Monday, October 19, 2015

कुटुंब रंगलय गप्पात !!!!!

लांब विस्तीर्ण पसरलेली हिरवाई, उंचच उंच डोंगरांच्या रांगा, मधून वाहणारी पांढरी शुभ्र नदी। सुंदर बगीचे , कारंजे … सुंदर नगरी … स्वर्गच जणू …

जणू काय ? स्वर्गच होता तो …

गावाच्या वेशीला " चित्रगुप्ताचे कार्यालय " , तिथले सोपस्कार पूर्ण करून लोक नगरा मध्ये प्रवेश करीत होते …येणार्यांची वेशीवर गर्दी असते…

नदीच्या दुतर्फा टुमदार घरे , एका सरळ रेषेत एकाला एक लागून असंख्य घरे…या घरात आलेल्या लोकांची राहण्याची सोय चित्रगुप्ता कडून होत असते…

आजची सकाळ थोडी वेगळीच …. थंड हवा , आसमंतात हलके धुके पसरलेले, गवतावर आणि आजूबाजूला सगळ्या फुलांवर  दव पसरलेले … एकूण वातावरण उल्हासित करणारे  होते… 

अप्पा आणि ताराबाई रोजच्या सवयी प्रमाणे morning walk ला निघालेले …
वातावरणा मुळे म्हणा किंवा अजून कशा मुळे पण  अप्पा थोडेसे हळवे झालेले…।  ताराबाई नेहमी प्रमाणे शांत आणि स्थीर … अप्पा नट सम्राटमधील अप्पा बेलवलकरांच्या भूमिकेत जाऊन तारा बाई ना म्हणाले -

अप्पा — तारा , गेल्या पन्नाससाठ वर्षात एकगोष्ट तुला सांगायची मी विसरुन गेलो, आता सांगणार … आहे ती .

ताराबाई  — कोणती ती?

अप्पा — तू मला फार आवडतेस. मी खूप खूप प्रेम केले तुझ्यावर.

ताराबाई  — इश्श ! या गोष्टी बोलायच्या असतात का ? आणि हे काय मला माहीत नव्हतं ?

अप्पा — तरीही एकदा सांगावंसं वाटतं.

ताराबाई - असू दे असू दे … मला एक सांगा…. माझ्या पुढे येउन इथे काय केलेत हो  ?

अप्पा - अग तारा तेच ग … ९० च्या दशकात आपण करत होतो तेच  …

तारा बाई - मी नाही समजले ? जरा नीट सांगा ना … शाळेत भूगोल शिकविल्या सारखे कोड्यात का बोलता ?

अप्पा - अग तारा … आई ची सेवा ! अन दुसरे काय, कधी अनंतरावा कडे गप्पा , सुशीला बाई पण असायच्या गप्पा मारायला , जुना गप्पांचा फड जमायचा… आमचे जुने स्वातंत्र्य सैनिक आहेत इथे , त्या मुळे वेळ जायचा …

तारा बाई - अरे वा … श्रावण बाळ इथे पण नाही चुकला …

अप्पा - तारा तू पण ना …

तारा बाई - एक सांगू ?

अप्पा - सांग ना  …. तुला कधी पासून विचारायची वेळ आली ?

तारा बाई - नाही हो , तुम्ही इकडे आलात आणि माझे तिकडे लक्षच लागेना …

अप्पा - अग तारा … पण तू फार घाई केलीस …मुलांना , नातवंडाना आणि सगळ्यांना तुझी गरज होती … 

तारा बाई - जाऊ दे …. विचार करू नका …  डोळे पुसा … थांबा मीच पुसते… हा घ्या पदर … आठवते हैदराबाद ला लग्ना आधी आपण भेटायचो तेंव्हा तुम्ही पदराला डोळे नाही पण हात पुसायचात …
अप्पा - हो हो …तारा विसरेन का मी ?

तारा बाई - आज इतके छान वातावरण आहें ना … खूप छान वाटतेय …आज हळवे नाही होयचे …  मन सांगतेय आज काही तरी छान होणार आहे ? कोणी तरी भेटेल असे वाटते …
अप्पा - हो ग मलाही तसेच वाटतेय … चल थोडे लांब फिरून येऊ …

तारा बाई - अहो ते पाहिलेत का ? काठी टेकवत येत आहेत , धोतर , पांढरा शर्ट , चोकलेटी टोपी …. कोण असेल हो ? त्यांच्या बरोबर नऊ वारी साडी वाल्या बाई पण दिसताहेत …. कोणी आपल्या पैकीच दिसतेय … डोक्याला अंबाडा आणि गजरा पण दिसतोय … सांगा ना कोण असतील ते ?

अप्पा - अग हो…  हो… थांबशील जरा ? थोडे पुढे जाऊन पाहू …
----------------------------------------------------------------------------------------------------------------
अप्पा - अग…  तारा … तारा

तारा बाई - अहो मी इथेच तर आहे …तुमचि मेली हाका मारायची सवय काही नाही गेली अजून …

अप्पा - अग हे तर नानासाहेब आणि ताई आहेत …  

ताराबाई - अहो खरेच कि … त्यांना जोडीनी पाहून कैक वर्षे होऊन गेलेत … किती खुशीत आहेत ना …

अप्पा - नमस्कार करतो नाना साहेब… ताई नमस्कार करतो …

तारा बाई - नमस्कार करते …

ताई - अहो असू द्या … कसे आहात ?

ताराबाई - आम्ही छान आहोत , तुम्ही कसे आहात …

ताई -  आम्ही पण छान …

तारा बाई - बाकी काय म्हणता

ताई - काही नाही हो … आम्ही दोघे इतक्या वर्षा नंतर भेटलो …खुप गप्पा मारतो … माझ्या पाठीमागे झालेल्या सगळ्या गोष्टी हे मला आठवून आठवून सांगत असतात … ह्यांचे लहान भाऊ वसंत भावोजी पण असतात  गप्पा मारायला … ते दोघे जणू राम - लक्ष्मन च  … अनंता  पण आला आहे पण त्याने  फार घाई केली यायची … 

तारा बाई - हो ना काय म्हणणार ?

नाना - अहो…  ठरलेय ना आपले आता डोळ्यात पाणी नाही काढायचे असे ?

ताई  - ताराबाई , अहो मला ना तुमचा बंगला फार आवडायचा ? आम्ही फार छोट्या घरात आणि गरिबीत राहिलो … मी यांना नेहमी म्हणायचे मेढेकारांचा बंगला फार सुरेख आहे हो… 

तारा बाई  - अहो नानांनी आणि तुमच्या मुलांनी पण फार सुंदर बंगला बांधला … पण तुम्ही पुढे निघून आलात … पण आम्ही खूप वर्षे जात येत होतो तिथे …

ताई - हो यांनी वर्णन केले बंगल्याचे …भरुन पावले मी …

नाना -बर मनु ताई कशा आहेत ?

अप्पा - नानासाहेब तिचे काय विचारता … ती स्वतःला इथे पण व्यस्त ठेवते … बायकांना  स्वावलंबित  करायचा वसा घेतलाय ना , आपण भोगलेला त्रास कोणी भोगू नये , या करिता धडपड … दुसरे काय ?आणि मुख्य आमच्या वडिलांशी इतक्या वर्षांच्या राहिलेल्या जिवाभावाच्या गप्पा …  कधी रुसणे , रागावणे …कारण आमचे वडील फारच लवकर आले इकडे , त्या मुळे तिकडे असताना तिला रुसवायची  किंवा रागवायची संधीच दिली नाही ना त्यांनी …. 

नाना - खरे आहे दत्तोपंत राव… नशीबवान होतात तुम्ही आई च्या बाबतीत  ….

अप्पा - ते मात्र आहे … आम्ही नशीबवान …पण नानासाहेब तुम्ही पण कुटुंबाच्या बाबतीत नशीबवान होतात  ….

नाना - मान्य १००%

ताई - तारा बाई कुठे आहात हो राहायला ? आम्ही त्या तिकडे पलीकडे … ती पायवाट जातेना डोंगरा कडे तिच्या शेवटी … या आता घरी

तारा बाई - अहो ताई आम्ही पण इथेच जवळ … इथून  पुढे गेलो कि ती नदी दिसते ना … तिथले शेवटचे कोपर्यातले शेवटचे घर …. आधी तुम्ही या घरी …

नाना - दत्तोपंत राव कोण आहे शेजारी ? गप्पा मारायला कोणी आहे कि नाही …

अप्पा - आहेत ना बरीच जुनी मंडळी आहेत  … अनंतराव - सुशीला बाई  आहेत , सिरसमकर दादा आणि वाहिनी  आहेत , त्यांची सून आरती तर तुम्हाला माहितीच आहे … ती खूप काळजी घेते आम्हा वयस्कर लोकांची….

नाना - हो आरती ताई आहेत म्हंटल्या वर काळजीच नाही …

ताई - अहो ऐकलत का ? कोण ह्या आरती ताई…

नाना - अहो त्या आपल्या मोठ्या सुनबाई ची धाकटी विहीण , मी भेटलोय आणि जेवलोय खूप वेळेस  त्यांच्या हातचे … सुगरण आणि अतिशय हौशी बाई हो …

अप्पा एकूण तुम्हाला शेजार चांगला आहे …

अप्पा - नानासाहेब तुम्हाला कोण आहे शेजारी …

नाना - अहो आमचा जळगाव करांचा गोतावळा तुम्हाला माहितीच आहे , तसे खूप आहेत… माझा भाऊ वसंत आणि  माझा नातू राहतो विलास आमच्या बरोबर …विलास च्या  व्यवसायाच्या काही खटपटी चालू आहेत…शेजारच्या वाड्यात मोठे भाऊ अप्पा मोठ्या वाहिनी आहेत …  असे आहोत आम्ही सगळे एक दुसर्याला …  

अप्पा - वा वा छान …

तारा बाई - नानासाहेब आणि ताई , शनिवारी या सगळे जेवायला … 

नाना - हो हो येऊ नक्की … गप्पा आणि भेटी गाठी होतील सगळ्यांच्या …

ताई - अहो असे काय करता .… शनिवारी सुधाकर आणि कुसुम येणार आहेत ना आपल्या कडे ?

नाना - अरे हो , विसरलो मी … ताराबाई शनिवारी भाचा आणि सून येणार आहेत …

तारा बाई - अहो ओळखतो आम्ही त्यांना , ठीक आहे मग रविवारी या …

ताई - ठीक आहे तारा बाई रविवारी येऊ …. पण एक सांगते जास्त काही करू नका …

तारा बाई - तुम्ही या , काय करायचे ते सासूबाई ठरवतील …. तुम्हाला तर माहितीच आहे त्यांच…

ताई - ठीक आहे , पण सांगा त्यांना आमचा निरोप …

अप्पा - सांगतो आई ला निरोप … नानासाहेब अनंतराव कुठे आहेत दिसले नाहीत ?

नाना - तो गेला आहे त्याच्या कामाला … काम म्हणजे काय हिच्या माझ्या गोळ्या औषध आणायला … चीरंजीव आणि वडील खूप फिरत असतात …. येतील  इतक्यात ,

अप्पा आणि  तारा बाई - चिरंजीव ???

नाना - अहो विसरलात का सचिन ? तोच तर तरुण आहे आम्हा सगळ्यात …. खूप काळजी घेतो आमची ….

तारा बाई - अग बाई खरेच कि ? तुम्ही सगळे नक्की या रविवारी ….

नाना - चला निघू आपण  … खूप वेळ झाला ….

अप्पा - नमस्कार …. भेटू रविवारी ….
------------------------------------------------------------------------------------------------------------------
 
ताई - छान वाटले ना हो , किती अचानक भेटले ?

नाना - हो ना …. आज अगदी गुलमंडीवर चक्कर मारल्या सारखे वाटले … तिथे कोणी  असेच अचानक भेटायचे ….

ताई - गुलमंडी म्हणजे तीच ना … आपल्या घराच्या मागची ….

नाना - हो ग …. पण तू म्हणतेस ते आपले फार जुने घर … आताच्या घरा पासून गुलमंडी थोडी लांब आहे ….

ताई - अस्स अस्स …. मगाशी तारा बाई म्हणत होत्या तो बंगला ना ?

नाना - हो ग ….

ताई - अहो मला एक सांगाल का ?

नाना - विचार ना ….

ताई - कसे काढले हो दिवस एकट्यानी , मी इकडे आल्यावर ? एकटे पण नाही जाणवले ?

नाना - अहो खरे सांगू का  … सुरुवातीला झाला खूप त्रास … कंटाळा यायचा , चीड चीड व्हायची , कशात लक्षच नाही लागायचे, पण नंतर खूप विचार केला … या मुलांना तरी कोण आहे आपल्या शिवाय …. त्यांच्या आनंदात सहभागी व्हायचे , आणि तुम्हाला सांगतो त्रास हळू हळू कमी झाला …

ताई - ते मात्र बरे केलेत , पण एकच खंत मला आहे हो ? मुलांचे संसार , नातवंडे डोळे भरून नाही पाहू शकले मी …
नाना - अहो मी पहिले ना , खूप छान संसार सगळ्यांचे , नातवंडे पण चांगली , इतकेच काय पतवंडे पण पाहून आलो …. पण एक सांगू का तुम्हाला ?

ताई - सांगा ना ….

नाना - मी जे  जे काही पहिले  , ते दोघांच्या डोळ्यांनी पहात होतो …. त्या मुळे कदाचित दुख: हलके होत होते …

ताई - हो कळत होते  मला…. चला निघू … खूप वेळ झाला …
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मनुताई - अहो बराच वेळ झाला हे दोघे अजून आले नाहीत …रोज लवकर येतात फिरून…

रामचंद्र राव - अहो किती जीव वर ठेवता , येतील इतक्यात …

मनुताई -  अहो आजू बाजूला ते नसले कि एकटे पण जाणवते ….

रामचंद्र राव - हे बरे आहे … मी आहे ना , मग कसले एकटे पण ?

मनुताई - तुमचे आपले काही तरीच … सवय होऊ दिलीत का तुम्ही तुमच्या सहवासाची ?

रामचंद्रराव - खरे आहे … तुमच्यावर अन्यायच झाला ….

मनुताई - असू दे असू दे …. निभावले सगळे …

रामचंद्रराव - निभावले कसले …. तुम्ही खंबीर पणे उभे राहिलात म्हणून झाले सगळे व्यवस्थित …

मनुताई - काही नाही हो…. परिस्थिती माणसाला खंबीर करते ….

रामचंद्रराव - हात बघू तुमचे ?

मनुताई - इश्य …. हे काय नवीन ?

रामचंद्रराव - अहो नाही हो …. किती कष्ट केलेत , किती खडबडीत झालेत हात तुमचे….

मनुताई - तुमचे आपले काही तरीच …. किती वर्षे पोळ्या करीत होते मी , पण पोळ्या करणे म्हणजे का कष्ट असतात…. सगळे व्यवस्थित पार पडले हे महत्वाचे ….

रामचंद्रराव - हा तुमच्या मनाचा मोठे पणा , पण तुम्ही आमच्या पेक्षा नशीबवान बरका …. फॉरेन ला राहून मड्डम बीड्डम होऊन आलात , कसे आहे हो तिंकडे ? पृथ्वी वरचा स्वर्ग म्हणतात ना ….

मनुताई - चला तुमचे आपले काही तरीच ….फॉरेन बिरेन ला गेले , पण शेवटी जिथे आपली माणसे तोच आपला स्वर्ग असतो पृथ्वी वर… पण मला एक सांगा , तुम्ही काय केलेत इतकी वर्षे ?

रामचंद्रराव - काही नाही … थोडे अध्यात्म , परमार्थ , मित्र जमवले ….

मनुताई - ते बरे केलेत … आले बघा अप्पा आणि तारा ….
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
ताई - अरे अनंता कुठे गेलास हो इतका वेळ ?

अनंत - अग कुठे नाही , बाजारात गेलो होतो , आज जायचेय ना मेढेकारांकडे जेवायला …. नवीन साडी आणली बघ तुला ….त्याच त्याच साड्या घालतेस तू ? जुनी सवय तुझी …. आणि हे बघितलेस का ? नानांनी तुझ्या करता गजरा आणायला सांगितला होता …

ताई - भरून पावले ग बाई मी

अनंत - नाना कुठे गेले ?

ताई - अरे असतील इथेच …. ते आणि वसंत भावजी बसले असतील तिकडे गप्पा मारत … त्यांच्या गप्पा काही संपत नाहीत …  बोलव त्यांना आणि सांग दोघांना तयार व्हायला ?
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अनंत - चला हळू हळू ,

नाना - अरे रस्ता माहिती आहे का तुला … का सांगू मी

अनंत - माहिती आहे मला … तुम्ही आणि काका चला पुढे , मी ताई चा हात धरतो….

ताई - अरे अनंता हे दोघे भाऊ पुढे गेले बघ …. फार घाई असते बाबा त्यांना….

अनंत - असू दे …. मी आहे ना ….

ताई - अरे हे कोणाशी बोलताहेत …… कोणी तरी भेटले वाटते त्यांना ….

अनंत - अग ताई ते  श्री व सौ हस्तेकर आहेत

ताई - कोण बाबा हे ….

अनंत - अग ते तुझे सगळ्यात धाकटे व्याही आणि विहीण आहेत ….

ताई - हो का …. मला सगळेच नवीन ….

अनंत - नमस्कार करतो आजी ….

ताई - अरे येवढ्या जोरात का बोलतोस तू ?

अनंत - अग त्यांना ऐकायचा त्रास आहे ….

ताई - अस का …. ठीक आहे ….
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
ताई - अनंता एवढी गर्दी कसली रे इथे ?

अनंत - थांब मी पाहून आलो ….

ताई - काय आहे रे ?

अनंत - अग तिकडून एक मोठे  शास्त्रज्ञ आलेत ….अब्दुल कलाम नाव त्यांचे …. त्यांना पाहायला गर्दी झालीय ….
ताई - चल मलाही बघायचेय त्यांना ….

अनंत - चल ….
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ताई - अनंत ते बघितलेस ….  तो निळ्या डोळ्याचा राज कपूर न रे ….

अनंत - हो … तू ओळखलेस बरोबर ….

ताई - पाहिलेत रे काही सिनेमे … तुला माहिती, मनुताई ना पण सिनेमा ची फार आवड होती ….

अनंत - हो का असेल बाबा ….

ताई - त्या बाई कोण आहेत रे आपल्या कडेच पाहताहेत …. तुझ्या ओळखीच्या दिसताहेत ….

अनंत - थांब एक मिनिट ….

(त्या बाई जवळ आल्या आणि निरखून पाहून म्हणाल्या )

बाई - तुम्ही अनंतराव न …. कशी आहे माझी सुधा ….

अनंत - ती बरी आहे , तुम्ही सुधा म्हणालात म्हणून कळले नाही तर ओळखलेच नसते हो मी …।

बाई - तुमची चूक नाही , तुम्ही पाहीलच नाही कधी मला …. त्या मुलांना लहान पणी सोडून आले मी ….

अनंत - ताई या तुझ्या दोन नंबर च्या विहीण बाई …

ताई - नमस्कार

ताई - चल बाबा लवकर ….

ताई - अनंता त्या तिकडे पाहिलेस ? ओळखलेस त्यांना

अनंत - कुठे ?

ताई - अरे ते बघ बालगंधर्व …. अरे खूप नाटके पहिलीत त्यांची आम्ही दोघांनी …. किती सुंदर आहेत दिसायला अजून पण  ….
अनंत - हो हो … आता चल लवकर

अनंत - चला  आले बघा  मेढेकारांचे घर …

ताई - ह्यांना सांगून ठेव , जेवण झाले कि थोडा वेळ बसा म्हणा …. फार घाई असते यांना घरी जायची … आधी तुम्हा पुरुषांची आणि मग आम्हा बायकांची जेवणे होयला वेळ लागेल…

अनंत - हो ताई मी बघतो …. चल तू आत ….
______________________________________________

बिपीन कुलकर्णी  


2 comments:

  1. Apratim kalpana ani titkich sunder shabdarachana. Purna prasanga ani vyakti dolyasamor ubhya rahiya. Hats off. Speechless. 👍

    ReplyDelete
  2. Apratim kalpana ani titkich sunder shabdarachana. Purna prasanga ani vyakti dolyasamor ubhya rahiya. Hats off. Speechless. 👍

    ReplyDelete