Saturday, March 14, 2015

मृत्यू खरेच सुंदर असतो का ?


मृत्यू खरेच सुंदर असतो का ?                                                                                        १५ मार्च २०१५                        
               
 … आयुष्यभर किती जरी "चिरंजीवी भव" आशीर्वाद घेतले तरी मृत्यू हे अटळ सत्य , तो कोणाला चुकणे शक्यच नाही

अध्यात्म  सांगते मृत्यू सुंदर असतो ?  पण जवळच्या व्यक्तींकरिता तो भेसूरच असतो.

मृत्यू पाश्चात आत्म्याचे काय होते ते देव जाणे !

पण मृत्यू नंतर होणारे देहाचे आणि नंतरचे विधी एकूण दोन भागात विभागले आहेत   " विधी " आणि  "संस्कार"

अग्निसंस्कार हा देहावर केला जाणारा अपरिहार्य विधी आणि नंतर होणारे सगळे संस्कार….

मृत्यू झालेल्या दिवसा पासून उधक शांती पर्यंत १४ दिवसाचा काळ , एकूणच त्या कुटुंबीया करिता कसोटीचा काळ असतो. खूप विधी, संस्कार अनेक गोष्टी घडत असतातआणि कुटुंबियांचा दुःखाचा बांध परत परत फुटत असतो , या प्रत्येक विधीला 
धर्मशास्त्राचा आधार आहे   

गेलेली व्यक्ती धार्मिक असेल किंवा मागे राहिलेल्या व्यक्तींच्या इच्छे करिता किंवा कधी समजा करिता या सगळ्या गोष्टी होत असतात, हा भावनेचा प्रश्न  आहे आणि ती  जपलीच पाहिजे , यात कुठलेही दुमत नाही

धर्म सिंधू सांगते " स्नान घालून , गंध , पुष्प, तुलसी माळा  इत्यादींनी अलंकृत करून , चंदनाचा लेप लावून  देह स्मशानात न्यावा "

 आपल्या कडे प्रत्येक गोष्टीचा विपर्यास होतो……. अशी दुर्दैवी घटना घडली कि प्रत्येक ठिकाणी , सामाजिक जाणीवेतून उदात्त हेतूने मदत करणारी मंडळी असतात, त्यांचा हेतू चांगलाच असतो , पण शास्त्र काय सांगते हे त्यांना बरेचदा  दुर्दैवाने माहिती नसते.
तिरडी बांधण्या पासून स्मशाना पर्यंतचा प्रवास एकूणच यांत्रिक पद्धतीने होतो , गेलेल्या व्यक्ती च्या घरची मंडळी प्रचंड धक्क्यात असतात , आणि ते बिचारे सगळे सांगतील तसे करत असतात.

आता यात होते काय ,

अध्यात्म सांगते मृत्यू सुंदर असतो  म्हणूनच शास्त्र सांगते पार्थिव देहाला शुचिर्भूत आणि अलंकृत  करून नीट निटके सजवून अंतिम प्रवासाला न्यावे  , एकूण काय तर शेवटची आठवण  सुंदरतेने  डोळ्यात साठवून ठेवण्या जोगी असावी
पण होते वेगळेच 

अलंकृत करण्या पायी त्या देहाची काय परिस्थिती होते ते आपण सगळेच पाहतो ? खरेच याची गरज आहे का ? त्या निस्चर  देहाला पाहून मृत्यू  सुंदर वाटू शकतो का ?

का आम्ही धर्म शास्त्रा चा आपल्या सोयी चा अर्थ लावून , गेलेल्या व्यक्ती च्या अंतिम यात्रे चे भेसूर चित्र निर्माण करतो ?

बुक्का काय, पैसा काय, चंदनाचे लेप काय , तुलसी पत्र काय ? आहे या सगळ्या गोष्टीना शास्त्रा चा आधार आहे , त्यात वाद नाही पण या सगळ्या गोष्टी सुंदरतेने पण अर्पण होऊ शकतात ना ?

बरेच ठिकाणी किरवंत उपलब्ध नसल्या मुळे भडाग्नी दिला जातोमंत्राग्नी चे विधी १० व्या दिवशी केले जातात.
एकूणच स्मशानातून परत आल्या नंतर, आपल्या जवळच्या व्यक्ती चा शेवट पाहिल्या ने  मन सैरभर झालेले असते आणि जी एक भावना येते त्यालाच कदाचित "स्मशान वैराग्य" म्हणत असावेत.

मंत्राग्नी च्या वेळेस क्षौर (केशवपन ) करावे असे शास्त्र सांगते , या मागचे कारण "धर्म सिंधू " , " निर्णय सिंधू " या ग्रंथात मिळाले नाही, तसेच तीर्थ क्षेत्रा वरील गुरुजी पण सांगू शकले नाहीत , कदाचित प्रायश्चित्त किंवा शरीर शुद्धी असू शकेल .
व्यावहारिक दृष्ट्या आपण असे करून गेलेल्या व्यक्ती च्या मृत्यू मध्ये नकळत पणे एकप्रकारची भयानकता आणतो, किती भेसूर दिसते ती व्यक्ती .

मुलगा किंवा अतिशय जवळच्या व्यक्ती अंतिम संस्काराचा अधिकार आहे ,… आत्मा अमर आहे आणि १३-१४ दिवस तो घुटमळत असतो आणि सर्व गोष्टी पहात असतो असे अध्यात्म सांगते . आपल्या मुलाचे क्षौर केलेले भेसूर रूप पाहून आत्म्याला किती यातना होत असतील  ?

पण शेवटी भावने पेक्षा समाज काय म्हणेल हेच महत्वाचे

अस्थि विसर्जन संगमावर किंवा गंगा नदीत करावे असे शास्त्र सांगते . काय परिस्थिती आहे आपल्या कडे घाटांवर ? आळंदी किंवा इतर काही क्षेत्रा वर चांगली सोय केलेली आहे , पण प्रत्येकाला तिथे जाणे शक्य नाहीइतर ठिकाणच्या परिस्थिती बद्दल बोलणेच ठीक.ज्या संगमावर आपण भावनेने अस्थि विसर्जनाला आलो तिथली परिस्थिती पाहून प्रचंड यातना होतात, पण इलाज नाही. जिथे रक्षा विसर्जन होणार तिथली परिस्थिती पाहून पुन्हा प्रश्न पडतो  ….खरेच मृत्यू सुंदर असतो का ?


तीर्थक्षेत्री १० व्या नंतर चे विधी करताना आजकाल व्यावसायिकता जास्त आली आहे , भावनेला काडी मोल किंमतयाला काही अपवाद असू शकतात पण एकूण कमीच .

या सर्व संस्कारातील "काक स्पर्श " ह्या विधीशी घरातील जवळचे लोक भावनेने निगडीत असतात, गेलेल्या व्यक्ती ची शेवटची इच्छा पूर्ण करण्या करिता सगळे जण आपल्या परीने प्रयत्न करीत असतात

ती जी जागा असते तिथली परिस्थिती पाहून अंगावर काटा येतो , नाशिक सारख्या क्षेत्री इतकी वाईट परिस्थिती आहे त्या जागेची , दोन दोन तीन तीन दिवसाचे अन्न तसेच पडलेले , आलेले लोक कालच्या अन्ना ला तुडवत जातातत्रास होतो हे सगळे पाहून किंवा आठवून.
तशात आज काल शहरात कावळे दुरापास्थ झालेत , कावळेच नसतील तर काकस्पर्ष होणार कसा ? जसा जसा वेळ जातो आणि काकस्पर्षा ला उशीर होतो तसा भावनेचा बांध फुटत जातो , आणि ते स्वाभाविक आहे सगळे आप्त या विधीशी भावनेने जोडलेले असतात
काकस्पर्ष झाल्यास  उत्तर आमच्या शास्त्राने सांगितले " दर्भाचा कावळा करणे आणि स्पर्श करणे " दर्भाचा का ? याचे पण उत्तर  धर्मसिंधु मध्ये मिळत  नाही.  

आजूबाजूच्या लोकांचा आक्रोश किंवा दुख पाहून कसे म्हणणार आम्ही मृत्यू सुंदर असतो ?

धर्मग्रंथ आपल्याला वाट दाखविण्याचे काम करीत असतात , पण आम्ही आमच्या सोयीने प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावत असतो , आणि ज्यांना यातील थोडे फार ज्ञान असते ते व्यावसायिकता आणून आमच्या भावनेशी खेळतात

हि सगळी परिस्थिती पाहून कदाचित मृत्यू ची भीती अजून गडद होत जाते

अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य आणि परशुराम हे सात जण चिरंजीव आहेत, असं पुराणात सांगितलं आहे, बाकी आम्ही सगळे यातून जाणारच …. म्हणूनच  विचार करणे हि  काळाची गरज.

कदाचित मृत्यू  सुंदर असेलही पण आम्ही त्याला नक्कीच  भयाण रूप देतो .

- बिपीन कुलकर्णी


9 comments:

  1. Satya paristhiti Che sunder warnan

    ReplyDelete
  2. Bhayan satya ahe he sagale .. Kashalach kahi uttar nahi tasech blog pan niruttar karato.

    ReplyDelete
  3. दादा, विश्वास बसत नाही असे सत्य आहे किती जवळून पाहिले हे सगळे. तुम्ही धारिष्ट्य ठेवून लिहिले आहे. नूसते विचार सगळेच करतात. विधायक बदलांची गरज आहे.
    " विधी " आणि "संस्कार" त्रासदायक व शोभेचे नसावे असे वाटते. मृत्यू अटळ , निसर्ग चक्र आहे कोणाला ही चूकणार नाही म ते अनावश्यक सोपस्कार न ठेवता क्षमते नूसार साधे सोपे जाईल असे हवे.

    ReplyDelete
  4. दादा, विश्वास बसत नाही असे सत्य आहे किती जवळून पाहिले हे सगळे. तुम्ही धारिष्ट्य ठेवून लिहिले आहे. नूसते विचार सगळेच करतात. विधायक बदलांची गरज आहे.
    " विधी " आणि "संस्कार" त्रासदायक व शोभेचे नसावे असे वाटते. मृत्यू अटळ , निसर्ग चक्र आहे कोणाला ही चूकणार नाही म ते अनावश्यक सोपस्कार न ठेवता क्षमते नूसार साधे सोपे जाईल असे हवे.

    ReplyDelete
  5. अगदी थेट आणि सत्य परिस्थिती लिहिली आहे. हे सगळ बदलू शकत 'हा' शेवटचा प्रवास चांगला होऊ शकतो, पण आपल्याकडे या बद्दल फार उदासीनता आहे, ज्यांनी करायला पाहिजेल ते उदासीन आहेत, जे यातून जात असतात ते त्या मनस्थितीत नसतात. मग या सगळ्याला नाव ठेवून कुठलेच सोपस्कार करायचे नाहीत अशी टोकाची भूमिका घेतली जाते....

    ReplyDelete
  6. दादा..लेख त्याच दिवशी वाचला..मन सुन्न झाले. आपण सगळेच नुकत्याच हया परिस्थिती तून गेलो आहोत. मरण सुंदर असू शकते हे आपल्या माणसांच्या बाबतीत स्वीकारणे खरच अवघड असते. आपल्या विधी नूसार व्यक्ती पंच महा तत्वा त विलिन होते व तयाला दैवतव मिळते वास्तविक पाहता त्या माणसाची उणीव ,त्याच जाण भेदक बनवते आणि आशा मनस्थितीत असताना या सगळ्या गोष्टींना सामोरं जाणं खरच आवघड असत...

    ReplyDelete
  7. Tu lihalas te atishay satya ahe pan wachun doka sunna hota.. wishay khup najuk asalyamule manala jari patat asel tari samajachya ani rudhinchya wirodhat jayala asha dukkhi manastithit prachand takad pahije. Practical goshti (kaksparsha, sadhyachya nadyanchi halat, 2-3 diwas padun rahilele pinda) he karach parat parat hya goshticha wichar karyala lawanarya praistithi ahet...

    ReplyDelete
  8. मन सुन्न झाले लेख वाचून .
    मृत्यू सुंदर असतो तो त्या आत्म्यासाठी . कारण हिंदू धर्मात म्हटल्याप्रमाणे तो "त्याच्यात " विलीन होणार असतो म्हणून ….
    पण जवळच्या व्यक्तीसाठी तो शोक कारकच असतो . आणि उरलेल्या लोकांना फक्त शिष्टाचार करावा लागतो . त्यामुळे या सर्व गोष्टी होतात …
    पण खरच या सार्याची गरज असते का ? प्रत्येकाने विचार करायला हवा .

    ReplyDelete