अभिष्टचिंतन - "जिंदादिल " तात्या अभ्यंकर !!
२ जानेवारी २०१६
पु लं च्या नाथा कामत चे " बाबा रे " या शब्दावर जितके प्रेम तितकेच तात्याचे " बाजवला… " या शब्दावर !
या शब्दाचे संदर्भ स्थळ, काळ आणि वेळे प्रमाणे बदलणारे !!
ज्याची आराध्य दैवते पंचमदा , किशोर, भीमण्णा , बाबूजी तो तात्या …
पु ल , भीमण्णा , बाबूजी सारख्या एक ना अनेक दैवतांचा नुसता सहवास नाही तर ज्याच्या पाठीवरून त्यांनी हात फिरविला तो तात्या !
मधुबाले चा निस्सीम भक्त, तिच्या आठवणी गोळा करण्या करिता साक्षात वहिदा रेहमान ना किंवा मधुबालेच्या परिचितांना भेटणारा ,
तिच्या आठवणीत हळवा होणारा ! मधुबालेच्या थडग्या वर आसवे गाळणारा तात्या !
प्राण साहेबांच्या घरी जाऊन " काजू कतली " खाऊन येणारा तात्या !
किशोर कुमारांची भेट घेण्या करिता , त्यांच्या घरी १-२-३ फेर्या मारणारा तात्या !
सुधीर फडक्यांच्या पत्नी ललिता बाई , म्हणजेच ललिता मावशींचा सहवास आणि प्रेम मिळालेला तात्या !
एका लग्न कार्यात साक्षात उषा किरण च्या हातावर पेढा ठेवण्याचे भाग्य मिळालेला तात्या !
व पु म्हणतात तसे , पाऊस अनेक ठिकाणी पडत असला तरी प्रत्येकाचे भिजणे वेगळे ! याच भाषेत सांगायचे तर तात्याचे पावसात भिजणे म्हणजे वेगळे !
कोण आहे हा तात्या ?
तात्या म्हणजे माझा एक फेसबुक वरील मित्र !
आमच्या लहान पणी पेन फ्रेन्डशिप असा काहीतरी प्रकार होता , त्या वयात आम्ही कधी त्यात पडलो नाही … पण आता सोशल मेडिया च्या जगात , फेसबुक व्हाटस अप्प मुळे अनेक लोकांशी ओळखी झाल्या…. त्या पैकीच मैत्री झालेली एक वल्ली म्हणजे तात्या !
चंद्रशेखर रामचंद्रराव अभ्यंकर उर्फ तात्या !
ठाण्याच्या मध्यम वर्गीय संस्कारात वाढलेला एक अस्सल चित्पावन ! जन्माने जरी ब्राम्हण असला तरी वृत्तीने त्याच्याच शब्दात " बहुसमाज वादी "
मातृभक्त तात्या , व्यवसायाने LIC Agent … त्याचे client म्हणजे तुमच्या आमच्या सारख्या पांढरपेशी लोका पासून थेट फोरास रोड च्या मुली / बायका पर्यंत ! नोकरीचीच्या सुरुवातीच्या काळात कामा निमित्त फोरास रोड वर जाणे येणे होते त्यामुळे फोरास रोड समजत गेला … आणि त्यातून उलगडत गेली एके एके व्यक्तीचित्र … तिथल्या बायकांना LIC चे महत्व पटवून देताना विश्वास संपादन केला आणि केव्हा तात्या सेठ झाला हे त्याला पण कळले नाही … so called
intellectual किंवा समाजसेवक अशी बिरुदे लावायची गरज
कधीच पडली नाही…
शास्त्रीय संगीताची बैठक , वाचनाची आवड, मनाला भिडेल असे लिहिणारा, बल्लवाचार्य , राजकारणा चा अभ्यास , जातीचा खवैय्या, अध्यात्माची आवड … असे एक ना अनेक गुण एका ठिकाणी सामवलेला Versatile तात्या !!
आजूबाजूला घडलेल्या घटनांनी कधी उद्विघ्न होणारा , कधी हळवा होणारा तर कधी पोटतिडकीने लिहिणारा तात्या !
शिवसेना रक्तात भिनलेली … मनापसून शिवसेनेवर प्रेम करणारा तात्या !
लिखाणात सोनिया मावशी आणि मामा साहेब उल्लेख करून राजीकीय विरोधी पक्षांचे वेळेप्रसंगी कौतुक करणारा जिंदादिल तात्या …
अटलजी ना भारत रत्न मिळाल्या नंतर , घरी शिरा बनवून स्वतः चे तोंड गोड करून घेणारा तात्या …
अशी एक ना अनेक रूपे …
तात्या तुझा आज वाढदिवस , देव तुला उदंड आणि निरोगी आयुष्य देवो , हीच प्रार्थना !!
…। स्वतः मध्ये दडलेल्या निरागस बालकाला असेच जप ….
- बिपीन कुलकर्णी
अप्रतिम लेख आणि एकमेवाद्वितीय तात्या...
ReplyDelete