Wednesday, December 24, 2014

कथा एका शाळेची !





कथा एका शाळेची !

२४ डिसेंबर २०१४

"मज आवडते हि मनापासुनी शाळा,… लाविते लळा हि…. जशी माऊली बाळा.... " हि केशवसुतांची सुंदर कविता, वाचत असताना आपले मन हळवे होते आणि झर झर काही वर्षे भूतकाळात जाते .

मध्यंतरी झी मराठी वाहिनीवर सलिल कुलकर्णी एक छान कार्यक्रम करीत असत…. "मधली सुट्टी " त्यात नावाजलेले  लोक शाळेत जाऊन शाळेच्या आठवणी जागवत असत , कार्यक्रमाचा  मुख्य उद्देश हाच होता कि शाळेत येवून जुन्या आठवणी परत एकदा जगणे , हा कार्यक्रम पाहताना नेहमी वाटे कि कधी तरी आपली शाळा दिसविपण तो योग काही आला नाहीकारण आमची शाळा म्हणजे काही मुंबई पुण्याच्या बालमोहन , नु वि किंवा बॉम्बे स्कॉटिश स्कूल सारखी नावाजलेली शाळा नव्हे 

 सोलापूर शहरातील दयानंद काशिनाथ असावा हायस्कूल , म्हणजे  डी के असावात्या काळात  काळात  वलय  नसलेली आणि  दुर्लक्षित!!

वलयांकित किंवा हुशार  विद्यार्थी घडविण्याचा अधिकार फक्त हरीभाई देवकरण किंवा सिद्धेश्वर प्रशालेचा , अशी एक भावना सोलपुर करात होती , खरे ती भावना विद्यार्थ्या पेक्षा पालकातच  जास्त होती.

आमच्या कडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन …. विद्यार्थी विश्वात  आम्ही कायम इंग्लिश मध्ये म्हणतात तसे " UNDER DOGS " म्हणजे शर्यतीत नसलेले घोडे !

त्या मुळे एक झाले, आमच्या कडून कोणीही कसलीही अपेक्षा ठेवली नाही. ना पालकांनी ना शिक्षकांनी !  अपेक्षांचे ओझे घेतल्या मुळे पुढील आयुष्यात नावाजलेल्या शिक्षण संस्थाच्या विद्यार्थ्या इतकेच यशस्वी झालो  किंवा क्वचित त्याहून थोडे पुढेच गेलो. याचे सारे श्रेय शाळेतील शिक्षकांना

आचार्य देवो भव :

शिक्षक आपल्याला घडवितातम्हणजे नक्की  काय करतात ?

काय करावे या पेक्षा  पेक्षा काय करू नाही याची नकळत जाणीव देणे…. यालाच संस्कार किंवा घडविणे म्हणतात ना.

असा जेंव्हा विचार करतो तेंव्हा नकळत काही शिक्षकांची आठवण आल्या शिवाय रहात नाही

नखाते सर….

१९५८ म्हणजे स्थापने पासून  ते १९८२ म्हणजे निवृत्ती पर्यंत मुख्याध्यापक होते…. मुख्याध्यापक म्हणजे अनेक जबाबदार्या, त्या सगळ्या पार पाडत असताना  ते खरे रमले भूमिती मधे…. भूमिती सरखा क्लिष्ट  विषय किती सोपा होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले.

रोज सकाळी प्रार्थने नंतर हातात वेताची छडी घेवून  प्रत्येक  वर्गा वर चक्कर मारणे, आदल्या दिवशी गैरहजर असलेल्या मुलांनी हातावर छडी घेणे…. हा नित्य क्रम

अर्ध्या बाह्यांचा शर्ट, बहुतेक पांढरा , निळा किंवा राखाडीकाळ्या किंवा तत्सम रंगाची पँट , तेल लावून मागे वळविलेले केस , बारीक अंगकाठी , बुटकी मूर्ती ! कधी ओरडणे किंवा चिडणे नाही, विद्यार्थ्यात एक प्रकारचा दरारा आणि भीती युक्त आदर….

नखाते सरांच्या कारकिर्दीत खूप विद्यार्थ्यांनी यशाच्या पताका फडकवल्या …. किती डॉक्टर, इंजिनिअर , वकील, प्राध्यापक झाले याचा हिशोब कधी कोणी ठेवला नाही , पण जिथे आहेत तिथे प्रत्येक  विद्यार्थ्याला या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे.

नखाते सरांच्या काळात शाळेची वाढ झाली , खोल्या पासून सुरुवात झालेली शाळा विस्तारत गेली. मुलांना खेळाचे मैदान , ग्रंथालय , प्रयोग शाळा या गोष्टी मिळाल्या.

पु देशपांडे च्या व्यक्ती आणि वल्ली मधील चितळे मास्तर शोभतील असे आमचे लिमये सर ! दोन टांगी धोतर , पांढरा नेहरू शर्ट, डोक्यावर अर्धवट टक्कल , खिशात पेन, हातात खडू आणि डस्टर!

लिमये सरांचा जन्म फक्त आणि फक्त गणित शिकविण्या करिता झाला होता …. 

बीजगणित शिकताना प्रत्येक विद्यार्थ्याला   "क्ष" या सौध्नेचि जी नकळत भीती बसते  आणि कदाचित त्यामुळेच पुढील आयुष्यात कमीत कमी वेळा क्ष या शब्दाचा वापर करतो …. पण सरांनी बीजगणित या विषयाची आमची मैत्री करून दिली . प्रमेय सोडवल्यावर ताळा कसा करायचा  किंवा आलेख किती सुबक पणे काढायचा हे त्यांनीच शिकविले, आलेख काढताना विद्यार्थ्याच्या पेन्सिलीला टोक करून देणे, कागद काळा  होऊ देता खोडून देणे हे नित्य  काम. …पायथागोरस किती सोपा होऊ शकतो ? हे त्यांच्या कडून शिकलेले विद्यार्थी सांगू शकतात. 

पु च्या वाक्यात सांगायचे तर " प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक हि चैन आमच्या शाळेला परवडणारी नव्हती "

त्या मुळे  लिमये सर पण  इतर  विषय शिकवीत पण त्यात ते म्हणावेसे रमले नाहीत . भूगोल शिकविताना त्यात भूमिती डोकावत असे …. किंवा इतिहासात बीज गणित !

पायथागोरस, फ्रेंच राज्यक्रांती ,दुसरे महायुद्ध, विषुवृत्त, हे सगळे एकत्र येणे अवघडच , तरी सरांनी ते विषय तेवढ्याच निष्ठेने शिकविले.  

मराठी माध्यमातील मुलांना इंग्रजी विषया बद्दल एक विचित्र भीती , ती घालविली देशपांडे सरांनी… V P देशपांडे म्हणजे आमच्या शाळेचे तर्खडकर किंवा रेन & मार्टिन !....शिडशिडीत बांधा , उंची जवळ पास सहा फुट , मागे वळविलेले केस , चेहऱ्यावर एक प्रकारचा करारी पणा !  या भू तलावर त्यांनी जन्म घेतला तो फक्त आणि फक्त इंग्रजी शिकविण्या करिता ! त्यात व्याकरणावर जास्त भर . …..शाळेतील मुले एक तर कनिष्ठ किंवा फार तर मध्यम वर्गीय घरातील , आयुष्यात पुढे जाण्या करिता इंग्रजी शिवाय पर्याय नाही याची जाणीव सरांना होती , त्या मुळे आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवस्थित इंग्रजी यावे हि कळ कळ . …प्रत्येक शब्दाचे स्पेलिंग ५० वेळा लिहिणे , व्याकरणाच्या संज्ञा सगळ्या वर्गानी मिळून पाठ करणे , इंग्लिश कविता सामुहिक म्हणणे या वर त्यांचा जोर असे . एवढे सगळे करून एखादा विद्यार्थी काही चुकला तर , विद्यार्थ्याच्या पाठीची किंवा  गालाची आणि सरांच्या हाताची गाठ असे. ,त्याहून मुलांना कशाचा धाक असेल तर त्यांच्या जिभेचा 

शिक्षकांनी विद्यार्थ्या वर हात उगारणे किंवा रागाविणे  यात गैर वाटण्याचा तो काळ नव्हता , पालकांचा शिक्षकांच्या उद्येष्यांवर विश्वास होता 

देशपांडे सरा च्या मेहनतीचे फळ म्हणजे कितीतरी विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात भारतात किंवा इतर  देशात यशाच्या पताका फडकवीत आहेत. …प्रत्येक मुलाचे पूर्ण नाव आठवणीत ठेवण्यची एक दैवी देणगी त्यांना आहे. ..देशपांडे सरांनी  पण नीर निराळे विषय शिकविले , इतिहास बहुतेक त्यांच्या आवडीचा विषय होता , शिक्षकी पेशा स्वीकारण्या पूर्वी ते ऐतिहासिक स्थळा वर Tourist Guide चा व्यवसाय करत . 

पण अस्सल कसोटी फलंदाज जसा ट्वेंटी-ट्वेंटी  मध्ये रमू शकत नाही तसेच या शिक्षकांचे होत असे , पण एकूणच नाईलाज असे…… नाईलाज जरी असला तरी शिकविण्यात तडजोड होत नसे.

देव देवे देव: - प्रथमा , म्हंटले कि अजूनही डोळ्या समोर पटवर्धन बाई येतात , संस्कृत असो मराठी असो किंवा हिंदी  बाई च्या शिकविण्याची सर कोणालाच येऊ शकत नाही. मराठी कवितेंचे अर्थ समजावून सांगणे , कवितेला साध्या सोप्या चाली लावून विद्यार्थ्यां कडून पाठ करून घेण्यात बाई चा हातखंडा. ….."गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या " हि कविता शिकून ३० वर्षाचा काळ लोटला , पण अजूनही पूर्ण लक्षात असण्याचे श्रेय आमच्या बुद्धीला किंवा स्मरण शक्तीला नसून ,कवितेचा भावपूर्ण अर्थ आमच्या मनावर कोरलेल्या बाई च्या शिकविण्याला आहे.

शिवाजी सावंतांची पी कॅप , व्ही शांतारामांची फर कॅप  हि जशी ओळख होती , तशीच बाईंची "छत्री " हि ओळख …. 

आचार्य अत्र्यांनी  एकदा बा बोरकरान बद्दल बोलताना त्यांच्या नेहमी पश्मिनी शाल वापरण्यावरून  कोटी केली होती " एक वेळ तुम्हाला काट्याविना बोर मिळेल , पण शाली विना बोरकर शक्यच नाही "  हि कोटी छत्रीच्या बाबतीत बाईना तंतोतंत लागू होती

उन्हाळा पावसाळा किंवा हिवाळा असो एका वर्गावरून दुसर्या वर्गात बिना छत्रीचे बाईंना जाताना बघितल्याचे आठवत नाही

चित्रकला हा विषय शिविणारे खताळ सर , हात कायम थरथरत असे…. पण काय चित्र काढीत ? कलेवर निष्टा आणि प्रेम वाखाणण्या सारखे , मुलांना Elimentry , Intermidiate परीक्षेला बसण्या करिता प्रोत्साहन देणे , शाळा संपल्या नंतर उशिरा थांबून तयारी करून घेणे पुढे जाऊन परीक्षेच्या दिवशी मुलांना परीक्षा केंद्रावर घेवून जाणे , पदरमोड करून गरीब मुलांच्या बस च्या तिकिटाचा खर्च करणेकाय मिळत होते सरांना हे करून ? ….काही मिळविण्या करिता किंवा स्वार्था करिता नक्कीच सर हि मेहनत करीत नव्हते

सर कायम थकलेले जाणवत , बोलायला खूप त्रास होत असे , हात थरथरत असे , त्यांना काय त्रास आहे हे समजण्याचे आमचे ते वय नव्हते

शाळेतील प्रत्येक शिक्षकांच्या अशाच असंख्य आठवणी, त्या सगळ्या एका लेखात पूर्ण होऊच शकत नाहीत ,  पोटाबत्ती सर आणि त्यांची फॅशनेबल राहणी , फोटोग्राफीची आवड  …मुडके सरांचे लवंगा खाणे , काळे सरांनी वर्गात दाखविलेले शास्त्रीय प्रयोग , आयगोळे  बाईंची प्रभाकर महाराजा वरची भक्ती या सर्व आठवणीन वर एक स्वतंत्र लेख लिहीन पुढे कधी  तरी

देशपांडे (वाळूंजकर) , शहाणे , नाईक बाई असोत किंवा D N देशपांडे , साखरे , मन्ठालकर, लोहार सर या आणि इतर अनेक शिक्षकांनी आम्हाला घडविले

हा छोटासा प्रयत्न त्या आठवणीना उजाळा देण्याचा !

बिपीन कुलकर्णी