२१ सप्टेंबर
२०१६
तू चाळीशीची झालीस .....
प्रिय पिंकी,
आज तुझा चाळिसावा
वाढदिवस , म्हणता म्हणता चाळीशीची झालीस ... सर्व प्रथम तुला वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा ...
काय कोण जाणे
असे वाटले या वर्षी तुला पत्र लिहावे , त्याचे मुख्य कारण , आज एवढ्या वर्षात तुला उद्देशून असे कोणी पत्र लिहिले नाही आणि मी
पण असे पत्र तुला कधीच लिहिले नव्हते … आमच्या
करिता मोबाईल, मेल चा जमाना ... हो आमच्या
करिताच ... तु मात्र चाळीसाव्या वर्षा ला पोहोचलीस पण अजूनही तशीच लहान निष्पाप आहेस
...
मनातील भावनाना
वाट मोकळी करून देण्या
करिता पत्रा सारखे माध्यम नाही , ई-मेल किंवा मोबाईल मधून भावनेचा ओलावा पोहोचूच शकत
नाही, म्हणून हा पत्र प्रपंच !! माझे पत्र
तुला नक्कीच कोणीतरी वाचून दाखवेल आणि मला माहिती आहे मला जे सांगायचे आहे ते तुझ्या पर्यंत पोहोचेल .
जगाच्या दृष्टीने
तु " स्पेशल चाईल्ड " पण माझ्या करिता कायम लहान बहीणच असणार
आहेस ....
तुम्हाला
स्पेशल म्हणणे योग्य आहे का ?, स्पेशल म्हणण्याची
खरेच गरज आहे का ? याचे उत्तर प्रत्येकाचे स्वतंत्र असू शकते ….म्हंटले तर हो म्हंटले
तर नाही , मला विचारशील तर त्याची गरज नाही , कारण स्पेशल म्हणून तुम्हाला आम्ही मुख्य
प्रवाहा पासून वेगळे करतो ना . स्पेशल किंवा नॉन स्पेशल पेक्षा एक माणूस म्हणून एक
दुसऱ्या कडे पाहण्याची आज खरी गरज आहे ,
मला एक सांग
“स्पेशल” नाव दिल्याने खरेच कधी स्पेशल वाटले का ग तुला.... असो… तुला पत्र लिहायचे
ठरविले तेंव्हा असे अनेक विचार मनात यायला लागले, आणि कुठून आणि कसे सुरु करावे हेच
कळेनासे झाले ...
प्रत्येक
स्री पुरुषाच्या आयुष्यात पहिल्या मुलाचा जन्म हा सर्वात आनंदाचा क्षण असतो , पण कधी
कधी आनंद आणि आव्हाने एकत्र येतात , “आई-आबा” सारखे असंख्य आई वडील आहेत ज्यांनी हि
आव्हाने लीलया पेलली आहेत... स्पेशल मुलां करिता स्पेशल आई वडील नसतात तर नियती आई
वडिलांना स्पेशल करीत असते ... त्या मुळे आज तुझ्या शुभेच्छांच्या बरोबरीने आई आबा च्या ध्येया शक्तीला दंडवत !!!
तुझ्या जन्मा
नंतर तसा मी फार मोठा नव्हतो , त्या मुळे आई आबा तुला वाढवत असताना होणाऱ्या त्यांच्या
मनस्थिती ची मला जाणीव नव्हती , पण
आज जेंव्हा मी स्वतः वडील झालो तेंव्हा मुलांना वाढवत असताना कळते , किती वेगवेगळ्या परिस्थितीतून ते गेले असतील.
Hats off to them !!!
असे म्हणतात
सामान्य मनुष्याचे वय आणि बुद्धी बरोबरीने वाढत जाते , आम्हा लोकांचे वय आणि बुद्धी दोनही वाढत गेले ग ... पण तुला कल्पना येणार नाही, त्याच्या बरोबरीने अनेक समस्या वाढत गेल्या , करिअर च्या मागे लागून आयुष्य घडाळ्याच्या काट्यावर
नेले , संसाराचे खाच खळगे अनुभवताना कधी पैसे कमावण्याचा ताण तर कधी ऑफिस किंवा नात्यातील
हेवे दावे या मध्ये आयुष्य खर्च होत गेले ... काय चूक आणि काय बरोबर याचा विचार आम्ही
प्रत्येक वेळेस करतोच असे नाही.
आता हेच बघ
ना अध्यात्म सांगते, ईश्वराने मनुष्याला आनंदी, शांत आणि प्रेमळ हे स्वभाव विशेष जन्मतः दिले आहेत... आज आहोत का आम्ही शांत ?आहोत खरेच आम्ही आनंदी ?... प्रत्येक
क्षणाला आजूबाजूच्या घडणाऱ्या छोट्या मोठ्या घटने मुळे स्वभावात होणारे चढ उतार ... व्यक्ती सापेक्ष वागणारी आम्ही माणसे
… या सगळ्या मुळे किती
जण राहू शकतात खरेच आनंदी आणि शांत ?
स्पेशल म्हणजे
नक्की काय ग? जे प्रमाणा नुसार नाही किंवा सामान्य नाही तेच स्पेशल ना ? आता तूच सांग
प्रमाणा नुसार आम्ही आहोत का तू ? आम्ही असतो तर आमचे आयुष्य शांत आणि आनंदी नसते का
झाले? प्रमाणाच्या सिद्धान्ता नुसार मग स्पेशल कोणाला म्हणायचे तुला का आम्हाला ?
प्रत्येक
गोष्टीत स्वार्थ पाहणारे किंवा दुसऱ्यांवर
अपेक्षांचे ओझे टाकणारे आम्ही आणि दुसऱ्या बाजूला प्रत्येक छोटी मोठी गोष्ट
निरपेक्ष करणारी तू ? कोण आहे खरेच स्पेशल ?
अगं साधी
गोष्ट आम्ही लोक देवाला नमस्कार करीत असताना नकळत देवा कडून पण अपेक्षा करीत असतो .... जिथे आमच्या अपेक्षेतून
देव सुटत नाही तिथे इतरांचे काय बोलणार ? दुसरी कडे निरपेक्ष पणे इमाने इतबारे देवाला
नमस्कार करणारी तू ... काय
मागतेस ग देवाला ?
मला विचारशील
तर खरे आम्हीच आहोत स्पेशल चाईल्ड!!! नॉर्मल तर तू आहेस ... जाऊ दे...
वाढ दिवस
म्हणजे कौतुकाचा दिवस , ३६५ दिवसा पैकी असा एक दिवस कि ज्या दिवशी लहाना पासून मोठ्यानं
पर्यंत प्रत्येक जण कळत किंवा नकळत कौतुकाची
अपेक्षा करीत असतो आणि त्याला तू खरेच अपवाद आहेस .... अपेक्षा न करिता मिळालेल्या शुभेच्छा
चे महत्व काय असते याचा मला तरी अनुभव नाही ... तू तर हा अनुभव नेहमीच घेतेस .... या
वर्षी तर तू अमेरिकेत आहेस ... मस्त केक कापून वाढदिवस साजरा कर...
पिंकी बेटा तू तर अर्धे जग पाहिलेस ग , अमेरिका असेल किंवा यूरोप म्हण , सिंगापुर , मलेशिया, थायलंड एक ना अनेक देश फिरलीस ... भारत पूर्ण पाहून झाला .... हे असे प्रत्येक मुलाच्या नशिबात
नसते ना ... मग का म्हणू मी तुल स्पेशल चाईल्ड
?
तुला माहिती
का पिंकी, २१ सप्टेंबर ला करीना कपूर चा पण वाढदिवस असतो , तुझ्या पेक्षा कदाचित ३-
४ वर्षांनी लहान असेल. पण तुला सांगतो आपला
आणि कोण्या सेलेब्रिटी चा वाढ दिवस एका दिवशी हि कल्पनाच वेगळी असते ग ... मला विचारशील
तर करीना खरेच भाग्यवान आहे कारण तुझ्या वाढदिवसाच्या
दिवशी ती जन्माला आली...
चाळीशी म्हंटले
कि सामान्य माणसाच्या काळजात धस्स होते कारण
त्या नंतर येणारे आजार, लागणारा चष्मा , वय वाढल्याची जाणीव या मुळे आयुष्या
कडे पाहणायचा दृष्टिकोन बदलू शकतो , पण खरे सांगतो असे काही नसते, सकारात्मक दृष्टिकोन
या सगळया चिंता पासून लांब ठेवतो , तू तर अजून खूप लहान आहेस.... आणि या सगळ्या पासून
खूप दूर आहेस... त्या मुळे जास्त विचार करायचा नाही... जशी आहेस तशीच रहा…
जेंव्हा तुझ्या
सारख्या मुलांचा विचार करतो आणि मग आठवते …अबुली
मामाजी नावाच्या तुझ्या सारख्या एका स्पेशल चाईल्डने पूर्वीच बॉलीवूड मध्ये पदार्पण
केले आहे , गौरी गाडगीळ ने इतिहास घडवलाच आहे...
पुण्यात ऋचा चितळे नावाची ११ वर्षाची मुलगी , भरत नाट्यम च्या परीक्षे मध्ये यश मिळवतेय...
आदित्य सुब्रमण्यम म्हणून मुंबईचा मुलगा हॉटेल रामदा प्लाझा या पंचतारांकित हॉटेल मध्ये
नोकरी करतो , आणि त्या हॉटेल ची मॅनेजमेंट सांगते " Children with Down’s
Syndrome make great employees. They do not need any distractions like tea
break, or smoke break. They work continuously,”
.या पेक्षा
मोठे कौतुक काय हवे ? अशी एक ना अनेक उदाहरणे .... मग प्रश्न पडतो स्पेशल तु का मी ?
तुला सांगतो
पुण्यात आदित्य तिवारी नावाच्या एका सॉफ्टवेअर इंजिनीर ने डाउन सिन्ड्रोम चाईल्ड दत्तक घेऊन इतिहास घडविला
, त्यात पुन्हा तो सिंगल पॅरेण्ट .... खरेच
जग बदलत आहेत , चांगली सुरुवात आहे...
एक संस्कृत
सुभाषित आहे,
आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् ।
सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति ॥
सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति ॥
याचा अर्थ
आकाशातून पडणारे पाणी समुद्राला जाऊन मिळते, किंवा एका देवाला केलेला नमस्कार सर्व
देवां पर्यंत पोहोचतो , त्या प्रमाणे हे तुला लिहिलेलं पत्र ,तुझ्या सारख्या सर्व निष्पाप
मुलां पर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा करतो….
व पु म्हणतात
तसे आयुष्यात बालपणच फक्त सुखाचे असते कारण ते अहंकार आणि अपेक्षां पासून खूप लांब
असते, ... अशीच निष्पाप आनंदी आणि भाबडी राहा....
तुला उदंड
आणि निरोगी आयुष्य मिळो हीच आज ईश्वर चरणी प्रार्थना !!
तुझाच
दादा
(बिपीन कुलकर्णी
)
*_Atishya sundr Patra wachatana dolyat Pani ale_*
ReplyDelete*_Atishya sundr Patra wachatana dolyat Pani ale_*
ReplyDeleteToo good. Atishay sundar patra.
ReplyDeleteDada kharach surekh lihila ahes. Aba mhanala tasa dolyat pani ala...
ReplyDeleteDada kharach surekh lihila ahes. Aba mhanala tasa dolyat pani ala...
ReplyDeleteDada khup touching ani mana pasun lihila ahes .. tasach as always references ani exmples too good.
ReplyDeleteबिपिन, नेहेमी प्रमणे उत्तम लिखाण. प्रत्येक लेखाचा विषय वेगळा, आणि मनाला भीड़णारा.
ReplyDelete