१६ सप्टेंबर २०१२
महारथी ,दानविर,
कौतेय, सूर्यपुत्र, अंगराज अशा एक ना अनेक उपाध्या मिळालेले महाभारतातील व्यक्तीचित्र...महाभारतातील
कर्णाचे नेमके स्थान काय? नायक का खलनायक?हि व्यक्तीरेखा महाभारतीतील शोकांतिका...आणि
शोकांतिकेच्या नायकाला अजरामर करायची एक परंपरा, त्या मुळे कर्ण महाभारतातील अनेक नायका
पैकी एक ठरतो.
अर्जुनाच्या बरोबरीने
ज्याची धनुर्विद्या होती असा असामान्य धनुर्धर , सूर्याचा निस्सीम उपासक , थोर दानशूर
, मातृ पितृ भक्त , हेवा वाटावे असे सुंदर आणि तेजस्वी रूप , धर्म आणि युद्ध शास्त्र
पारंगत असा तो कर्ण!!ज्याचा जन्म कवच कुंडला सहित झाला...जो साक्षात सूर्याचा पुत्र..अशा
अंग देशाच्या राजाची शोकांतिका का झाली??
सामान्य वाचकाला
कर्णा बद्दल प्रचंड सहानभूती वाटते, त्याला कारणेही तशीच,
१. मातेने जन्मतः
नकळत केलेला अन्याय.
२.सुत पुत्र म्हणून
हिणाविला गेलेला एक क्षत्रिय
३. अर्जुन प्रेमा पोटी द्रोणानि ब्रम्हास्त्र नाकारलेला एक महारथी
४. द्रौपदी स्वयंवरात
झालेला अपमान न विसरलेला सूतपुत्र
५.साक्षात इंद्राला
कवच कुंडले दान करणारा दानवीर
जो प्रती दिन स्नाना नंतर सूर्याचे उन पाठीवर घेवून पाठ तापे पर्यंत सूर्याची उपासना
करत असे..... सूतपुत्र म्हणून अवहेलना होत असताना, परम मित्र दुर्योधनाने दिलेले
"अंगराज" पद आणि त्या नंतर केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून आयुष्यभर निभावलेली
मैत्री... अशा अनेक अकल्पित घटनांनी भरलेले जीवन ...त्याचा शेवट असा विदीर्ण व्हावा
ज्याच्या एकट्याच्या
कर्तुत्वावर विश्वास ठेवून दुर्योधनाने युद्धाचा डाव मांडला होता तोच हा महारथी...,
तोच कर्ण स्वतःच्या अहंकाराला ठेच पोहोचल्या मुळे पहिले १०
दिवस युद्ध भूमी पासून दूर राहिला.. पण नंतर भीष्म आणि द्रोणाच्या पतना नंतर एकट्या कर्णाने पांडवाचे
अर्धे सैन्य खलास केले हा इतिहास आहे... आणि याच युद्धात
त्याचा शेवट आणि कुलाचा नाश व्हावा..
कर्ण हा
अर्जुनापेक्षादेखील श्रेष्ठ धनुर्धर होता हे स्वतः कृष्णाने आणि परशुरामांनीदेखील
मान्य केलेले आहे.
“हे भिमा, जरी तुम्ही अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर मानत असलात तरी खरा
सर्वश्रेष्ठ हा कर्ण आहे. मला, परशुरामांना व युधीष्ठीरालाही ते माहीत आहे. दोन
शाप आणी कवच कुंडलांच्या दानामुळे तो आअता अर्धरथीही उराल नाहिये परंतु असे नसते
तर आज तो माझ्या सुदर्शनचक्रालाही अवध्य असता हे लक्षात ठेव. तुझा मुलगा एका
शुरासारखा मृत्यु पावला, कर्णाच्या हातुन त्याचा मृत्यु हा सन्मान आहे हे समज आणी
दु:ख आवर” असे सांगत कृष्णानी सर्वच पांडवांचे सांत्वन केले. (द्रोण पर्व : दिवस
१४) )
असा हा "महारथी"
पण भर सभेत त्याची योग्यता पितामह भीष्मांनी "अर्धरथी" म्हणून केली....
कर्ण चरित्रातील
या ठळक घटना कर्णा ला नायक करण्यास पुरेशा आहेत...आणि एकांगी विचार केला तर तो महा
नायक ठरतो, मग प्रश्न असा पडतो अशा नायकाची शोकांतिका का व्हावी?
हि शोकांतिका स्वतः
ओढवून घेतलेली..त्याच्या आयुष्याच्या सर्व बाजूवर नजर टाकली तर त्याचे काही अवगुण पण
लक्षात येतात ..अहंकार... स्वतः बद्दल नको तितका आत्मविश्वास...अमर्याद महत्वाकांक्षा..अर्जुना
बद्दल आणि त्या मुळे पांडवा बद्दल पराकोटीचा मत्सर...तसेच आयुष्यात केलेल्या काही
चुका....जसे कि परशुरामा ला फसवून शिकलेले शापित ब्रम्हास्त्र, ब्राम्हणा कडून घेतलेला
शाप आणि या वर कळस म्हणजे द्रौपदी वस्त्र हरणाच्या वेळेस ची त्याची वागणूक!!! या सगळय
गोष्टींचा शेवट कर्माच्या सिद्धांता मुळे एका शोकांतिकेत झाला.
एक विचार असा
येतो कि झालेल्या अन्याया मुळे कदाचित वागण्यात कडवट पणा तर आला नसेल? आणि तसाविचार करायचा तर महाभारतात फक्त कर्णा वरच अन्याय झाला का ? तसे पहिले तर विदुरा वर सगळ्यात जास्त
अन्याय झाला,धृतराष्ट्रापेक्षा किती तरी अधिक पटीने राजा होण्यास लायक, पण केवळ
दासी पुत्र म्हणून राज योगा पासून वंचित राहिलेला...पितामह भीष्म ज्याने पूर्ण
आयुष्य फक्त त्याग आणि त्याग करण्यात घालवले...सावत्र आई ला दिलेल्या वचना करिता
आजन्म ब्रम्हचारी राहिलेला आणि राज्याभिषेका पासून दूर राहिलेला..नकुल आणि सहदेव
पाच पांडवा पैकी तसे थोडेसे दुर्लक्षित आणि कमी वलयांकित..ह्या सगळ्या
व्यक्तींच्या वागण्यात का कडवट पणा आला नाही?
तसेच अनेक प्रश्न कर्ण चरित्रात अनुत्तरीत राहतात -
१. अर्जुना
बद्दल मनात इतका राग असण्याचे कारण काय? केवळ आपल्या पेक्षा सरस धनुर्धारी आणि
आपल्या परम मित्र दुर्योधनाचा वैरी म्हणून...
२. द्रोपदी
स्वयंवरात जाऊन अपमान करून घेण्याची खरेच गरज होती का ? एवढा धर्म शास्त्र पारायण,
त्याला या साध्या गोष्टीची जाणीव नसेल
कि , द्रोपदी स्वयंवरात आपले कुळ आडवे येऊ शकते...
३. दुर्योधनाने
अंग देशाचे राज पद दिलेले असताना, दिवस रात्र हस्तिनापुरातील राजकारणात ढवळा ढवळ
करण्याची खरेच गरज होती का?
४. केवळ अर्जुना
कडे ब्रम्हास्त्र आहे, म्हणून केवळ त्याच्या मत्सरा पोटी, परशुरामाला फसवून ब्रम्हास्त्र
विद्या शिकायची गरज होती का?
५. द्रोपदी
वस्त्र हरणं प्रसंगाच्या वेळेस द्रोपदी ची अवहेलना करताना कर्णाने कुठलाही
विधिनिषेध ठेवला नव्हता,,,केवळ त्याने उद्य्क्त केल्या मुळे दुशासन तिला सभेत
घेवून आला...खरे तर ती सभा किंवा तो द्यूताचा खेळ म्हणजे कौरव आणि पाण्डवातील
म्हणजे भावंडातील कौटुंबिक बाब...त्यात कर्णाने हस्तक्षेप किंवा ढवळा ढवळ करण्याची
काहीच गरज नव्हती...पण त्या प्रसंगी केवळ स्वयंवर प्रसंगी झालेल्या अपमानाचा बदला
घेण्याची संधी साधली
तसे पाहता महाभारत काळात सगळे राजे महाराजे ब्राम्हणांना दान करत
असत...मग केवळ कर्ण एकटाच दान वीर का ठरला? त्याचे कारण त्याने साक्षात इंद्राला
दान केलेली कवच कुंडले!!! पण दान हे नेहमी निरपेक्ष असते..इथे कवच कुंडले देताना
इंद्रा कडून २ गोष्टी मिळवल्या...एक म्हणजे कवच कुडाला शिवाय सौंदर्य अभादित राहील
आणि दुसरे मुख्य इंद्रा कडून घेतलेली वासवी शक्ती... आता
याला दान म्हणायचे का ?? हा तर झाला व्यवहार....
हाच कर्ण काही
वेळेस मनाचा अत्यंत मोठे पणा दाखवतो...
कृष्ण शिष्टाई
नंतर श्रीकृष्ण जेंव्हा कर्णाच्या भेटीस गेला आणि त्या भेटीत कर्णाने पांडवांच्या
बाजूने येण्या करिता मन वळविण्याचा प्रयत्न केला तेंव्हा कर्णाने जे स्पष्टीकरण
दिले त्याला खरेच तोड नाही, तसेच कुंती ने आणि भीष्मांनी जेंव्हा त्याच्या जन्माचा
इतिहास सांगितला तेंव्हा चे त्याचे वागणे आणि कुंतीला दिलेले वचन " तुझे ५
पांडव जिवंत राहतील" आणि त्या नंतर युद्धात अर्जुन सोडून ४ पांडवाना जेरबंद
केल्या नंतर दिलेल्या शब्दाला जागून, चौघांना जीवनदान देणे...यातून त्याच्या मनाचा
मोठे पणा दिसून येतो...
नियतीचा डाव तरी कसा-
अभिमन्यू
सारख्या कोवळ्या पोराला कर्णा सहित सगळ्या योद्ध्यांनी चक्रव्युहात अडकवून
अर्जुनाच्या अपरोक्ष मारले....त्याच अर्जुनाने कर्णाच्या मुलाला वृशसेनला कर्णा
समोर मारले ....कर्णा समक्ष अर्जुना ने जयद्रथा चा वध केला...या दोनही प्रसंगात
कर्ण हतबद्ध होता...
जी वासवी शक्ती
अर्जुन वधा च्या अपेक्षेन घेतली होती, ती वापरावी लागली घटोतकाचा वर....ब्रम्हास्त्र
अर्जुना करिता राखून ठेवलेले..शापित असल्या मुळे त्याचाही उपयोग नाही
कौरवांच्या नादी
लागून ज्याने अनीती आणि अधर्मा ने वागण्यात धन्यता मानली...त्यने आयुष्याच्या
शेवटच्या क्षणी अर्जुन आणि श्री कृष्णाला धर्मा ची आठवण करून देवून धर्माने
वागण्याची अपेक्षा करावी....
आणि या सगळ्याची
अखेर कर्ण वधात झाली...
कर्ण जन्माने क्षत्रियच होता
आणि मृत्यू नंतर पण पांडवानी त्याचे अंत्यसंस्कार क्षत्रिय रिती प्रमाणेच केले....""दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम् ॥" हे सुभाषित काही अंशी खरे पण करून
दाखविले!!!
त्या मुळे कर्ण
म्हणजे कौरव का पांडव हे खरेच गूढ!!! आणि ते ठरविणारे आपण तरी कोण?
बिपीन कुलकर्णी
संदर्भ - युगांत, व्यास पर्व , कर्ण कोण होता