अभागी १२ एप्रिल २०१५
तिला मी पहिल्यांदा कधी पाहिले ते नक्की आठवत नाही , खूप वर्षे झाली…. सत्तर च्या
दशकात कधी तरी असेल …तेंव्हा मी फार लहान होतो.
त्यावेळेस तिचे वय असेल ३५-४० वर्षे
सावळा रंग , बारीक काटक बांधा , आवाज किंचित चिरके पणा कडे झुकणारा,
केस मागे बांधलेले ,नऊ वार साडी , बहुतेकदा हिरवी किंवा निळी , चप्पल हे श्रीमंतीचे
लक्षण हे चोचले तिला परवडणारे नव्हते त्या मुळे कायम अनवाणी पाय.
गेल्या ३०-३५ वर्षात राहणीत तसा काही फरक पडलेला नाही, पण आता वयोमाना
मुळे चेहेर्यावर सुरुकुत्या आणि पाठीत वाकलेली,
सकाळी ८. ३० च्या ठोक्याला आमच्या घराच्या मागच्या दाराला हजर,तिची यायची वेळ झाली कि आई , काकू आमच्या दुसर्या
चहाच्या वेळेस तिचा पण चहा टाकून ठेवणार.
त्या काळी घर काम करणाऱ्या बाईला " मावशी" म्हणायची
पध्दत नव्हती , सरसकट सगळ्या घरात काम करणार्या बायकांना नावाच्या मागे बाई लावून बोलवायची
पद्धत, त्या मुळे आमच्या कुटुंबाची हि शांताबाई.
शांताबाई जिने ३५ एक वर्षे आमच्या घरी धुणे भांड्याची कामे केली.
आमच्या औरंगाबाद च्या घराचे जेंव्हा बांधकाम चालू होते, तेंव्हा
हि तिथे बांधकामावर कामगार म्हणून कामाला होती , नंतर आम्ही राहायला आल्यावर ती घरकामाला
येऊ लागली …किति काळ काम केले असेल तिने ?
एका ओळीत सांगायचे तर " आम्हाला जन्मा नंतर अंघोळी घालण्या
पासून थेट आमच्या मुलाच्या जन्मा पर्यंत"
आमच्या घरातील चार पिढ्या पहिल्या तिने, माझ्या आजोबांपासून माझ्या
मुला पर्यंत !
पूर्वी च्या काळी घर काम करणाऱ्या बायका एक तर परितक्त्या किंवा
विधवा , आज परिस्थिती खूप बदलेली आहे, या
बायकांचे राहणीमान, विचार बदलेले आहेत… हि एक समाजाच्या
दृष्टीने खरेच चांगली गोष्ट आहे
तर शांताबाईला नवर्याने टाकलेली, पदरात २ मुले आणि एक मोठी मुलगी
टाकून नवर्याने दुसरा संसार मांडला …. खचून न जाता तिने संसारा चा गाडा
ओढायला सुरुवात केली.
आमच्या बरोबर इतर काही घरांची कामे सुरु केली….
तिचे आणि आमचे ऋणानुबंध असे काही जुळले कि ती आमच्या घराची एक होऊन
गेली.
आमचे आजोबा ज्यांना नाना म्हणत असू ते देव माणुस ! त्यांच्या भारदस्त वागण्या मुळे शांताबाईला जो मान द्यायला पाहिजे तो आमच्या घरात
शेवट पर्यंत दिला गेला…...घरातल्या प्रत्येक लग्न मुंजी किंवा इतर कुठल्याही कार्यात,
तिचा "आहेर" तिच्या आवडीने घेणे हि एक जणू प्रथाच,
" नाना मला पाण्याचा पीप घेवून द्या " किंवा " मला
स्टील चा हंडा घेवून द्या " हे ती हक्काने सांगू शकत होती तसेच आपला शब्द वाया
जाणार नाही याची खात्री होती.
दिवाळी बोनस घरकाम करणार्यांचा
हक्क तेंव्हा झाला नव्हता , पण आजोबा सारखे काही लोक आपली जबाबदारी समजत होते ….टाळी
एका हाताने वाजत नसते या नियमा मुळेच कदाचित इतके वर्षे आमच्या घरी काम केले असेल.
आमच्या घराच्या जवळच झोपडपट्टीत तिचे घर ,मुख्य रस्त्या पासून जाणारी
एक चिंचोळी गल्ली , एकाला एक लागून बसक्या खोल्या … घर म्हणजे अंधार्या २ खोल्या, आत एक पलंग , थोडी फार भांडी … पावसाळ्यात सगळी
कडे पाणी साचणार , उन्हाळ्यात चारी बाजूचे
पत्रे तापणार , थोडे वादळ झाले कि पत्रे उडून जाणार…. या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत तिचे
घट्ट पाय उभे राहणे पाहून कदाचित निसर्ग पण चकित होत असेल… शेवटी गरीबाचा
वाली परमेश्वरच !
या सगळ्या परीस्थित मुली चे लग्न ठरविले , पहिली पत्रिका देवून आजोबांच्या
पायावर डोके ठेवले , आई आणि काकूंनी आहेर केला आणि यथासांग लग्न पार पडले,
नव्याचे नऊ दिवस झाल्या नंतर दुर्दैवाने आई च्या बाबतीत जे घडले
तेच मुलीचे झाले …. दोघीनाही नियतीचा शाप असावा "पतिसुख " न मिळण्याचा.
माहेरी आल्या नंतर शांताबाई च्या बरोबरीने सुमन घरोघरी कामे करू
लागली.
दोनही मुलांनी शिकावे हि तिची इच्छा , पण आजूबाजूच्या परिस्थितीने
जे होऊ नाही ते झाले आणि मुले भांडणे , मारामार्या
यात अडकत गेले ,,,,कधी ती मुलांना आमच्या घरी घेवून येत असे , वडील आणि काकांनी चार
समजुतीच्या गोष्टी सांगाव्यात अशी तिची अपेक्षा असे …. पण किती जरी समजावले तरी पालथ्या
घड्यावर पाणी !
तिचा नवरा ज्याने दुसरा संसार मांडला , दारूच्या आहारी गेल्या नंतर बायकोने घरा बाहेर काढले…. दारोदार
फिरत शेवटी एक दिवस हिच्या आश्रयाला आला … शांताबाईने हि मन मोठे करून त्याला ठेवून घेतले… कालाय तस्मै नम : !
माझे काका डॉक्टर , त्या मुळे सगळ्या छोट्या मोठ्या आजारपणाला तिच्या
भाषेत औषधपाणी त्यांच्या कडेच… मोठे काही आजारपण असेल तर सरकारी दवाखान्याशिवाय पर्याय नव्हता…
दिवसावर दिवस जात होते, , मुलगा छोट्या मोठ्या नोकर्या करत होता
…
मुलाचे लग्न ठरले तेंव्हा परत घरी आली , आनंदाने पत्रिका दिली, आजोबांच्या
पायावर डोके ठेवले , आई काकू कडून आहेर झाला …खुशित होती…. आता कष्टातून
सुटका होऊन बरे दिवस दिसणार होते.
मुलाचे लग्न झाले …. म्हातारी स्वप्ने पाहू लागली … पण तिला बिचारीला
ज्युइश म्हण माहिती नव्हती
" तरुण जेंव्हा लग्न करतो , तेंव्हा प्रथम तो आईशी
घटस्फोट घेतो "
आणि त्या प्रमाणेच झाले …सासू सुनेचे पटेना, मुलाने बायकोची बाजू
घेवून आई ला घरा बाहेर काढले…रडली -पडली पण काही उपयोग झाला नाही…
पुनश्च हरी ओम म्हणत परत कामाला सुरुवात केली ….
दिवसा वर दिवस जात होते पण नशीब काही बदलत नव्हते… वयोमाना मुळे
हळू हळू कामे बंद केली , अधून मधून घरी भेटायला येणे चालू असायचे.
आमचे आजोबा गेल्या नंतर धाय मोकलून रडली " गेला ग म्हातारा….
" म्हणत खूप रडत होती.
मध्यंतरी तिची मुलगी सुमन पण गेल्याचे कळाले ….
काय नशीब असते ना एखाद्याचे…
जगात अशा खूप शांताबाई आहेत, नवर्याने टाकलेल्या
, मुलांनी घरा बाहेर काढलेल्या…आयुष्याशी कायम झगडत असणाऱ्या …. ते पण विना तक्रार …
छोट्या छोट्या
गोष्टींची तक्रार हे आम्हा मध्यम वर्गीय पांढरपेशी लोकांचे काम …….
देव सुख वाटत असताना तिथे पण हि अशीच मागील दारी धुणी भांडी तर करीत नसेल ना ?
सुखी तर म्हणता येणार नाही, पण देव तिला उदंड आयुष्य देवो हीच अपेक्षा !
-----------------
बिपीन कुलकर्णी