के ई एम वार्ड नंबर
४…. १८ मे २०१५
शेवटी ४२ वर्षाची झुंज
अपयशी ठरली…
खरेच अपयशी होती का झुंज ?
अरूणा शानबाग
, कर्नाटकातील हळदीपूर सारख्या आड वळणाच्या
ठिकाणाहून एक तरुण मुलगी आयुष्याची स्वप्ने पाहण्या करिता मुंबईत येते काय आणि नंतर
४२ वर्षे कोमा मध्ये आयुष्य काढते काय… नातेवाईक , भावी नवरा पाठ फिरवून निघून जातात… रक्ताच्या नात्यांनी
पाठ फिरविली असताना KEM चे कर्मचारी आणि परिचारिका
४२ वर्षे सांभाळ करितात… तिचा वाढ दिवस नित्य नेमाने साजरा करितात …
सगळेच अतर्क्य !!
फ़्लोरन्स नाईटेंगेल
म्हणजे प्रत्येक परिचारिकेची आदर्श , त्यांच्या पावलावर पाउल ठेवून असंख्य मुली परिचारिका
होण्याचे स्वप्न पाहतात , त्या पैकीच एक अरुणा शानबाग !
१९७३ ला शिक्षणा करिता
मुंबईच्या परळ मधील KEM ला प्रवेश घेतला , त्याच वेळेस लग्न पण ठरले … सामान्य मुलीच्या
बाबतीत जसे घडते तसे तो पर्यंत आयुष्य होते … पण पुढे नियती ने काही वेगळे वाढून ठेवले
होते .
२७ नोवेंबर १९७३ चा
दिवस…
कामावर जाण्याची लगबग चालू होती , हॉस्पिटल च्या बेसमेंट मध्ये कपडे बदलत असताना …
सोहनलाल नामक वार्ड बॉय …. वार्ड बॉय कसला नराधम तो … त्याने पाशवी बलात्कार केला
… एवढे करून थांबला नाही तर , त्यांच्या गळ्यात लोखंडी साखळीचा फास अडकविला…. क्षणात
होत्याचे नव्हते झाले… मेंदू ला ऑक्सिजन पुरवठा न झाल्याने त्या कोमात
गेल्या …
२७ नोवेंबर १९७३ ते
१८ मे २०१५ म्हणजे ४२ वर्षाचा प्रवास …
नातेवाइका नि पाठ फिरविली
, समाजाने दुर्लक्षित केले , सरकारनी फक्त सहानभूती दाखविली आणि आमच्या मेडिया ने ब्रेकिंग
न्युज च्या दृष्टीने पहिले !!
खरे कौतुक आहे KEM
च्या स्टाफ चे …. एक नाही दोन नाही तब्बल ४२ वर्षे सांभाळले … ४२ वर्षात किती पिढ्या
येउन गेल्या असतील , किती लोक बदलेले असतील , अरुणांच्या बरोबर काम केलेल्या लोकांना
त्यांच्या बद्दल सहानभूती वाटणे साहजिक आहे , पण ते सगळे लोक तर कधीच निवृत्त झाले
असतील ना ? नंतर च्या पण पिढीला त्यांची सेवा करावी वाटली यातच सगळे आले …
१९८० चा काळ , मुंबई
महानगर पालिकेने अरुणा ना दुसरी कडे हलविण्याचा निर्णय घेतला ? का तर अरुणा सारखा एक
रुग्ण ७ वर्षे हॉस्पिटल मध्ये जागा अडवून बसला आहे ? अजब न्याय … पण या निर्णया विरुद्ध
सगळ्या परिचारिका संपावर गेल्या …. आणि त्यांच्या एकजूटी पुढे शासन वाकले… निर्णय झाला त्यांना न हलविण्याचा ….
परत २०११ साल आले
… कोण एक पत्रकार त्यांनी कोर्टा मध्ये अरुणा ना दयामरण मिळावे अशी याचिका केली ??
आम्हाला काय अधिकार त्यांना दयामरण मागण्याचा …काय आम्ही अशी सेवा केली त्यांची किंवा
अशा काय खस्था खाल्ल्या त्यांच्या यातना कमी होण्या करिता ?
मारणाऱ्या पेक्षा वाचविणारा
मोठा असतो असे आपण म्हणतोच ना ?
कोर्टा चा निकाल अपेक्षित
लागला , दया मरणाची याचिका फेटाळली गेली ….
केवढा आनंदोस्तव झाला
KEM मध्ये …. अरुनांच्या ओठाला साखर लावली गेली , परिचारिकांनी पेढे वाटले …. कोण होत्या
त्यांच्या या परिचारिका…पण दुर्दैवाने अरुणा हा सगळा आनंद बघू किंवा
समजू शकत नव्हत्या …
त्यांना रोज अंघोळ
घालणे, स्वतः च्या घरून त्यांच्या करिता डबा करून आणणे , त्यांना मासे आवडतात हे आठवणीने
लक्षात ठेवणे, त्यांना रेदिओ वर संगीत ऐकविणारे आणि सेवा करणारे सगळे कर्मचारी आणि परिचारिका आज
खरेच पोरक्या झाल्या …
ईश्वर त्यांच्या आत्म्याला
सद्गती देवो हीच प्रार्थना !!
बिपीन कुलकर्णी