Thursday, September 29, 2016

सूर्यास्त

२९ सप्टेंबर २०१६

सूर्यास्त

आज पुन्हा एकदा  मृत्युलेख लिहिण्याची वेळ माझ्यावर आली...गेल्या दीड  वर्षात तिसरा मृत्यू लेख  !!
 प्रा. पुरुषोत्तम राव कुलकर्णी यांचे २५ सप्टेंबर ला हैदराबाद ला निधन झाले , निधन हे नेहमीच दुःखद असते त्या मुळे " दुःखद निधन " या शब्दाच्या जोडाची गरज नसते. नात्याने माझे सासरे , बागेश्री चे वडील !

त्या बहीण भावंडावरील पितृछत्र हरपले, आपण वयानी किती जरी मोठे झालो तरी आई आणि वडिलांच्या प्रेमाची सर कशालाच येऊ शकत नाही

मृत्यू लेख वाचणे जवळच्या लोकां करिता अतिशय त्रासदायक असते, कारण  ते  जखमे वरची खपली काढण्या सारखे असते ....  हे  लेख गेलेल्या व्यक्ती च्या प्रति  कृतज्ञग्नता व्यक्त करण्या करिता लिहिले जातात, पण खरे सांगायचे तर मी माझ्या समाधान करिता लिहीत आहे... कारण कृतग्नता व्यक्त करून त्याच्या ऋणातून मुक्त न होता मला आजन्म त्यांच्या ऋणात राहायचे आहे.   

जवळची  व्यक्ती फक्त फोटो पुरता उरणे  किंवा काल पर्यंत "श्री" लिहिलेल्या व्यक्ती ला आज "स्व" अथवा  "कै" संबोधणे म्हणजे काय ? त्याचे दुःख फक्त जवळच्या व्यक्तीच समजू शकतात...

या कुटुंबियांचे दुःख एवढे मोठे आहे ... कुठल्याही शब्दात त्याचे सांत्वन होऊ शकत नाही ... व पु म्हणाले तसे सांत्वन हि दुःखाची आई आहे ... मुलं हे आई पेक्षा मोठे होऊ शकत नाही तसेच सांत्वन दुःख हलके करू शकत नाही ....    

कुलकर्णी कुटुंब बिनोलीचे म्हणून बीनोलीकर कुलकर्णी , पूर्ण हयात आंध्र प्रदेशात गेली , लहान पण शिक्षण , नोकरी सगळेच... त्यांचा जन्म बसोले  कुटुंबात झाला , काही कारणा मुळे लहानपणीच  कुलकर्ण्यांकडे दत्तक गेले.
वडील आयुर्वेदिक डॉक्टर , निझाम संस्थानात चांगले नाव कमावलेले , मुलांनी पण डॉक्टर व्हावे हि इचछा ,पण नियती च्या मनात नसावे ... पितृ छत्र लवकर हरपले !! त्या मुळे व्यावहारिक जाबदाऱ्या लहान वयात डोकयावर आल्या आणि स्वप्न हवेत विरले...

शिक्षण पूर्ण करून नोकरी करणे एक मेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून , शिक्षकी पेशा स्वीकारला...   निझामाबाद सारख्या थोड्या आडवळणाच्या ठिकाणी स्थायिक झाले... मध्यम वर्गीय राहणी, आचार आणि  विचार सगळ्यात माध्यम वर्गीय झाक... 

समाज नियमा प्रमाणे लवकरच दोनाचे चार हात झाले , समंजस जोडीदार मिळाला ...

सुखी संसाराचा  असा मंत्र नसतो ! खरे तर तो  ज्याचा त्यानेच शोधून काढायाचा असतो .समजूतदार पणा आणि समतोल राखायची वृत्ती असेल तर संसार सुखीच होतो, त्या प्रमाणे यांचा संसार खरेच सुखी आणि समाधानी झाला...
याचा अर्थ आयुष्य साधे सरळ नव्हते , आर्थिक , प्रापंचिक अडचणी या तर मध्यम वर्गीयाच्या पाचवीला पुजलेल्या
आयुष्याच्या मार्गावर खाच खळगे येणारच पण त्या परिस्थितीतून मार्ग काढणे  हे महत्वाचे ...

कुमार गंधर्वां नि गाऊन ठेवले आहे तसेच आयुष्य होते या दोघांचे ,

कधि जवळ सुखाने बसलो
दुःखात सुखाला हसलो
कधि गहिवरलो, कधि धुसफुसलो

येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला धीरा ने तोंड देत दिवसा वर दिवस  जात होते  ....निझामाबाद ला ज्या घरात भाडेकरी म्हणून राहत होते तेच घर विकत घेतले , शेती वाडी जमीन सगळे झाले…… काळ धावत होता

मुला मुलींची लग्ने केली ...  प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पाडत होते…
निवृत्ती नंतर नांदेड ला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला... तिथे हौसेने घर बांधले ... ४ खोल्याचे टुमदार घर ...समोर बगीचा... नंतर वय वाढले तसे हैदराबाद ला मुला आणि सुने बरोबर राहू लागले...

साधारण उंची ,बारीक अंग काठी , मागे वाळविलेले केस  ह्या रूपात फारसा कधी फरक पडला नाही  शेवटच्या दिवसात चालताना काठीचा आधार घ्यावा लागत होता. ... तेव्हढाच काय तो फरक

राहणी  अत्यंत साधी ... कायम Full Sleeves चा शर्ट आणि डार्क रंगाची पॅन्ट हे  बाहेर जातानाचे कपडे , घरात असताना पांढरे स्वछ बाह्यांचे बनियान आणि पांढरे धोतर ... मला आठवते तसे कायम हेच कपडे....

खाण्यात विशेष अशा काही आवडी नव्हत्या ... अन्न हे पूर्ण ब्रम्ह म्हणत पानात असेल ते खाणे पण  गोड पदार्थ विशेष आवडत...

मराठी , हिंदी, इंग्रजी , उर्दू , तेलगू या भाषांवर प्रभुत्व .... वाचनाची .... अध्यात्माची आवड आणि परिपूर्ण माहिती ...

साधारणतः  मनुष्य दोन प्रकारचे असतात ... एक भविष्यात वावरणारे किंवा भूतकाळात रमणारे ... सर्व साधारण माणूस वर्तमानात रहात नसतो .... ती कला असते फक्त माहात्म्यांकडे अथवा योगी पुरुषांकडे !
तर यांचा स्वभाव भूतकाळात रमणारा ... नातवंडांना किंवा प्रत्येकाला जुन्या आठवणी सांगणे , जुन्या आठवणी लिहून काढणे , जुने फोटो जमा करणे , जुन्या गाण्यांचा संग्रह करणे ... अशा एक ना अनेक आवडी ... 

दिवसा वर  दिवस जात होते ...  मुली -जावई , मुलगा - सून यांच्या संसाराला जमेल तसा हातभार लावत  ... चार चौंघां सारखे सुखी समाधानी आयुष्य जगणे चालू होते  ... 

आयुष्यात प्रत्येकाच्या काही श्रद्धा असतात , श्रद्धा म्हणजे जिथे माणूस नतमस्तक होतो किंवा प्रत्येक न सुटलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्या करिता विश्वासाने जातो , मग ते ईश्वराचे कुठलेही रूप असेल अथवा योगी असेल किंवा कोणी महापुरुष असेल ... यांचे श्रद्धेचे स्थान अवतार मेहेर बाबा ... पराकोटीची श्रद्धा ... त्यांच्या श्रद्धेने प्रत्येक कठीण प्रसंगात तारून नेले... 

वय वाढण्या बरोबर प्रकृतीच्या कुरुबुरी चालू झाल्या....  जन्म मरणाचा फेरा हा कोणाला चुकलाय ? त्याच नियमाने त्यांनी शेवटचा श्वास घेतला....   

मला "बिपीन राव म्हणणारे २ जण , एक माझे सासरे कायम तोंड भरून म्हणत होते  आणि दुसरा माझा काका मूड मध्ये असताना नेहमी बिपीनराव म्हणून हाक मारायचा ...  नियती ने एका पाठोपाठ दोघांना हिरावून घेतले ...  कालाय तस्मै नमः!!! दुसरे काय ?

वडील धाऱ्याचे जाणे हा त्या घरा वरचा सूर्यास्त च असतो , ह्या कातर वेळेला धीराने तोंड देण्याचे बळ मिळो आणि आत्म्याला  सदगती मिळो  , हीच ईश्वराला प्रार्थना !!


बिपीन  कुलकर्णी

1 comment:

  1. लेख वाचुन परत बाबांचा चेहरा डोल्यासामोर आला. He may have lived his full life, but death creates a void in the life of people left behind - particularly so for the life-partner.

    ReplyDelete