Thursday, June 8, 2017

यूरोपायन ....



यूरोपायन  ....                                                                                                      ८ जून २०१६

केल्याने देशाटन  मनुष्याच्या अंगी शहाणं पण येते अशा अर्थाची एक म्हण आहे... शहाणंपण नक्कीच येते पण कुठल्या अर्थाने  ?

अस्मादिकांचा गेल्या काही  यूरोप दौऱ्यातून आलेल्या अनुभवाचा हा लेखाजोगा  ...

लहान पणी  इतिहासात  शिकलेल्या फ्रेंच राज्यक्रांती , दुसरे महायुद्ध, मुसोलिनी , हिटलर , नेपोलियन या माहितीचा पुढील आयुष्यात किती उपयोग झाला हे आज पर्यंत कळाले नाही , पण त्या वाचना  मुळे  एकूणच फ्रान्स , जर्मनी, इंग्लंड  आणि  इतर युरोपिअन देश पाहण्याची उत्सुकता मात्र लहान पणा पासून मनात निर्माण झाली होती....

आमच्या सुदैवाने ते योग जुळून आले ... आणि याची डोळ्या यूरोप पहिला ....

साधारण पणे यूरोप मधील लेखात तेथील स्वच्छता , रहदारी चे नियम , शिस्त अशा काही गोष्टींवर लिहिण्याचा भर असतो , ते लिहून आणि वाचून चोथा झाले आहे .... त्या वर परत काही लिहिणे म्हणजे सेट मॅक्स चॅनेल वर "सूर्यवंशम" पाहण्या सारखे आहे... त्या मुळे ते विषय सोडून यूरोप ची दुसरी बाजू लिहिण्याचा हा प्रयत्न !! कुठलाही देश पाहताना तो उघडया डोळ्याने पाहावा ....

आपल्या कडे म्हणजे भारतात यूरोप या खंडाचे अतिशय उद्दात्तीकरण केले आहे , गेला बाजार यश चोप्रा चे सिनेमे असतील किंवा आजचे करण जोहर, शाहरुख चे सिनेमे काय किंवा एकूणच बॉलीवूड ने त्याला पृथ्वी वरचा स्वर्ग ठरविले आहे    ... हे देश अतिशय संपन्न आणि सुंदर आहेत यात दुमत असायचा प्रश्नच  नाही ... पण संपन्नता आणि सुंदरता म्हणजेच  स्वर्ग का?

कुठल्याही ट्रॅव्हल एजेंट बरोबर, सकाळ दुपार महाराष्टीयन श्रीखंड पुरी चे जेवण करून पाहिलेला यूरोप आणि कोणी काही  दिवस ऑफिस च्या कामा करिता, आणि त्याच बरोबरीने पर्यटन करीत  फिरलेला यूरोप याची बरोबरी होऊ शकत नाही, याची दोन कारणे , एक म्हणजे  तुम्ही जेंव्हा एखाद्या नामांकित कंपनी बरोबर फिरता तेंव्हा एकूणच कुठल्याही गोष्टी करिता झटावे लागत नाही, कारण  या सगळ्या झटण्याचे पैसे आधीच भरलेले असतात , दुसरी महत्वाची गोष्ट  खऱ्या यूरोप चे इंग्लिश मध्ये म्हणतात ते Exposure या ट्रॅव्हल कंपनी बरोबर फिरताना मिळत नाही .... आणि मग जे आहे ते सगळेच छान छान वाटायला लागते. .....

मग सुरु होते तुलना भारत किती मागासलेला , यूरोप किती पुढारलेला ? खरेच अशी आहे का परिस्थिती ? गेल्या काही  ट्रिप मध्ये मला कळलेला यूरोप तर नक्कीच तसा नाही ...

परत एकदा सांगतो त्याची सुंदरता शब्दात व्यक्त करण्याच्या पलीकडे आहे ,  ... पण जेंव्हा मी डोळस आणि निपक्ष पणे विचार केला तेंव्हा मला यूरोप थोडा वेगळा दिसला...

पु ल ,म्हणून गेले तसे त्यांची द्राक्ष संस्कृती आणि आमची रुद्राक्ष संस्कृती .... त्या मुळे संस्कृती मध्ये खूप मोठा फरक आहे आणि तो असणारच...
आमची संस्कृती !!अतिथी देवो भव !!   त्यांची संस्कृती कदाचित  !!अतिथी दानवो भव !!! या वाक्यात अतिशयोक्ती वाटू शकेल पण परिस्थिती जवळपास  तशीच आहे ....  

कुठलाही देश कसा आहे याची प्रचिती तीन ठराविक गोष्टीवरून ठरते कारण या गोष्टी टाळून देश बघूच शकत नाही... हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स , पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि  त्या देशाचे सर्वसामान्य नागरिक
परदेशात गेल्या नंतर पहिला संबंध येतो तो हॉटेल्स चा ....

भारतात  हॉटेल Industry हि Hospitality industry म्हणून ओळखली जाते , hospitality या शब्दाचा अर्थ होतो आदरातिथ्य आणि भारतातील  प्रत्येक हॉटेल मध्ये आदरातिथ्य होतेच ... हा माझाच नाही तर प्रत्येकाचा अनुभव असतो .... आणि त्यातून हॉटेल जितके जास्त तारांकित तेव्हढे जास्त आदरातिथ्य हा अलिखित नियम आहे.... कारण शेवटी हॉटेल्स पैसे त्या करिताच घेत असतात ना ?

पु ल च्या शब्दात सांगायचे तर यूरोप मधील  हॉटेल व्यवसायिकां करिता हॉटेल मधील सर्वात दुर्लक्ष करण्याची कुठली गोष्ट असेल तर ती ग्राहक !!! माझा हा अनुभव पंचतारांकित हॉटेल्स आणि बरोबरीने तिकडे जे Family owned  हॉटेल्स , म्हणजे एखादे कुटुंब चालविते त्या हॉटेल्स चा आहे ...

या लोकांची फारच माफक अपेक्षा असते .... आमची भाषा तुम्हाला येत असावी आणि आम्ही जे खातो तेच तुम्ही खावे. उद्या जर का आम्ही फ्रांस  मध्ये गेलो तर त्यांच्याशी फ्रेंच मध्ये बोलावे किंवा जर्मनी मध्ये जर्मन .... आम्हाला जी इंग्लिश येते ती फक्त इंग्लंड मध्ये वापरावी एवढीच त्यांची अपेक्षा .... असे वाटते कि आपल्या शाळां मध्ये मातृभाषेच्या बरोबरीने फ्रेंच , जर्मन , हिबरू पासून लॅटिन पर्यंत सगळ्या भाषा शिकवावाव्यात न जाणो  मुलाला पुढील आयुष्यात कुठे जावे लागले तर....   यातला विनोदाचा भाग सोडला तर खरेच आम्ही फार भाबडे 
आहोत आम्हाला वाटते इंग्रजी येते म्हणजे आम्ही जगात कुठेही सहज वावरू शकतो ....

तसेच त्यांची खाद्य संस्कृती वेगळी असणे सहाजिक आहे , आमची अपेक्षा नाही कि जेवणात आम्हाला अळूचे फदफदे द्यावे किंवा बटाटा रस्सा द्यावा .... पण जर का ग्राहक शाकाहारी असेल तर तुमच्या कडे तुमच्या पाककृतीतील एखादा शाकाहारी पदार्थ नसावा का ? रेस्टॉरंट्स मध्ये व्हेजिटेरियन माणूस म्हणजे अंगावर पाल पडल्या प्रमाणे  बघण्या सारखे  काय आहे त्यात ? तिथल्या हॉटेल्स मधील बुफे मध्ये आमची परिस्थिती लहान पणी वाचलेल्या गोष्टीतील करकोच्या सारखी होते.

तुमची संस्कृती काळ्या कॉफी ची आहे म्हणून का तुम्ही इतरांनी काळी कॉफी प्यावी अशी अपेक्षा करावी का ? बेधडक ग्राहकांना काळी कोफी दिल्यावर  मग अंतू बर्वा सारखे  विचारावेसे   वाटते " समस्त पॅरिस मधील म्हशी गाभण काय रे ?"

उद्या तुम्ही आमच्या देशात आल्यावर आमचे अमृततुल्य चहा वर  प्रेम आहे म्हणून आम्ही  तुम्हाला विलायची जायफळ घातलेलाल चहा पाजला तर चालेल का ? पण आम्ही तसे करत नाही , कारण आपल्या आवडी निवडी इतरांवर लादायची आमची संस्कृती नाही .....

आपल्या देशाचा विचार केला तर , कुठल्याही पंचतारांकित हॉटेल चा जो बुफे असतो तिथे प्रत्येक देशाचा विचार करून , कुठल्याही देशाची व्यक्ती उपाशी तरी राहणार नाही या पद्धतिने पदार्थ नक्कीच ठेवलेले असतात... कारण आमची संस्कृती अतिथी देवो भव !!

९०% लोकांना इंग्लिश भाषा  समजत नाही ... नुसती समजत नाही तर तिचा द्वेष  करतात .... बेधडक आपल्याशी त्यांच्या भाषे मध्ये बोलतात  , आपण इंग्लिश मध्ये सांगायचा प्रयत्न केला तर  " नो इंग्लिश " म्हणून मोकळॆ होतात !!! दुसरे महत्वाचे सगळी कडे बोर्डस जे असतात ते त्यांच्या भाषे  मध्ये ... आपण काय वाचणार कप्पाळ !! या परिस्थितीत आपल्याला  प्रत्येक  गोष्टी करिता तेथील  सहकार्या वरच  अवलम्बुन राहावे लागते...
त्या देशाची पब्लिक ट्रान्सपोर्ट अतिशय सुंदर आहे यात दुमत नाही , ट्रेन किंवा मेट्रो नेटवर्क खूप विचार करून केलेले  आहे ... पण परत तेच आपण जेंव्हा जातो तेंव्हा भाषेची अडचण ...

थोडक्यात काय तर त्यांच्या दृष्टीने जगाचा नकाशा त्यांच्या देशा पासून सुरु होऊन तिथेच संपतो .... 

या उलट आमच्या देशात बहुसंख्य लोक तोडके मोडके का होईना इंग्लिश बोलू शकतात , त्या मुळे हे लोक इकडे आल्यावर सहजतेने वावरू शकतात.... आणि आम्ही तिकडे तोंड असून मुके आणि कान असून बहिरे.... शेवटी आमची संस्कृती आहे वसुधैव कुटुम्बकम !!!

लोकांचा एक  गैरसमज आहे कि यूरोप मधील देश संपन्न असल्या मुळे "भिकारी" किंवा “गरिबी” हा प्रकार तिथे नसावा ......आमच्या कडे लेंगा किंवा मळके कपडे घालून  हार्मोनियम वर गाणे वाजवत भीक मागणाऱ्यांचे चित्र रेल्वे प्रवासात दिसते .... तिकडे  लेंग्या ऐवजी जीन्स पॅन्ट असते आणि हार्मोनियम ऐवजी अकार्डिअन गळ्यात अडकवून गाणे म्हणत भीक मागणारे लोक ट्रेन मध्ये जागोजागी दिसतात ……रस्त्यावर लहान मुलांना घेऊन भीक मागत बसलेले लोक पण वर्दळीच्या ठिकाणी दिसतात....

एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी  गरिबी हा शाप देशाला नसून मनुष्याला असतो मग तो जगाच्या पाठीवर कुठेही असो.... त्या मुळे गरिबी काय किंवा भिकारी या  असल्या समस्या तिकडे पण आहेतच.

अजून एक महत्वाची गोष्ट प्रकर्षाने जाणवली तिकडील देशात धूम्रपानाचे प्रमाण अतिशय जास्त आहे , याचा अर्थ आपल्या कडे फार कमी आहे असा नाही , तर आपल्या कडे गेल्या काही वर्षात जागरूकते मुळे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाचे प्रमाण अतिशय नगण्य आहे , त्या उलट तिकडे जागो जागी रस्त्यात , स्टेशन्स , हॉटेल्स मध्ये सर्रास मोठ्या प्रमाणावर धूम्रपान चालू असते ..... रस्ते अतिशय स्वच्छ असले तरी जागोजागी सिगारेट्स ची थोटके मात्र आवार्जून दिसतात ... एवढ्या स्वच्छतेत तेव्हढाच काय तो कचरा ....... 

हे मी सगळे लिहिले म्हणजे यूरोप फारच वाईट असे म्हणायचा उद्देश नक्कीच नाही , नाण्याला दोन बाजू असतात .... साधारणतः परदेशात गेल्या नंतर आपण फक्त एक बाजू बघून आपली मते बनवतो...

दुसरी बाजू संपन्नता , सुंदरता ह्या बाबतीत खूप लिहिले गेले आहे , त्या बरोबरीने त्यांनि जपलेला ऐतिहासिक वारसा खरेच आपण शिकण्या सारखे आहे....  

या लोकांना एकच सांगावेसे वाटते , तुमचे देश इतके सुंदर आहेत ते पाहण्या करिता आमच्या सारखे पामर , परवडत नसताना युरो मध्ये खर्च करून येतात ... आपल्या कोषातून बाहेर पडून दुसऱ्या देशातून येणाऱ्या लोकांचा थोडा तरी विचार करा .... तुमच्या देशाच्या सीमे पलीकडे पण अजून देश आहेत...

तुम्हाला इंग्लिश भाषा बोलायची नसेलतर हरकत नाही पण मग भाषेविना लोकांची मने जिंकण्याची कला तरी शिकून घ्या....

शेवटी एकच  पोटोबा वखवखता ठेवून तुमच्या देशाचा विठोबा आम्ही बघणार तरी कसा ?



बिपीन कुलकर्णी