Saturday, February 4, 2017

बखर एका घराण्याची ...


बखर एका घराण्याची ...                                                                                     ४ फ्रेब्रुवारी २०१७

निजाम राजवटीत हैदराबाद स्टेट म्हणून ओळखणाऱ्या संस्थानातील औरंगाबाद जिल्हा , तेथील  पैठण तालुक्यातील  ... बोकूडजळगाव हे २००० लोकसंख्येचे आमचे  गाव  !!

त्या मुळे आम्ही बोकूडजळगावकर कुलकर्णी... आम्ही बहुतेक जण कुलकर्णी आडनाव लावतो , पण क्वचित काही जणांनी "दप्तरी" किंवा "भारद्वाज" अशी आडनावे लावली ... राज्यकर्त्यांचे दप्तर संभाळणारे म्हणून आम्ही दप्तरी , तसेच गोत्र भारद्वाज म्हणून आडनाव लावले भारद्वाज...  

आम्ही भारद्वाज गोत्रीय  ,देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण  ... 

कोणी म्हणतात  आम्ही मूळचे इंदोरचे, कोणाचे मत आम्ही दौलताबाद चे.... तार्किकदृष्ट्या विचार केला तर आम्ही दौलताबाद चे असू शकतो , कारण आमच्या गावापासून दौलताबाद तसे जवळ आहे एकच जिह्वा ... 
कधी आणि का  इथे  आलो याची नक्की माहिती उपलब्ध नाही ...जुनी मंडळीं  बहुतेक पोटा पाण्याच्या शोधात आली असावित.

आमच्या गावाची वाट खरे तर आज पण खडतर आहे ....  शासन आघाडी चे असो किंवा युती चे हि वाट दुर्लक्षितच  ..... असे असताना १७ व्या  किंवा १८ व्या शकतात या गावात येऊन स्थायिक होण्याचे धाडस दाखविणाऱ्या पूर्वजांना खरेच दंडवत !

म्हणतात ना ,
                             
                             खळगी भरण्या पोटाची,
                             वणवण होते जीवनाची।
असो ....

घराण्याचे मूळपुरुष  यादवराव .... त्यांच्या पासून मोजले तर माझी अकरावी  पिढी ...
कुल दैवत श्री लक्ष्मी नरसिंव्ह ...

सातव्या  पिढीतील काही लोक जळगाव हुन स्थलांतर करून औरंगाबाद जवळ सातारा नावाचे खन्डोबाचे संस्थान आहे , तिथे स्थायिक झाले... त्या मुळे त्यांची पुढची पिढी सातारकर कुलकर्णी म्हणून ओळखली गेली.
जळगावकर आणि सातारकर नावे जरी वेगळी असली तरी एकच कुलकर्णी... सुख: दुःखा च्या प्रसंगी एकत्र येणार.... सुखात एखाद्या वेळेस नसतील पण दुःखा त कधीच चुकणार नाहीत...

पहिल्या सात  पिढ्यांची जास्त माहिती उपलब्ध नाही , आठवी  पिढी म्हणजे माझ्या  पणजोबांची ... 
जळगाव मधील जमीनदारी या भांवंडा कडे होती , खूप प्रतिष्ठा मिळविली, गावातील तंटे बखोटे सोडवणे , तालुक्याच्या ठिकाणी निजाम राजवटीतील सरकार दरबारी लोकांची अडलेली कामे पूर्ण करून देणे तसेच  मुले , सुना ,नातवंडे   यांच्या संसाराकडे  कडे लक्ष देणे ...लेकीच्या संसाराला हातभार लावणे ...अशी एक ना अनेक ....
सावकारी , जमीनदारी , शेती आणि  अनेक व्यवसाय केले... तालुक्याच्या ठिकाणी त्या काळात कपड्याचे दुकान , दाराशी गाडी , गावात चौसोपी वाडे , सगळी कडे मान मताराबा सगळे मिळवले.. पण  ती पिढी तशी अल्पायुषी ठरली... 

लक्ष्मी संतुष्ट होती पण नियती नव्हती... नियती जाताना लक्ष्मी ला घेऊन गेली...

त्या नंतरच्या पिढीने कष्टात दिवस काढले आणि पुढच्या पिढीला चांगले दिवस दाखविले...
म्हणतात ना प्रत्येक तीन पिढी नंतर लक्ष्मी येते आणि जाते... कदाचित त्या मुळेच आम्ही आज चांगले दिवस पाहात असू...

आमच्या घराण्याचे सोवळे ओवळे फार कडक ... देवात श्री नरसिह कुलदैवत... वर्षात तीन नवरात्रे.... कुलदैवत म्हणून नरसिंहाचे, त्या बरोबरीने  देवीचे आणि खंडोबाचे नवरात्र ... अजूनही वर्षातून प्रत्येक सणाला देवाचा नैवेद्य सोवळ्यातून असतो...  खंडोबाच्या "तळी आरती " ची प्रथा आहे .... 

औरंगाबाद जवळ सातारा म्हणून एक खाडोबाचे जागृत देवस्थान , तिथला आमचा  खन्डोबा.... खोडेगाव म्हणून एक आडवळणाने गाव तेथील देवी हि  आम्हा कुलकर्ण्यांची देवी .....  पण कुलदैवत नरसिंह नक्की कुठला हे आम्हाला ठाऊक नाही ... पुढच्या पिढीने त्याचा शोध घेण्याची आता गरज आहे...

मुंजा ह्या दैवताचे चे महत्व आहे  ... शुभ कार्या नंतर गावातील मुंजाला  नैवेद्य दाखविण्याची पूर्वा पार प्रथा .... कुळ धर्म कुळाचाराला देवा बरोबरीने मुंजाचा नैवेद्य वाढण्याची पद्धत अजूनही आहे...

तसेच नवीन बाळाच्या जन्मा नंतर गावातील सटी आई ला दर्शना ला नेण्याची परंपरा...

तसे आम्ही पुरोगामी विचार सरणीचे लोक , पण त्याच वेळेस रूढी आणि परंपरा पाळताना कुठलाही कमी पणा न मानणारे !!  प्रत्येकाची श्रध्येची काही स्थाने असतात तर आमची हि श्रध्येची स्थाने...

नवव्या पिढी पासून लोक नोकरी करीता २० किलोमीटर अंतरा वरील शहरात म्हणजे औरंगाबाद ला स्थायिक होऊ लागले, प्रत्येक कुटुंबाची गावाशी नाळ अजूनही जोडलेली...

तसे आम्ही कुलकर्णी पांढरपेशी , बहुतेक जण इमाने इतबारे नोकरी करणारे, पण प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात तसे  ... काही जण व्यवसायात यशस्वी  झाले.. ... 

जळगावकर जळगाव पासून थेट अमेरिकेपर्यंत वेग वेगळ्या ठिकाणी स्थायिक झाले...

नोकरी म्हणाल तर  तलाठया पासून, प्राध्यापका पर्यंत , बँके पासून मंत्रालया पर्यंत, पोलिसा पासून कोर्टा पर्यंत कुठलाही विभाग राहिला नसावा ....
काहींनी स्वातंत्र्या करिता कारावास भोगला....  

एक आहे जळगावकरांच्या लेकी मुलां पेक्षा थोड्या खमक्या ... मुले तशी (प्रत्येक पिढीतील) मुलींपेक्षा थोडी भोळिच ... मुले जबादारी ला चुकली नाहीत आणि मुलींनी कधी अपेक्षेचे ओझे टाकले नाही...

असो,

दुःखात खांदयावर हात ठेवणारा कोणी नसावा किंवा सुखात हातात हात घेणारे कोणी नसावे या पेक्षा करंटे पण नसते .. .....ते करंटे पण आमच्या कुठल्याच पिढीच्या  वाट्याला आले नाही ... ग्राम दैवत भीमाशंकर महाराज कृपा दुसरे काय  !!! 

पिढ्यान पिढ्या हा वारसा असाच चालत राहावा हीच त्या श्री लक्ष्मी नरसिंहा चरणी प्रार्थना !!

बिपीन कुलकर्णी