Tuesday, December 23, 2014

खावे त्याच्या वंशा

"खावे त्याच्या वंशा"                                                  २३ डिसेंबर २०१४
मन आणि विचार यांचा वेग प्रकाश आणि ध्वनी पेक्षा कितीतरी पट अधिक असतो ,  याचा अनुभव  प्रत्येकाला सतत येतच असतो …. … 
काल एका Client बरोबर त्यांच्या कॅफेटेरिया मध्ये जेवायला गेलो असताना , मेथी पराठा मागवला आणि जेंव्हा मेथी पराठा आला तेंव्हा पराठ्यावर एक चमचा भरून लोणी ठेवले होते. ते चमच्यातील लोणी पाहून मन नकळत काही वर्षे मागे गेले

सोलापूर ,

लहान पण सोलापुरात गेले एकूणच या शहराशी निगडीत खूप आठवणी …
आमच्या लहान पणी हॉटेलिंग चे फॅडहि नव्हते किंवा आजच्या सारखी गरजहि नव्हती , घरोघरी माझ्या आई सारख्या माउली सातही दिवस सकाळ संध्याकाळ स्वयपाक करत असत. त्या मुळेच हॉटेल मध्ये जाणे हि चैन असे …..आणि त्यामुळेच नकळत तो एक आनंद सोहळा बनत असे.  
त्या वेळेस ची सोलापुरातील ठिकाणे म्हणजे "गदग ग्रांड " "सोलापूर इडली गृह " " हॉटेल किनारा" किंवा फार फार तर गेला बाजार "हॉटेल उपहार"

गदग ग्रांड म्हणजे ज्याला उडपी हॉटेल म्हणतात ते …हॉटेल मध्ये आत शिरताच  पहिल्यांदा दिसतो तो गल्ल्यावर बसलेला मालक , त्याच्या पाठीमागे लावलेले अनेक दैवतांचे फोटो, असंख्य इलेक्ट्रिक ची बटणे , दिवसाच्या कुठल्याही वेळेस गेले तरी एक प्रकारचा उदबत्तीचा सुवास .
हॉटेल तसे ३ मजली , वर जाण्या करिता एक चक्राकार जिना …. त्या जिन्याचे लहान पणी आम्हाला कोण अप्रूप ?
उडपी हॉटेल असल्या मुळे लोक तिथे इडली, वडा, डोसा सारखे तत्सम पदार्थ खाण्या करिता जात ….
अजून एक सोलापुरात डोस्याला  द्वाशि का म्हणतात ? हे एक कोडेच आहे असो तर इथे डोस्यावर अगदी मी काल पहिले तसेच चमच्यात लोणी देत असत …. त्या वयात आणि काळात चमच्यातील लोण्याचे पण खूप कौतुक असायचे कारण आजच्या सारखे घरोघरी अमूल बटर ची पाकिटे फ्रीज मध्ये ठेवलेली नसत.

सोलापूर हे आंध्र आणि कर्नाटक सिमे वर असल्या मुळे , खाद्य संस्कृती वर तिकडचा पगडा आहे …. इडली गृह हा प्रकार महाराष्ट्रात इतर ठिकाणी अभावानेच आढळतो , पण सोलापुरात बरीच इडली गृहे होती आणि अजूनही असावीत हा हॉटेल चा साधा प्रकार , खानावळी सारखे एका रांगेत बसून प्रत्येकाच्या पानात इडली , वडा , चटणी आणि सांबार वाढणार … वाढपी आग्रह करून खाऊ घालणार ? सांबार च्या बरोबरीने इथे चटणी वाढली जात असे , तसेच इथल्या इडलीचा आकार पण वैशिष्ठ पूर्ण … म्हणजे आपण भाताची मूद करतोना अगदी तस्साच !!
शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत जशी इतर गायन प्रकारांना अलिखित बंदी असते तसेच इथे इडली वड्या  शिवाय इतर पदार्थ निषिद्ध 

उपहार आणि किनारा थोडी वरच्या श्रेणीतील , म्हणजे आजच्या भाषेतील " गार्डन रेस्तौरन्त " पण शेवटी पदार्थ तेच , 
इडली , वडा , डोसा , उत्तप्पा !

तेंव्हा पाव भाजी या पदार्थाला  मुंबई ची सीमा ओलांडायची होती  आणि चायनीज गाड्यांचे पेव फुटायचे होते .
भाग्यश्री हॉटेल चा बटाटे वडा हा एक अविस्मरणीय पदार्थ , बटाटे वड्याचा वडा पाव झाला नव्हता , एक वडा, शेंगदाण्याची चटणी आणि त्यावर लिंबाची फोड … सुंदर 
बाकी म्हणायचे तर पार्क वर जाऊन भेळ खाणे किंवा हुतात्मा बागेत जाऊन पाणी पुरी खाणे हि पण चैनेची व्याख्या होती .
सोलापुरातील खाद्य भ्रमंती ची हीच काय ती  ठिकाणे ,,,

सोलापूर च्या बरोबरीनेच  औरंगाबाद मध्ये लहान पण गेले , औरंगाबाद ला तशी म्हणावीशी खाद्ययात्रा आठवणीत नाही मेवाड हॉटेल चा डोसा पुसटसा आठवतो , कामाक्षी हॉटेल पण उडपी हॉटेल , पण तिथे कधी गेल्याचे आठवत नाही …आज ते काळाच्या पडद्या आड गेलेय… तसेच क्रांती चौकातील हॉटेल राजस्थान चे नीर निराळे चाट पदार्थ आठवतात
गायत्री चाट भांडार ची कचोरी आणि मुंग भजी खाणारी आमच्या घरात माझ्या मुलाची  चौथी पिढी. वयाच्या साठीत सौंदर्य टिकवून ठेवलेल्या  हेमा मालिनी सारख्या  इथल्या पदार्थाची चव अजूनही लाजवाब
९० चे  दशक सुरु होताना पावभाजी हा प्रकार मुंबई हून सिमोलंघन करून इतर शहरात पोहोचला  ,त्याच सुमारास  क्रांती चौकात पावभाजी ची गाडी आल्याचे आठवते.

कोलेज ला असताना पुर्णानंद च्या बटाटे वड्याची ओळख झाली …. चव तर  लाजवाब . पण याला वडा म्हणणे म्हणजे हनुमान टेकडी ला सह्याद्री पर्वत म्हणण्या सारखे  ! गुजरात मध्ये गोटी वडा नावाचा एक प्रकार मिळतो , छोटे छोटे वडे … लग्नाच्या बुफे मध्ये असतात तसे …. तसा हा पूर्णानंद चा वडा …. पण चव मात्र अप्रतिम !!

उस्मानपुर्यातील पाणी पुरी, उत्तम मिठाई ची इम्रती किंवा जिलेबी न खालेल्ला औरंगाबादकर शोधूनही सापडणार नाही

गुलमंडी वर श्यामलाल कोल्ड्रिंक कडे मिळणारे "निचोड जिंजर " हा प्रकार मला तरी इतर कुठल्याच शहरात आढळला नाही , सोडा , आले , लिंबू आणि मिठाच्या  अप्रतिम मिश्रणातून तयार होणारा हा पदार्थ ! प्यायल्या  नंतर पाचव्या मिनिटाला ढेकर तृप्तीचा यायलाच पाहिजे  …  हि या पेयाची खासियत
आज श्यामलाल कोल्ड्रिंक पण इतिहास जमा झालेय

नोकरी  मुळे करत असलेल्या भ्रमंतीत बरीच गावे पालथी घालतो ,  निरनिराळ्या शहरातील चांगल्या वाईट पदार्थाची चव घेणे क्रमप्राप्त.
इंदोर मध्ये गेल्या नंतर " पोहे आणि जिलेबी " या deadly combination शिवाय नाष्टा होऊच शकत नाही , रस्त्यावर ची टपरी असो किंवा पंचतारांकित हॉटेल, प्रत्येक ठिकाणी पोहे आणि जिलेबी मिळणारच. इंदोर मधली सराफ कट्ट्यावर वर संध्याकाळी  भरणाऱ्या  खाऊ गल्ली बद्दल बरेच ऐकले पण अजून जाण्याचा योग आला नाही.

गोव्या मध्ये गेल्या नंतर पणजी ला अगदी भरवस्तीत नाईक यांचे हॉटेल , तिथे सकाळी नाश्त्याला मिळणारी बटाट्याची  रस्सा भाजी किंवा  हिरव्या वाटण्याची उसळ बरोबर पोळी किंवा ब्रेड …अप्रतिम
गोवा तसे मस्यप्रेमी चे शहर , पण माझ्या सारख्या अस्सल  शाकाहार्याला ठराविक पण अतिशय सुंदर पदार्थ देवून ,परत यायला लावणारी  " Moms Kitchen " किंवा " Martins Corner " सारखी ठिकाणे पण आहेत गोव्या मध्ये

मध्यंतरी  सावंतवाडी शहरातून  जाताना , सहज म्हणून जेवायला थांबलो ते  राजू भालेकर चे महलक्ष्मि भोजनालय अहाहा काय सुंदर खानावळ. पोळी , मटकी ची उसळ  , बटाटा काचर्या , आमटी , भात आणि सोलकढी स्वस्त आणि मस्त

श्रीवर्धन ला आमच्या जयेश च्या "आपली  वाडी" वर मिळणाऱ्या वालाच्या बिरड्या ची चव काय वर्णावी , वालाची उसळ, पोळी,आमटी, भात ,उकडीचे मोदक आणि त्यावर सोलकढी … आत्मा तृप्त होणे म्हणजे काय याचा अनुभव घ्यायचा असेल तर तिथे गेलेच पाहिजे 

हरिद्वार आणि ऋषिकेश मध्ये मिळणारा "आलू पुरी" प्रकार तिथे गंगेच्या काठावरच चाखायला पाहिजे, साधी बटाटा रस्सा भाजी ,पुरी आणि कांदातसे म्हंटले तर यात काय विशेष , पण कदाचित गंगेच्या पाण्याच्या गोडव्या मुळे काही खास चव येत असेल तर ती गंगाच जाणो.

दिल्ली मध्ये प्रत्येक कोपर्यावर मिळणारे छोले भटुरे किंवा टिक्की प्रकार दिल्लीतच खायला पाहिजेत, इतर शहरात जरी ते मिळत असले तरी दिल्ली ची सर त्याला येउच शकत नाही.

कोलकत्त्यात मिळणारी खस खस घालून केलेली बटाट्याची भाजी खरेच लाजवाब , त्या भाजीचे नाव विसरलो , पण हॉटेल मधील वेटर आठवणीने जास्त न खाण्या बद्दल कल्पना देतो ( जास्त खाल्ली तर खस खसि मुळे झोप येण्याची शक्यता), तिथे मिळणारा "मिष्टी दोही " असाच मस्त प्रकार

जयपूर किंवा गुजरात मध्ये   मिळणारी शेव टमाटर सब्जी पण असाच एक चं प्रकार, गरम गरम रोटी बरोबर खाण्यात जी मजा आहे ना ती सांगून कल्पना येणार नाही , बस ने प्रवास करत असताना बस जेवायला थांबली कि ढाब्यावर हमखास मिळणार.

नागपूर ला जाऊन पुडाची वडी खाणे म्हणजे महादेव च्या मंदिरात जाऊन नंदी दर्शन घेण्या सारखे.

"मासवडी रस्सा " नावा वरून तर मांसाहारी वाटतो पण आहे अस्सल शाकाहारी , रस्सा आणि त्यात डाळीच्या पिठाच्या वड्या अतिशय खमंग पदार्थ पोळी किंवा भाकरी बरोबर खायचा  !  एकदा नगर हून येताना सुप्या च्या जवळ एका ढाब्यावर  हा पदार्थ खाल्ला

अशी खूप खाद्य ठिकाणे पालथी घातली , तसा मी काही जातीचा खवय्या नाही पण कळत नकळत अशा ठिकाणी सतत जाणे होते, एका लेखात लिहिण्या सारखा हा विषय नाही , पण जे आठवले ते लिहिता झालो

२१ वर्षा पूर्वी पुण्यात आलो पुणे तर काय बोलून चालून खाद्य पंढरी….  आम्ही झालो त्याचे वारकरी… 
पुणे आणि खाणे एकाच नाण्याच्या दोन बाजू ,  …. टिळक रोड च्या बादशाही पासून कॅम्प मधील मारझोरीन पर्यंत …. इथे मिळणाऱ्या उकडीच्या मोदका पासून ते थेट वरण फळा पर्यंत  ….  हा  एक स्वतंत्र लेखाचा विषय पण पुन्हा कधी तरी !
  
                                                    
                                                                          " अन्नदाता सुखी भव "    


बिपीन कुलकर्णी

5 comments:

  1. Dada ekdam sahi .. Awadicha vishay Ani apratim mandani .. Ekdam June solapur ani Aurangabad che diwas athawale .. Bhukeni dhekar ala ;)

    ReplyDelete
  2. झकास, तोंडाला पाणी सुटले. अनेक आठवणी जाग्या झाल्या, मस्तच.

    ReplyDelete
  3. Eakdam masta. Amhi sare khavayye :-)

    ReplyDelete
  4. Solapurachya agadi lahanpanichya athavani alya...Sundar lihale ahes.. Tu numund kelelya thikani jaun nakkich khayala awadel. Tondala pani sutale wachun...Dwashiche matra khacha na ulagadalele kode ahe ...

    ReplyDelete