"बिपीनची आई
"
लेखाच्या नावात
"श्यामची आई " नावाचे साधर्म्य असण्याचे कारण म्हणजे प्रत्येक आई
ही श्यामची आईच असते !
प्रेमाचा सुगंध, मुला करीता घेतलेले कष्ट , मुलाने मोठे होऊन नाव कमवावे या करीता केलेली
धडपड , केलेले संस्कार यात प्रत्येक
आई यशोदा बाई म्हणजे श्यामच्या आई पेक्षा कुठेच कमी पडत नसते,
यशोदाबाई श्यामच्या आई
झाल्या त्याला कारण श्याम हा पुढे जाऊन साने गुरुजी झाला .... आपण साने गुरुजी होऊ
शकलो नाही म्हणुन का आपल्या आई चे मोठे पण कमी होते ?
म्हणून हि आहे
"बिपीन च्या आई " ची गोष्ट .... आज ती ७४ व्या वर्षात पदार्पण करीत
आहे...योगायोग बिपीनचा आणि तिचा वाढदिवस पाठोपाठ ... तो ८ ऑगस्ट आणि ती ९ ऑगस्ट
!!!
आयुष्य हे कधीच सरळ
नसते..... त्या मुळे बिपीनचे आयुष्य फक्त
नागमोडी असेल तर आई चे आयुष्य
साक्षात रोलर कोस्टर...
सगळ्यांनाच सगळी सुखं
मिळत नसतात कारण हा निसर्गाचा नियम
आहे... त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात
काही दु:खं असणारच आता दु:खं कोणती असावीत
हे ठरविण्याचा अधिकार त्या नियतीचा..नियती काही
व्यक्तींच्या बाबतीत कठोर असते .... बालवयातच आपले अस्तित्व अधोरेखित करते ...
वयाच्या तिसर्या वर्षी
पितृ छात्र हरपले ... कुटुंब उघड्यावर पडले ... पण तिची आई म्हणजे बिपीनची आजी
जीने दुःख बाजुला सारून
कुटुंबाला परिस्थितीतुन बाहेर काढण्या करिता पदर खोचला आणि कुटुंबाला पुण्याला
घेऊन आली ... खानावळीत पोळ्या लाटल्या...
या ५ वर्षाच्या मुलीला आश्रमात
ठेवले ... पुढची १२-१३ वर्षे हीने पुण्यात "अनाथ हिंदू महिला आश्रमात "
राहून शालेय शिक्षण घेतले ते रेणुका स्वरूप (भावे स्कूल) मध्ये…
आश्रमात राहणे म्हणजे
साधे सोपे नक्कीच नव्हते ... पाचव्या
वर्षा पासून आश्रमाची झाड लोट , स्वयंपाकातील
कामे , कपडे धुणे या कामांना हातभार लावावाच लागत असे...
त्या वयात किंवा
पुढे या कामाचा कधी कंटाळा किंवा त्रास वाटला
नसेल का ? पण नियती जेंव्हा गरिबीचे
दान पदरात टाकते तेंव्हा त्रास , कंटाळा , चैन किंवा मौज असे शब्द त्या व्यक्ती च्या dictionary
मधून काढून घेत असते ...
प्रत्येकाच्या आयुष्यात
कोणाचे तरी अनंत उपकार असतात... प्रत्येक वेळेस कोणी व्यक्तीच असेल असे नाही... आज
बिपीनला तरी असे वाटते की "अनाथ हिंदु महिला आश्रम " ह्या वास्तू चे
स्थान त्याच्या आयुष्यात फार मोठे आहे ... कारण त्या वास्तू ने त्याच्या आईला दोन वेळेचे जेवण अविरत बारा
तेरा वर्षे कसलीही अपेक्षा न ठेवता दिले.... त्या वास्तूला दंडवत !!!
अकरावी झाल्या नंतर कुटुंब
औरंगाबाद ला स्थायिक झाले , तिचे औरंगाबाद ला
कॉलेज शिक्षण सुरु झाले ... मराठी BA
झाली , घराची थोडी फार आर्थिक जबाबदारी घेण्या करीता सरकारी नोकरीला
लागली... मग दोनाचे चार झाले ...
प्राध्यापक नवरा... संसाराची जबाबदारी म्हणून नोकरी सोडली...
संसारात मुले आली ,
पहिली अनु मग बिपीन आणि शेंडेफळ गोपी ...
सोलापूर सारख्या ठिकाणी
संसार , मुख्य घर औरंगाबाद म्हणून
सगळे सण वार करण्या करीता औरंगाबाद जाणे असे चालू असताना
अचानक सासूबाई चे निधन झाले.. जाबदारीत भर पडली .... लहान दिरांची लग्ने , जावांचे बाळंतपण अशा अनेक जबाबदाऱ्या बिनभोभाट पार पाडत
होती...
सासू बाईंच्या अचानक
निधनाने बिपीनचे वडील सैरभैर झाले होते ... ईश्वर या संकल्पनेला त्यांनी तिलांजली
दिली होती... पण हिची ईश्वरा वरची श्रद्धा अढळ होती ... स्वतः जरी नास्तिक असले
तरी वडिलांनी तिच्या देवधर्माच्या संकल्पनेला कधी आडकाठी आणली नाही...
दिवस जात होते ... मुले
मोठी होत होती ... अनु आणि गोपी तसे अभ्यासात हुशार ... वर्गात पहिले तीन नंबर कधी
चुकवले नाहीत , पण बिपीन ला
अभ्यासाची आवड कमीच ... खेळ किंवा इतर
गोष्टींचीच जास्त आवड… शिक्षक बहीण भावंडांची
तुलना करून आई कडे तक्रार करायचे .. ह्या माउलीला त्रास व्हायचा ... त्याला
अभ्यासाला घेऊन बसायची कधी मारायची , रडायची .... त्रास व्हायचा तिला .... पण त्या वयात बिपीन मध्ये श्याम इतकी परिपक्वता नव्हती त्या मुळे आई चे झुरणे
कळत नव्हते...
दिवसा वर दिवस जात होते
मुले थोडी मोठी होऊन शाळा कॉलेज मध्ये जायला लागली होती ... तेंव्हाची गोष्ट ... बिपीन
च्या वडिलांच्या कॉलेज मध्ये काही गोष्टी त्यांच्या तत्वांच्या विरोधी घडल्या आणि
अंतर्गत राजकारणात यांची नोकरी गेली ... कुटुंब हादरले ... वडील वरून जरी शांत
दिसत असले तरी मनात असंख्य वादळे चालू होती ... त्यांनी निर्णय घेतला या अन्यायाला
दाद मागायची .... मग ट्रिब्युनल , हाय कोर्ट अशा फेऱ्या सुरु झाल्या ...
तो साडेपाच वर्षाचा काळ
.... तिने काय केले...
तिची गजानन महाराजांवरची
श्रद्धा ... असंख्य उपास तापास , खडी साखरेचे
गुरुवार , पांढरे बुधवार , अवचित मंगळवार एक ना अनेक ... अनेक देवाना
साकडे घातले...
साडे पाच वर्षे साधी
साडीच काय पण विकत घेऊन बांगड्या पण घातल्या नाहीत... पण आम्हा मुलांना परिस्थिती
ची झळ बसू दिली नाही..
हिची श्रद्धा आणि
त्यांच्या तत्वांनी शेवटी विजय मिळविला ...
सार काही सुरळीत चालू
असताना नियतीच वागण आपल्याला जाणीव करून देत कि ह्या विश्वापलीकडे सुद्धा एक शक्ती
आहे ज्याच्या तालावर आपल आयुष्य चालू आहे...
मुले मोठी झाली , त्याची लग्ने झाली ... त्यांच्या संसारात पण
मुले आली ...
इतके दिवस मुलां करीता
देवाला साकडे घालत होती आता दुधावरच्या साई करीता... कदाचित आता त्या देवाला पण
हिच्या साकड्यांची सवय झाली असेल ...
मध्यम वर्गीय संस्कार
असल्या मुळे तिला वाटायचे आपल्या मुलांनी बँकेत नोकरी करावी ... पण आम्ही तिघांनीही
कधीच बँकेत नोकरीचा प्रयत्न केला नाही ... पण तिची इच्छा एका सुनेने म्हणजे बिपीनच्या
बायकोने पूर्ण केली ...
या ७४ वर्षात अनेक चढ
उतार आले ... आजारपणे आली ... सुख दुःखाचे प्रसंग आले ... अनु आणि गोपी मुळे जग
प्रवास झाला... पण प्रत्येक क्षणी तिची गजानन महारांची पोथी काही चुकली नाही ...
कदाचित हीच श्रद्धा
प्रत्येक प्रसंगात तारुन नेत असेल ...
हे सगळे असले तरी
आपल्याला मुद्देसुद बोलता येत नाही, स्वत:चं म्हणणं ठासून मांडता येत नाही, बरेचदा नमतं घ्यावं लागतं ह्याची काहींना जाणीव असते त्या पैकीच
ती एक ... पण ह्या मुळे काही तिचे अडले नाही ...
स्वभाव अतिशय हळवा ... व
पु म्हणतात तसे "रडणं म्हणजे
दुबळेपणाचं लक्षण नव्हे.मोकळेपणी रडायला धैर्य लागतं"
छोट्या छोटया गोष्टीत सुख
मानणारा स्वभाव ... वाचनाची प्रचंड आवड .. साक्षात अन्नपूर्णा ...
माणसाची श्रीमंती घरी
आलेल्या लोकांच्या चपलांच्या ढिगा वरून
ठरते असे म्हणतात ... त्या न्यायाने माझे
आई वडील नक्कीच कुबेराहून श्रीमंत !!!
७४ वर्षाचे म्हंटले तर
रोलर कोस्टर चे आयुष्य ... तिच्या भाषेत गजानन महाराजांनी सगळे निभावून नेलेले...
पण या श्रध्येला तिच्या कष्टाची , त्यागाची आणि
प्रचंड मेहनतीची जोड आहे ... आणि मुख्य लहान पणीच्या परिस्थितीची कटुता मनात कुठेही न ठेवता आणि स्वतः
सोसलेल्या दुःखा चे भांडवल न करता आयुष्याला सामोरे जाण्याचा तिचा स्वभाव साक्षात
नियतीला पण नतमस्तक व्हायला लावतो !!!
ही होती बिपीन च्या आई ची
छोटी गोष्ट ... बिपीन साने गुरुजी होऊ
शकला नाही म्हणून का बिपीनच्या आई चे महत्व कमी होते ?
बिपीन कुलकर्णी