ते दोघे !! 19th
June 2015
एक आटपाट नगर होते , तिथे एक ब्राम्हण राहात होता , ब्राम्हण म्हणजे
गरीब हे ओघाने आलेच.
ब्राम्हणाला ३ मुले आणि एक मुलगी, गरिबीत संसाराचा गाडा ओढताना आर्थिक
परिस्थिती ने पूर्ण पिचून गेलेला , स्वतः ची अर्धवट स्वप्ने मुलात पाहणारे बापाचे काळीज
.
काळ पुढे जात होता , मुले मोठी होत होती … मोठा मुलगा थोडासा व्रात्य
, आई आणि आजोबांचा थोडा जास्तच जीव त्याच्यावर… लाडाकोडात वाढविले तर म्हणता येणार नाही , लाड
हे श्रीमंतांचे चोचले !
वडिलांचा प्रचंड धाक….
पण कधी आजोबांच्या आडून किंवा आईच्या मागे लपून खोड्या चालूच ….थोडा
व्रात्य असल्या मुळे " लोका संगी ब्रम्ह ज्ञान " या उक्ती प्रमाणे नातेवाईक
किंवा आजूबाजूचे लोक घालून पाडून बोलायचे , आई वडिलांच्या कानावर ह्याचे
उपद्व्याप
आले कि … वडील संतापायचे , मारायचे … आई ढसा ढसा रडायची ….
दिवसावर दिवस जात होते …. शाळा संपून कॉलेज ला प्रवेश झाला … कुठल्याही
नव तरुणा करिता कॉलेज च्या म्हणजे मंतरलेल्या आठवणी , पण इथे अठरा विश्व दारिद्र्य,
वडिलांचे कपडे आल्टर करून आणि पायात स्लीपर
घालण्या मुळे
आजूबाजूच्या मित्रात थोडा गोंधळलेला किंवा दबून असलेला.
अशी परिस्थिती मनुष्याला एक तर अगतिक बनविते किंवा प्रचंड स्वाभिमानी
… ह्याच्या बाबतीत दुसरी गोष्ट घडली … स्वभावात एक प्रकाराची धार आली … स्वाभिमानी
तर झालाच त्या शिवाय अन्याया विरुद्ध पेटून
उठणे , तत्वाला मुरड न घालणे असे वेग वेगळे पैलू स्वभावाचे होत गेले….
त्याच वेळेस माजलगाव सारख्या आडवळणाच्या ठिकाणी एक ब्राम्हण पती
पत्नी आपल्या ३ मुले आणि २ मुलीना घेवून रहात होते …. सगळे व्यवस्थित चालू होते सरकारी
नोकरी , संसार चालू असताना नियती ची मर्जी फिरली आणि कुटुंब प्रमुख देवाघरी गेला… क्षणात होत्याचे
नव्हते झाले… मुले आणि
आई उघड्यावर पडली… समाजाचे टप्पे टोणपे खात आई नि वाढविले (तो एक स्वतंत्र विषय )
पण हि कथा आहे बापा विना वाढलेल्या मुलीची ची … म्हणजे "तीची "
परिस्थिती शी झगडत आई तिला आणि भावंडाना पुण्यात घेवून आली , आई
ने एक खोली घेतली आणि चरितार्थ चालविण्या करिता खानावळीत पोळ्या लाटू लागली…
तिला आणि बहिणीला ठेवले
" अनाथ हिंदू महिला आश्रम नारायण पेठ - पुणे "
त्या वेळेस हिचे वय असेल ५-७ वर्षाचे , ते वय खरे तर मुलींचे सागरगोटे , लंगडी असे नीर निराळे खेळ खेळण्याचे,
पण ती बिचारी शाळा , अभ्यास , कपडे धुणे , खोली साफ करणे , शिवाय आश्रमातील इतर कामे
जशी कि धि स्वयपाक , कधी साफ सफाई यातच अडकलेली … मुलांच्या तथाकथित विश्वा पासून खूप लांब ….
तिच्या वयाच्या वर्गातील
बाकी मुली कधी अरण्येश्वर , पर्वती
अशा ठिकाणी सहलीला जात तेंव्हा हि हिरमसून बसे …. अनाथ मुलां करिता कामातून
मिळालेली सवड हीच सहल असते हे समजायचे वय नव्हते तिचे ….
आई ज्या खानावळीत पोळ्या लाटत होती तिथे तिला खूप चांगले लोक भेटले पेठे असतील किंवा टिळक त्यांनी या भावंडांवर खूप
माया केली…
भावे स्कूल मध्ये शिक्षण चालू होते … अभ्यासात हुशार … भाषा विषय
विशेष आवडीचे , संस्कृत सुभाषित किंवा मराठी कविता मुखोद्गत….
शाळा संपून तारुण्यात पदार्पण केले आणि कॉलेज विश्वात प्रवेश केला
, हे होत असताना आई ने पुणे सोडून औरंगाबाद ला स्थाईक होण्याचा निर्णय घेतला…
नवीन गाव नवीन विश्व !!! औरंगाबाद ला शासकीय कला महाविद्यालयात कला
शाखेत तिने प्रवेश घेतला…
लांब सडक केस , कॉटन च्या साड्या ची आवड , सायकल वर रोज घर ते कॉलेज
असा तिचा प्रवास सुरु झाला …
तो -
त्याचे कॉलेज शिक्षण चालू होते , Science ची आवड म्हणून औरंगाबाद
मधील त्या काळातील प्रतिष्ठित मिलिंद महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला , रोज घरा
पासून कॉलेज पर्यंत चालत पाई प्रवास चालू होता.… जाऊन येउन रोजचे ८-१० किलोमीटर अंतर…
वर्गात श्रीमंत गरीब असा मिश्र भरणा होता , श्रीमंत मुलांच्या मागे
असलेल्या कौटुंबिक वलया मुळे नकळत शिक्षक पण गरीब मुलांना दुय्यम वागणूक देवून अन्याय
करीत होते… त्याला कळत होते … पण शेवटी गरिबाला
नापसंतीच्या मताची चंगळ परवडणारी नसते.….
मनात नकारात्मक विचार न येऊ देता त्यानी कॉलेज शिक्षण पूर्ण केले
… घराण्यात पहिला पदवीधर झाला … आई आणि वडील
धन्य झाले !
आपसूक इतर नातेवाईक शेजार पाजार्यांची तोंडे गप्प झाली ….
ती -
शासकीय महाविद्या लयात तिचे शिक्षण चालू होते संस्कृत , मराठी या विषयात पदवीधर झाली , आई ने
गरिबीत पोळ्या लाटून वाढवलेल्या कष्टाचे चीज झाले.
तिला ईश्वराने वडील फक्त "फोटो " पुरता दिले …. पण धीराची
आई आणि वडिला समान मोठा भाऊ दिला … तिनेही त्यांना कधी खाली बघायची वेळ येऊ दिली नाही…
शिक्षण झाले पुढे काय ?
तो -
पदवीधर झाला पुढे काय ? इतर मित्र post graduation च्या तयारीला
लागले , याची पण लहान पणा पासून शिकून प्राध्यापक होण्याची इच्छा होती , पण post
graduation होणार कसे ? वर्ष तर सुरु झालेले , Fees भरायला पैसे नाहीत ??
कुठलेही पाहिलेले स्वप्न सत्यात येण्या करिता जर इच्छा शक्ती दांडगी
असेल तर त्या वर मार्ग निघतोच …. हा अनुभव त्यांनी पदोपदी घेतला !
डॉ नरवणे त्यांचे गुरु , त्यांना ह्याच्या हुशारीची आणि गरिबीची
जाणीव होती , त्यांनी स्वतः पदरमोड करून याची फी भरून M Sc ला प्रवेश मिळवून दिला…
दिवसावर दिवस जात होते , जसा पदवीधर झाला तसेच पदव्युत्तर शिक्षण
पण झाले …
पुढे काय ?
ती -
पदवीधर तर झाली पुढे काय ?
आई आणि भावाच्या होत असलेल्या ओढाताणीची तिला जाणीव होती , तिने
निर्णय घेतला नोकरी करण्याचा …. तिची पण इच्छा शक्ती दांडगी , लगेच सरकारी नोकरी लागली…
घरातील सगळी कामे करून सायकल वर औरंगाबाद मधील सरकारी रूग्णालयात
प्रशासन विभागात नोकरी सुरु झाली… घर खर्चा ला हात भार लागू लागला….
तो -
Post graduation तर झाले , आता प्राध्यापक होण्याची स्वप्ने पाहू
लागला , श्रीमंत आणि वलयांकित मुलांना औरगाबाद मधील स्थानिक कोलेज किंवा विद्यापीठात
नोकर्या लागल्या… हा वण वण फिरत होता … उमरगा , देगलूर अशा लांब लांब ठिकाणी जाण्या
शिवाय पर्याय नव्हता.
आड वळणाच्या ठिकाणी राहायचे , खानावळीत जेवण करायचे आणि पैसे वाचवून
वडिलांना मनी ऑर्डर करायची .
तशात आई ने सून आणायचे मनावर घेतले ….
ती -
तिची नोकरी चालू होती , आई ने आता मुलीच्या लग्नाचे मनावर घेतले
, ओळखी पालखीतील लोकांना सांगून ठेवले …. मुलगी शिकली सवरली आता दोनाचे चार हात होणे
हे महत्वाचे होते
भावाच्या ओळखीतील एक देव माणूस श्री गोलटगावकर त्यांनी तिच्या लग्नाचे मनावर घेतले …. त्यांच्या
पाहण्यात एक गरीब कुटुंब, मुलगा प्राध्यापक…
त्यांनी तिच्या करिता त्याचे स्थळ सुचविले …
नियतीच्या मनात असावे कि तो आणि ती मिळून "ते " व्हावेत
…. आणि झालेही तसेच , यथासांग लग्न पार पडले…
सोलापूर ला नोकरी , प्रतिष्ठित कॉलेज मध्ये प्राध्यापकी … कॉलेज
जवळ घर … पहिल्या मुलीची चाहूल लागली … अनु चा जन्म झाला , पाठोपाठ दुसरा मुलगा बिपीन
दिवसावर दिवस सरत होते आणि
त्यांच्या आई चे दुर्दैवी आणि अकाली निधन झाले, कुटुंबावर दुःखाची कुऱ्हाड कोसळली
…. त्यांचा जगावरचा आणि साक्षात ईश्वरावरचा
विश्वास उडाला … नास्तिक झाले.
ती मात्र पूर्ण आस्तिक श्रद्धाळू … शेगाव गजानन महाराजांवर तिची
श्रद्धा… पुढील आयुष्यात
या श्रध्येनीच तिला आणि कुटुंबाला तारून नेले.
५ वर्षा नंतर तिसर्या मुलाचा गोपीचा जन्म झाला …. बोलून चालून शेंडेफळ
त्यांची नोकरी हिचा संसार , मुलांच्या शाळा , अभ्यास स्वयपाक पाणी
सण वार , औरंगाबाद ला जाणे येणे सगळे चालू होते …. पण हे सगळे सुरळीत चालावे हे त्या विधात्याच्या
मनात नव्हते …
यांचा स्वभाव अन्याय सहन न करणारा त्या मुळे काही घटना घडल्या आणि
कॉलेज मधील अंतर्गत राजकारणात यांचा बळी गेला, नोकरी गेली … ती पूर्ण कोलमडली … मुलगी
नुकतीच कॉलेज ला जाऊ लागलेली , दोनही मुले शाळेत …।
पण ते वर वर तरी शांत होते …. आतून भविष्यातील अंधाराची गडद भीती
जाणवत होती , त्यांनी मनाशी निर्णय घेतला या अन्याया ला कोर्टात दाद मागायची ….
आणि त्यांचा सुरु झाला झगडा Tribunal , High Court , Session
Court असा प्रवास
आणि तिचे सुरु झाले उपास तापास , पारायण , नीर निराळ्या मंदिरात
प्रदक्षिणा … कधी पांढरे बुधवार , कधी अवचित गुरुवार , खडीसाखरेचे मंगळवार …. एक ना
अनेक …
शेवटी तिची श्रद्धा आणि त्यांची तत्वे यांचा विजय झाला ….
पण साडेपाच वर्षे अक्खे कुटुंब त्यात भरडले गेले …. या परिस्थितीत
त्यांचे भाऊ आणि वडील भक्कम पणे पाठीशी उभे होते…. मुख्य म्हणजे तो साडेपाच वर्षाचा
काळ त्यांनी सत्कारणी लावला …. P hd ची डिग्री
पूर्ण करून घेतली !!! अशा मानसिक परिस्थितीत सर्वोच्च degree मिळविण्या करिता त्यांच्या
इच्छा शक्तीला दंडवत !!!
दिवसावर दिवस जात होते , मुले मोठी झाली …. नोकरीला लागली , मुलीचे
लग्न झाले आणि ती अमेरिकेत स्थाईक झाली …
तिचे जुने दुखणे Thyroid नी
परत मान वर काढली , operation ला पर्याय नव्हता , त्या मुळे ते करायचा निर्णय झाला….
operation तर व्यवस्थित झाले पण तिच्या Vocal Cord ला धक्का लागला आणि आवाज गेला
…. आख्खे कुटुंब हादरले !! परत त्यांचा झगडा सुरु झाला कोर्ट कचेरी आणि वेग वेगळ्या
देवांना साकडे , त्याला यश आले आणि तिचा आवाज पूर्ववत झाला ….
त्या नंतर पुढील आयुष्यात अनु आणि गोपी मुळे जवळ जग प्रवास झाला ,
वाचनाची दोघानाही आवड …सतत काही तरी वाचत असतात … लिखाणाची त्यांना
आवड , कथा कादंबर्या लिहिल्या.
ती तर साक्षात अन्नपूर्णा !!
बोलावून खाऊ घालण्याची दोघानाही आवड ….
असे एक ना अनेक अनुभव घेत
… आयुष्याचे रोलर कोस्टर अनुभवणारे ते दोघे …. म्हणजे आई बाबा तुम्ही ,
आज तुमच्या लग्नाचा ५० वा
वाढदिवस ….अशा एक ना अनेक आठवणी तुमच्या कडे असणार , त्या पैकी काहींचा मी साक्षीदार
…।
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !!
बिपीन कुलकर्णी