टी वर आपले मत देत असता ... विषयाचा अभ्यास नसताना विचारायचे म्हणून प्रश्न विचारता ...  म्हणून मला विचारावेसे वाटते आपल्या मातोश्री चे माहेर इटलीचे आहे का ?

- बिपीन कुलकर्णी

No comments:

Post a Comment